शरीराला चरबी जाळायला शिकवण्याची गरज नसते; ते काम शरीर आधीपासूनच करत असते. खरा उद्देश असा असायला हवा की शरीराला साठवलेली चरबी गरजेनुसार कार्यक्षमतेने वापरता यावी. त्यासाठी योग्य पोषण, स्नायूंचे आरोग्य, चांगली झोप, नियमित हालचाल आणि चांगले चयापचयी आरोग्य यांचा पाया मजबूत असणे आवश्यक आहे.

फॅट लॉस समजून घेण्यासाठी दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. शरीर आधीच चरबीचा वापर ऊर्जा स्रोत म्हणून करत असते. विश्रांतीच्या अवस्थेत हृदय, यकृत, मूत्रपिंड आणि स्नायू यांसारख्या अनेक ऊती ऊर्जेसाठी मोठ्या प्रमाणात चरबीचा वापर करतात. म्हणजेच चरबी जाळणे ही फक्त व्यायाम किंवा उपवासामध्ये घडणारी विशेष प्रक्रिया नाही. ती शरीरातील नैसर्गिक आणि सतत चालणारी प्रक्रिया आहे.
चयापचय व्यवस्थित कार्य करत असताना शरीर गरजेनुसार ग्लुकोज आणि चरबी या दोन्ही इंधनांचा वापर करू शकते. जेवणानंतर ग्लुकोजचा वापर वाढतो, तर जेवणांमधील काळात, झोपेमध्ये किंवा हलक्या हालचालींमध्ये शरीर चरबीचा अधिक वापर करते. या क्षमतेला “मेटाबॉलिक फ्लेक्सिबिलिटी” असे म्हणतात.
मग प्रश्न असा निर्माण होतो की जर शरीर सतत चरबीचा वापर करत असेल, तर वाढलेली चरबी कमी करणे अनेकांना इतके कठीण का वाटते?
याचे उत्तर शरीराच्या चरबी जाळण्याच्या क्षमतेमध्ये नसून, साठवलेल्या चरबीपर्यंत पोहोचण्याच्या आणि तिचा कार्यक्षम वापर करण्याच्या क्षमतेमध्ये दडलेले आहे.
इन्सुलिन रेझिस्टन्स विकसित झाल्यास ही क्षमता कमी होऊ शकते. इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे शरीरातील पेशी इन्सुलिनला अपेक्षित प्रतिसाद देत नाहीत अशी अवस्था. त्यामुळे शरीराला अधिक इन्सुलिन तयार करावे लागते. कालांतराने रक्तातील इन्सुलिनची पातळी जास्त राहू शकते. अशा परिस्थितीत शरीरात ऊर्जा चरबीच्या स्वरूपात साठवलेली असली तरी तिचा वापर करणे तुलनेने कठीण जाऊ शकते. महत्त्वाचे म्हणजे, इन्सुलिन रेझिस्टन्स ही केवळ मध्यमवयीन किंवा मधुमेह असलेल्या व्यक्तींची समस्या नाही. आधुनिक जीवनशैलीमुळे तिची सुरुवात अनेकदा तरुण वयातही होऊ शकते.
चरबी वाढण्यामागे एकच कारण नसते. शरीराला गरजेपेक्षा जास्त ऊर्जा दीर्घकाळ मिळणे हा त्यातील एक महत्त्वाचा घटक आहे. मात्र झोपेची कमतरता, तणाव, कमी हालचाल, स्नायूंची घट, अतिप्रक्रिया केलेले अन्न, हार्मोनल बदल आणि इन्सुलिन रेझिस्टन्स यांसारखे घटकही त्यामध्ये भूमिका बजावू शकतात. त्यामुळे चरबी वाढणे ही केवळ इच्छाशक्ती किंवा जास्त खाण्याची समस्या नसून अनेक जैविक आणि जीवनशैलीशी संबंधित घटकांचा परिणाम असू शकते.
उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून पाहिले तर, मानवी शरीराची रचना अन्नटंचाई आणि इतर धोक्यांच्या वातावरणात झाली आहे. त्यामुळे अपुरी झोप, दीर्घकालीन ताण किंवा वारंवार डाएटिंग यांसारख्या गोष्टी शरीरासाठी तणावाचे संकेत ठरू शकतात. याचा परिणाम भूक, ऊर्जा वापर आणि चरबी साठवण्याशी संबंधित प्रक्रियांवर होऊ शकते.
त्यामुळे फॅट लॉसचा प्रश्न केवळ “किती खाल्ले?” यापुरता मर्यादित राहत नाही, तर “शरीराला उपलब्ध ऊर्जा वापरता येते का?” हाही तितकाच महत्त्वाचा प्रश्न ठरतो.
याच ठिकाणी पोषणशास्त्राची भूमिका महत्त्वाची ठरते.
फॅट लॉससाठी अनेक जण फक्त कमी खाण्यावर भर देतात. परंतु शरीराला केवळ कमी अन्न नव्हे, तर योग्य पोषणाची गरज असते. दीर्घकाळ अत्यल्प कॅलरी घेणे, प्रथिनांची कमतरता किंवा एकांगी आहार यामुळे स्नायूंची झीज होऊ शकते आणि चयापचयावरही परिणाम होऊ शकतो.
सुदैवाने, इन्सुलिन रेझिस्टन्स आणि चयापचयी आरोग्य सुधारण्यासाठी कोणताही जादुई उपाय आवश्यक नाही. पुरेशा प्रमाणात प्रथिने, फायबर आणि निरोगी फॅट्स असलेला आहार, चांगली झोप, तणावाचे व्यवस्थापन आणि नियमित हालचाल यामुळे शरीराची ऊर्जा वापरण्याची क्षमता सुधारू शकते. निरोगी फॅट्स हार्मोन्सची निर्मिती, पेशींचे आरोग्य आणि काही जीवनसत्त्वांच्या शोषणासाठी आवश्यक असतात. त्यामुळे फॅट लॉस म्हणजे आहारातून फॅट पूर्णपणे काढून टाकणे असा अर्थ होत नाही.
हालचाल म्हणजे केवळ ठराविक वेळेचा व्यायाम नव्हे. चालणे, जेवणानंतर थोडा फेरफटका मारणे, घरातील कामे, जिने चढणे, फोनवर बोलताना चालणे, अधूनमधून उठून उभे राहणे किंवा हलके स्ट्रेचिंग करणे यांसारख्या दैनिंदिन हालचालींचाही ऊर्जा खर्चामध्ये महत्त्वाचा वाटा असतो. त्यामुळे दिवसभर सक्रिय राहणे हे चांगल्या चयापचयी आरोग्यासाठी आणि फॅट लॉससाठी महत्त्वाचे ठरते.
फॅट लॉसमध्ये व्यायामाचे महत्त्व नक्कीच आहे. चालणे, नियमित हालचाल आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग यामुळे इन्सुलिन संवेदनशीलता सुधारण्यास, स्नायू टिकवून ठेवण्यास आणि चयापचयी आरोग्य जपण्यास मदत होते. मात्र व्यायाम आणि पोषण यांना एकमेकांचे पर्याय म्हणून पाहणे योग्य नाही. दोन्हींची भूमिका परस्परपूरक आहे.
शरीराला चरबी जाळायला शिकवण्याची गरज नसते; ते काम शरीर आधीपासूनच करत असते. खरा उद्देश असा असायला हवा की शरीराला साठवलेली चरबी गरजेनुसार कार्यक्षमतेने वापरता यावी. त्यासाठी योग्य पोषण, स्नायूंचे आरोग्य, चांगली झोप, नियमित हालचाल आणि चांगले चयापचयी आरोग्य यांचा पाया मजबूत असणे आवश्यक आहे. त्यामुळे फॅट लॉस हा केवळ चरबी जाळण्याचा नव्हे, तर त्यासाठी योग्य वातावरण निर्माण करण्याचा विषय आहे. दीर्घकाळ टिकणारा फॅट लॉस हा उपासमारीचा नव्हे, तर योग्य पोषण, निरोगी चयापचय आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या सवयींचा परिणाम असतो.
- डॉ. स्नेहल नाईक
म्हार्दोळ