Home >> ती >> आरोग्य क्षेत्रातील महिला स्टेथोस्कोपच्या पलीकडची जबाबदारी

आरोग्य क्षेत्रातील महिला स्टेथोस्कोपच्या पलीकडची जबाबदारी

डॉक्टर दिनाच्या निमित्ताने आरोग्य क्षेत्रातील प्रत्येक महिलेच्या समर्पणाला सलाम करताना, त्यांच्या आरोग्याचाही तितकाच विचार करण्याची गरज आहे. कारण निरोगी महिला आरोग्यसेवकच अधिक सक्षमपणे समाजाची सेवा करू शकते.

Story: आरोग्य |
03rd July, 09:36 pm
आरोग्य क्षेत्रातील महिला  स्टेथोस्कोपच्या पलीकडची जबाबदारी

पांढरा कोट, गळ्यात स्टेथोस्कोप आणि चेहऱ्यावर आत्मविश्वास... रुग्णांसाठी ही एका डॉक्टरची किंवा आरोग्यसेविकेची ओळख असते. पण या ओळखीच्या मागे एक स्त्रीही असते, जिला स्वतःचे आरोग्य, कुटुंब, मातृत्व, करिअर आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी यांचा रोज समतोल साधावा लागतो.

आज आरोग्य क्षेत्रात महिला डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, नर्स, दंतचिकित्सक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट आणि इतर अनेक महिला मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. त्या दिवसाचे चोवीस तास इतरांचे आरोग्य जपण्याचा प्रयत्न करतात. मात्र एक प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा, दुसऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या या महिला स्वतःच्या आरोग्याची किती काळजी घेतात?

महिलांचे शरीर पुरुषांच्या तुलनेत अनेक जैविक बदलांमधून जात असते. मासिक पाळी, गर्भधारणा, प्रसूती, स्तनपान, रजोनिवृत्ती अशा प्रत्येक टप्प्यावर शरीराच्या गरजा बदलतात. त्यातच रात्रीच्या ड्युट्या, सतत बदलणाऱ्या शिफ्ट्स, झोपेचा अभाव आणि कामाचा ताण यामुळे त्यांच्या आरोग्यावर अतिरिक्त परिणाम होतो.

रात्रीची ड्युटी ही आरोग्य क्षेत्राचा अविभाज्य भाग आहे. मात्र सतत बदलणाऱ्या ड्युटीमुळे शरीराचे जैविक घड्याळ (Body Clock) विस्कळीत होते. यामुळे झोपेचा दर्जा कमी होणे, सतत थकवा जाणवणे, हार्मोन्समध्ये बदल होणे, वजन वाढणे, पचनाच्या तक्रारी आणि मानसिक ताण अशा समस्या निर्माण होऊ शकतात. अनेक संशोधनांमध्ये दीर्घकाळ शिफ्ट ड्युटी करणाऱ्या महिलांमध्ये अशा तक्रारींचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे.

अनेक महिला डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी कामाच्या व्यापामुळे वेळेवर जेवू शकत नाहीत. कधी एखादा चहा, बिस्किटे किंवा फास्ट फूडवर दिवस काढावा लागतो. परिणामी लोहाची कमतरता, व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन बी१२ची कमतरता, अशक्तपणा आणि सततचा थकवा या समस्या उद्भवू शकतात. रुग्णांना संतुलित आहाराचा सल्ला देणाऱ्या अनेक महिला स्वतः मात्र अपुरा आहार घेत असतात, ही वस्तुस्थिती आहे.

फिजिओथेरपिस्ट, नर्स आणि शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांना तासन्तास उभे राहावे लागते. काहींना रुग्णांना उचलावे लागते, तर काहींना सतत वाकून किंवा एका विशिष्ट स्थितीत काम करावे लागते. परिणामी मानदुखी, पाठदुखी, खांदेदुखी, टाचदुखी आणि गुडघेदुखी या समस्या सामान्य होतात. योग्य पोश्चर, नियमित स्ट्रेचिंग आणि स्नायू बळकट करणारे व्यायाम हे त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग असणे गरजेचे आहे; मात्र वेळेअभावी त्याकडे दुर्लक्ष होते.

महिलांच्या मानसिक आरोग्याकडेही तितकेच लक्ष देणे आवश्यक आहे. गंभीर रुग्ण, आकस्मिक प्रसंग, मृत्यू, रुग्णांच्या नातेवाईकांच्या अपेक्षा आणि सतत जागरूक राहण्याची गरज यामुळे मानसिक थकवा वाढू शकतो. हॉस्पिटलमधील ताण संपला की घरी मुलांची, कुटुंबाची आणि घरातील जबाबदाऱ्यांची दुसरी शिफ्ट सुरू होते. त्यामुळे स्वतःसाठी वेळ मिळणे अनेकदा कठीण होते.

गर्भधारणा आणि मातृत्व हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा आहे. परंतु अनेक महिला आरोग्य कर्मचाऱ्यांना गर्भावस्थेतही दीर्घकाळ उभे राहून काम करावे लागते. प्रसूतीनंतर लवकर कामावर रुजू होणे, स्तनपानाचे नियोजन आणि बाळाची काळजी यामुळे त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर ताण येऊ शकतो. अशा काळात कुटुंब, सहकारी आणि संस्थेचा आधार अत्यंत महत्त्वाचा असतो.

महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे ही आपल्या समाजातील एक मोठी समस्या आहे आणि आरोग्य क्षेत्रातील महिला त्याला अपवाद नाहीत. नियमित आरोग्य तपासणी, हिमोग्लोबिन, थायरॉईड, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी१२ यांची तपासणी, पुरेशी झोप, संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि मानसिक विश्रांती याकडे त्यांनीही तितकेच गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. स्वतःची काळजी घेणे हा स्वार्थ नसून ती स्वतःप्रती आणि आपल्या रुग्णांप्रती असलेली जबाबदारी आहे.

डॉक्टर दिनाच्या निमित्ताने आरोग्य क्षेत्रातील प्रत्येक महिलेच्या समर्पणाला सलाम करताना, त्यांच्या आरोग्याचाही तितकाच विचार करण्याची गरज आहे. कारण निरोगी महिला आरोग्यसेवकच अधिक सक्षमपणे समाजाची सेवा करू शकते.

स्टेथोस्कोपच्या पलीकडे पाहिले तर आपल्याला एक डॉक्टरच नाही, तर अनेक भूमिका पार पाडणारी एक स्त्री दिसते. तिच्या चेहऱ्यावरील हसू, तिची सेवा आणि तिचा आत्मविश्वास टिकून राहण्यासाठी तिचे आरोग्य जपणे ही केवळ तिचीच नाही, तर कुटुंब, कार्यस्थळ आणि समाजाचीही सामूहिक जबाबदारी आहे.

- डॉ. श्वेता राऊत मुळगावकर