Home >> ती >> आयुष्य क्षणभंगुर : जपा स्वतःला, जपा माणुसकीला

आयुष्य क्षणभंगुर : जपा स्वतःला, जपा माणुसकीला

जीवन आज धोक्याचे झाले आहे. आजचा दिवस खास असला, तरी उद्याचा दिवस काय घडवून आणेल याची शाश्वती नाही.

Story: ललित |
26th June, 09:51 pm
आयुष्य क्षणभंगुर : जपा स्वतःला, जपा माणुसकीला

"अ​पघातात महिला ठार", "ओव्हरटेक करताना युवकाचा मृत्यू", "भरधाव वाहनाची धडक" अशा अनेक मथळ्या आज वर्तमानपत्रांत वाचायला मिळतात. या बातम्या वाचताना मन हेलावून जाते. कारण अपघातात जीव गमावलेली व्यक्ती कोणाचा तरी भाऊ, पती, वडील किंवा मुलगा असते. पण नियतीच्या खेळामुळे कुटुंबाला आपल्या प्रिय व्यक्तीला गमवावे लागते. घरातून आनंदाने बाहेर पडलेली व्यक्ती संध्याकाळी सुरक्षितपणे परत येईल याची खात्री राहिलेली नाही. त्यामुळे अपघात ही केवळ एक बातमी नसून, अनेक कुटुंबांच्या आयुष्यात दुःखाचे सावट निर्माण करणारी वास्तव घटना बनली आहे.

आज गोव्याची परिस्थिती पाहताना याच एका महिन्यात कित्येक अपघात होऊन अनेकांनी आपला जीव गमावला. काहीजण स्वयंअपघातात मृत्यू पावले, काहीजण अती वेगाने वाहन चालवताना जीव गमावून बसले, तर काहीजण दुचाकींच्या धडकेत मृत्यूमुखी पडले. हे सर्व पाहताना खूप वाईट वाटते. पण आपण कधी विचार करतो का की आजच्या काळात अपघात वाढण्याचे कारण नेमके काय आहे? 

पहिली गोष्ट म्हणजे रस्त्यांची झालेली दुर्दशा. अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत, त्यामुळे वाहनचालकांचे नियंत्रण सुटते आणि अनेकदा अपघात होतात. दुसरी गोष्ट म्हणजे माणसाचे धावपळीचे जीवन. आज माणसाला प्रत्येक गोष्ट वेगाने साध्य करायला हवी आहे आणि त्यामुळेच मागचा-पुढचा विचार न करता अनेकजण भरधाव वेगाने वाहन चालवतात आणि एका चुकीमुळे आपला जीवन गमावून बसतात. मात्र त्या वेळी आपल्या कुटुंबाचा किंवा जवळच्या माणसांचा विचार करत नाहीत. आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे वाहनांची वाढती संख्या. हजारो वाहने आज रस्त्यावर धावताना दिसतात. जणू एकमेकांशी स्पर्धा सुरू असल्यासारखे लोक वाहन चालवतात. पण आपला जीव धोक्यात येऊ शकतो, याचा विचार मात्र कुणीही करत नाही.

सर्वप्रथम, शासनाने मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे आणि त्याची नियमित तपासणी योग्य पद्धतीने केली पाहिजे. कारण अनेक ठिकाणी मृत्यू झालेल्या माणसाची काहीच चूक नसताना त्याला आपला जीव गमवावा लागतो. कारण, समोरचा माणूस वाहन नियमित स्वरूपाने चालवत नाही, धुंदीत असल्याने अपघात होतो.  तसेच वाहन चालवणाऱ्या व्यक्तीकडे वैध परवाना आहे की नाही, तसेच तो वाहन चालविण्यासाठी कायदेशीर वयाचा आहे की नाही याचीही खात्री केली पाहिजे. अति वेगाने वाहन चालवणाऱ्यांवर कठोर पावले उचलली पाहिजेत. वाहतूक नियमांचे काटेकोर पालन झाले, तर अपघातांचे प्रमाण काही प्रमाणात कमी होऊ शकते.

आजची परिस्थिती पाहता असे दिसून येते की, या काळात आपण स्वतःबरोबरच आपल्या आजूबाजूच्या सर्वांची काळजी घेतली पाहिजे. कारण आज आपल्यासोबत असलेली व्यक्ती उद्या असेलच याची खात्री नाही. हल्ली अपघात इतके वाढले आहेत की घरातून बाहेर पडतानाही काळजी वाटते. आयुष्य खूप छोटे आहे. त्यामुळे एकमेकांचा अपमान किंवा द्वेष करण्याऐवजी सन्मानाने जगले पाहिजे. तसेच आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही समजुतीच्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत. म्हणून नेहमी एकमेकांच्या सहवासात राहून आयुष्याचे जतन करा. वाहन चालवताना आपल्या कुटुंबाचा आणि आपल्या सुरक्षिततेचा विचार करा.

 त्यामुळे प्रत्येकाने याची जाणीव ठेवली पाहिजे;

 रस्त्यावर वेग नव्हे, विवेक हवा, 

जीवन जगण्यासाठी सुरक्षित श्वास हवा. 

 घराबाहेर पडताना आपल्या माणसांचा विचार हवा; 

 उशीर झाला तरी चालेल, पण 

 स्वतःचा जीव जपण्याचा विचार प्रत्येकाला हवा.

- पूजा भिवा परब

पालये, पेडणे