कधी प्रेमाचा, कधी विश्वासाचा, तरी कधी नात्यांचा गुंता... या नात्यांच्या गुंत्यात आपण अडकत जातो आणि गुंता सुटत नाही... जितका आपण हा गुंता सोडवण्याचा प्रयत्न करत राहू, तेवढाच तो अधिकच वाढत जातो.

काही क्षण असे जगावे,
कधी न निसटून जावे.
असा प्रेमाचा पाऊस पडावा,
नात्यांचा गुंता सुटून जावा.
दिवसामागून आकाश किती सुंदर दिसते, त्याप्रमाणे सर्वांच्या आयुष्यात वेगवेगळ्या माणसांना खिळवून ठेवण्याची कला तुमच्याकडूनच शिकावी. सर्वांना प्रेम देणारे आकाश आज मला का बरे विचारते, माझ्या मनातली धाकधूक त्यांना आधीच का कळावी? काही गोष्टींचा अबोला असावा... नियंत्रण हिरावून घेतलेली प्रत्येक गोष्ट गोड मानून घेतली. आपल्या प्रत्येक संकटावर मात करण्याची ताकद तुमच्यात विश्वास निर्माण करते. प्रत्येक क्षण जगावे, असे मनात कितीही दुःख असले तरी ओठांवर हसू ठेवून स्वतःचे पण आणि इतरांचे पण मन जपावे, हे तुमच्याकडून तर शिकले. माझ्या स्वभावदोषामुळे काही जण दुखावले असतील, पण मला त्याची खंत नाही. कारण दुखावले तरी माझी वृत्तीच जी आहे, ती सर्वांना माझीशी करून घेते, म्हणून सगळे मला सांभाळून घेत असतात.
हळवे मन, अभ्यासू वृत्ती, दुसऱ्यांना मदत करण्याची स्वभाववृत्ती, कधी कोणाच्या आनंदात सहभागी व्हायचे तर कधी कोणाच्या दुःखात धावून जायचे, कर्तव्य तेवढेच ओळखीचे वाटते. चांगल्या माणसांची पारख हवेनिशी होते. खरं तर मी अडकत जात होते ते नात्यांच्या गुंत्यात. कोणाशी किती अंतर ठेवावे, किती जवळीक असावी, हे या वयात समजायला चालू झाले होते.
आपले नातेवाईक एकमेकांबरोबर असले की सुख-दुःखाच्या वेळी ते आपल्या उपयोगी पडतात. "अडचणीच्या वेळी एकमेकांवर अवलंबून राहणे..." हे काम सरळ व चांगल्या पद्धतीने होऊ शकते. सुखाचा प्रत्येक क्षण एकमेकांबरोबर शेअर करू शकतात. परंतु माझ्या असे लक्षात येते की, 'नाती तिथेच काळीज जास्त जवळ ठेवले की नातेसंबंध बिघडतात.' काहीतरी समजूतदारपणा दाखवून एकमेकांशी विचारपूस करून, मनाच्या काही गोष्टी एकमेकांसमोर मांडून, नाते सांभाळून राहिले तर नाती चांगल्या प्रकारे टिकून राहू शकतात, असे मला वाटते.
रक्ताच्या नात्यांपेक्षा इतर काही नाती खूप सुंदर असू शकतात. जसे की 'मैत्रीचे'. काही वेळा आपण प्रवासात असताना, अनोळखी व्यक्तीसोबतसुद्धा आपले मन मोकळे करू शकतो, ते नाते सुद्धा सुंदर बनू शकते. असाच एक प्रसंग मला आठवला. प्रवासात मला एक ताई भेटल्या. बसमध्ये त्या माझ्या शेजारी बसल्या होत्या. मी उभी होते, माझी बॅग तिने स्वतःहून काही वेळासाठी धरली. मला नीट तिच्या बोलण्यावरून कळाले की, ती एक शिक्षिका होती. त्या मला म्हणाल्या, "तू मेडिटेशन करत जा, काहीतरी लिहीत जा." मी म्हटले, "मी लिहिते." त्यावर त्या हसून म्हणाल्या, "हे तर फारच छान! तुझ्यामुळे आम्ही पण कधीतरी पेपरमध्ये येऊ, मला नीट शिकव." असे म्हणून माझ्या जवळ आल्या आणि म्हणाल्या, "मला तुझ्या स्वभावात मला एक मित्र मिळू शकतो का? मी त्यांना माझा नंबर दिला. खरं तर मी खूप मानसिक तणावात होते, का माहीत नाही, त्यांच्याशी मला बोलावेसे वाटले आणि मी म्हटले, "कधी-कधी हक्काच्या माणसापेक्षा प्रवासातल्या माणसाकडे मन मोकळे करावेसे वाटते." त्या त्यावर म्हणाल्या, "असे कर, जेणेकरून मन मोकळे होईल, कदाचित माझ्यामुळे तू टेंशन फ्री होशील." माझ्या विषयीच्या भावना व्यक्त होत होत्या आणि त्या माझ्या डोळ्यात पाहत होत्या. मला समजून घेण्याचा प्रयत्न करत होत्या. सगळं काही ऐकून घेऊन शेवटी त्या म्हणाल्या, "हे बघ, शिकायला वेळ हा प्रत्येक गोष्टीवर औषध असतो. काही दिवस उलटल्यावर आपोआप सगळे प्रश्न सुटतील आणि काही महिन्यांत तू ९०% हून अधिक टेंशन फ्री होशील." मला त्यांच्यामधील शिक्षिका जाणवली. "तू जास्त विचार करतेस, अशाने तू आजारी पडशील." मी त्यांचे आभार मानले आणि त्यानंतर खरंच काहीच दिवसांत मी तणावमुक्त झाले. धन्यवाद ज्योती ताई! खरंच, आज मी १००% त्या गोष्टीतून मुक्त झाले आहे.
अशातूनच मला एक मैत्रीण भेटली, म्हणून आता सांगू इच्छिते की, मैत्रीला प्राधान्य का देऊ नये? अनोळखी अशी एक व्यक्ती, जिच्याबरोबर आपण आपले आयुष्य वाचून दाखवू शकतो. जिच्या खांद्यावर आपले मन मोकळे करून, स्वतःचे विचार मांडून, तिच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू शकतो, अशी आहे माझी एक मैत्रीण. तिचे नाव सुजाता. ती माझी मैत्रीण कमी आणि बहीण जास्त वाटते.
कधी प्रेमाचा, कधी विश्वासाचा, तरी कधी नात्यांचा गुंता... या नात्यांच्या गुंत्यात आपण अडकत जातो आणि गुंता सुटत नाही... जितका आपण हा गुंता सोडवण्याचा प्रयत्न करत राहू, तेवढाच तो अधिकच वाढत जातो.
- शितल सराफ