
आठवतात दिवस मला ते आई,
ज्यावेळी मी रांगायचो
मधे कुठेही धडपडल्यावर,
कुशीत तुझ्या मी शिरायचो
डोक्यावर तेल घालायच्या निमित्ताने,
टाळूवर हात हलका मारायला सांगायचो
अन डोक्यावर ताण घातल्यावर,
घरभर मिरवत फिरायचो
बालवाडीत असुदे मित्र कितीही,
मात्र झाडावरची फूलं मला दिसायची
ती फुल बघितल्यावर आई,
मला आठवण तुझी सतवायची
मग घरी दुपारी जाताना,
खूप मी नाचायचो
कधी आजोबा न्यायला येतात,
याचीच वाट बघायचो
घरी जाताना झाडाखाली सागाच्या
फुलं कोंब्याची,
तुझ्यासाठीच तर तोडायचो
आठवतात ते दिवस,
जेव्हा वृक्ष ओवळीचा भला मोठा होता
जणू देवाने,
माझ्या आईसाठीच तो वाढवला होता
सकाळी लवकर उठून,
फुलं ओवळीची वेचायचो
आणि वेचलेली फुलं,
तुझ्या केसात बघून खूप खुश व्हायचो
आली होतीस एकदा शाळेत तू,
तुझ्या काही कामासाठी
मी घेतली शाळा डोक्यावर,
केवळ तुझ्या विरहापोटी
मधल्या-सुट्टीत घरी यायचो,
काही चटपटीत खाण्यासाठी
खाणं तर निव्वळ निमित्त होतं,
तुझा तो हसरा चेहरा पाहण्यासाठी
आता झालोय थोडा मोठा,
उडून जाईन घरटे सोडून जग पाहण्यासाठी
पण पाठीवर जगाच्या कुठेही असलो तरी परत येईन,
कुशीत तुझ्या परत शिरण्यासाठी