काही माणसं आपल्या आयुष्यात आपल्याला त्रास द्यायला येत नाहीत. ती येतात...१”आपल्याला आपलंच एखादं न पाहिलेलं प्रतिबिंब दाखवायला.

प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती असते. तिचं नाव घेतलं की चेहऱ्यावर आठ्या पडतात. “ती खूप अहंकारी आहे”, “तो फार दिखाऊ आहे”, “तिला कायम लक्ष वेधून घ्यायचं असतं”... आपण सहज म्हणतो. पण कधी विचार केलाय का, काही माणसं आपल्याला इतकी का खटकतात, तर काहींच्या त्याच गुणांकडे आपण दुर्लक्ष करतो? समोरच्या व्यक्तीमध्ये काही वेगळं असतं... की आपल्या मनाला काही खटकत असतं?
माणसाचं मन फार विलक्षण आहे. आपण जगाला जसं पाहतो, तसं ते नेहमीच असतं असं नाही. अनेकदा आपण जगाकडे आपल्या अनुभवांच्या, भीतीच्या आणि न स्वीकारलेल्या भावनांच्या चष्म्यातून पाहत असतो. याचं अतिशय सुंदर स्पष्टीकरण मानसशास्त्रज्ञ कार्ल युंग यांनी त्यांच्या Shadow या संकल्पनेत दिलं आहे ज्याविषयी आपण गेल्या आठवड्यातील लेखात वाचलं.
युंग म्हणतात, आपण जन्माला येतो तेव्हा आपल्या व्यक्तिमत्त्वात अनेक शक्यता असतात. पण जसजसं आपण मोठे होतो, तसतसं समाज आपल्याला शिकवत जातो, “रागावू नकोस”, “मोठ्यांशी उलट बोलायचं नसतं”, “स्वतःचं कौतुक करायचं नाही”, “स्वतःचा विचार करणं म्हणजे स्वार्थ.”
या शिकवणुकीत काही गोष्टी आपण स्वीकारतो आणि काही भावना, इच्छा, गुण मनाच्या अंधाऱ्या कोपऱ्यात ढकलून देतो. आणि गंमत म्हणजे...आपण स्वतःमध्ये जे स्वीकारत नाही, तेच अनेकदा दुसऱ्यांमध्ये सर्वात आधी दिसायला लागतं.
मनोविश्लेषणाच्या भाषेत या प्रक्रियेला Projection म्हणतात. म्हणजे आपल्या मनातल्या एखाद्या न स्वीकारलेल्या भावना, इच्छा किंवा गुण नकळत दुसऱ्या व्यक्तीवर “प्रोजेक्ट” करणं. आपण समोरच्या व्यक्तीला जसं आहे तसं पाहत नसतो तर आपल्या मनातला एखादा भाग तिच्यावर उमटलेला पाहत असतो.
हे ऐकायला थोडं अवघड वाटू शकतं. पण एक साधं उदाहरण पाहू. समजा, एखाद्या व्यक्तीला स्वतःचा राग व्यक्त करणं कधीच शिकवलं गेलं नाही. ती व्यक्ती आयुष्यभर शांत राहते. मग एखादा ठामपणे मत मांडणारा माणूस तिला लगेच “आक्रमक” वाटू शकतो. कारण तिला त्रास त्या व्यक्तीच्या रागाचा नसतो, तर स्वतःमध्ये दाबून ठेवलेल्या रागाच्या आठवणीचा असतो.
युंग यांच्या मते, दुसऱ्यांबद्दलची प्रत्येक तीव्र प्रतिक्रिया म्हणजे समोरच्या व्यक्तीचं संपूर्ण चित्र नसतं, ती आपल्या मनातल्या Shadow ने दिलेली एक खूणही असू शकते. म्हणूनच मानसशास्त्रात अनेकदा प्रश्न समोरच्या व्यक्तीला बदलण्याचा नसतो, तर स्वतःला समजून घेण्याचा असतो.
एखादा पुरुष आयुष्यभर “पुरुष रडत नाहीत” हे ऐकत मोठा झाला असेल, तर भावनिकपणे व्यक्त होणारे लोक त्याला कमकुवत वाटू शकतात. ज्यांनी आयुष्यभर सगळ्यांना खूश ठेवण्याचा प्रयत्न केला, त्यांना “नाही” म्हणणारे लोक स्वार्थी वाटतात. आणि ज्यांनी स्वतःच्या इच्छा कायम दाबून ठेवल्या, त्यांना स्वतःसाठी जगणारी माणसं अस्वस्थ करून जातात. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक वेळी समोरची व्यक्ती योग्यच असते.
उद्धटपणा हा उद्धटपणाच असतो.
अहंकार हा अहंकारच असतो.
पण प्रत्येक तीव्र भावनिक प्रतिक्रिया आपल्याला एक प्रश्न विचारण्याची संधी देते, “या व्यक्तीमध्ये नेमकं काय आहे, जे मला इतकं अस्वस्थ करतं?”
हा प्रश्न इतरांविषयी कमी आणि स्वतःविषयी जास्त असतो. समुपदेशनामध्ये अनेकदा असं दिसून येतं की ज्या गुणांचा लोक दुसऱ्यांमध्ये सर्वाधिक तिरस्कार करतात, त्याच गुणांची एखादी न स्वीकारलेली छटा त्यांच्या स्वतःच्या आयुष्यातही असते. काही वेळा ती दडपलेली असते, तर काही वेळा ती जगण्याची त्यांची अपूर्ण इच्छा असते.
कदाचित म्हणूनच एखाद्या अतिशय आत्मविश्वासू व्यक्तीचा आपल्याला राग येतो. तिच्या आत्मविश्वासाचा नाही, तर आपण कधीच जगू न शकलेल्या आपल्या आत्मविश्वासाचा.
युंग म्हणतात, “जोपर्यंत तुम्ही तुमच्या अचेतन मनाला जाणीवेचा भाग बनवत नाही, तोपर्यंत तेच तुमचं आयुष्य चालवत राहील आणि तुम्ही त्यालाच नशीब म्हणाल.”
म्हणून पुढच्या वेळी एखादी व्यक्ती तुम्हाला अनपेक्षितपणे अस्वस्थ करून गेली, तर तिच्यावर मत बनवण्यापूर्वी स्वतःला दोन प्रश्न विचारा,
“मला तिच्यात नेमकं काय खटकलं?”
आणि...
“ही गोष्ट माझ्यात कुठेतरी दडलेली तर नाही?”
कदाचित उत्तर लगेच मिळणार नाही.
पण शोध सुरू होईल.
आणि मानसशास्त्रात अनेकदा उत्तरांपेक्षा शोध अधिक महत्त्वाचा असतो.
कारण...
काही माणसं आपल्या आयुष्यात आपल्याला त्रास द्यायला येत नाहीत.
ती येतात...
आपल्याला आपलंच एखादं न पाहिलेलं प्रतिबिंब दाखवायला.
- मानसी कोपरे
मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशक, डिचोली - गोवा
७८२१९३४८९४