Home >> ती >> ती गेली तेव्हा...

ती गेली तेव्हा...

मी अजूनही प्रयत्न करतेय, आई. स्वतःला सावरण्याचा, खंबीर राहण्याचा आणि परिस्थितीशी लढा देत पुढे जात राहण्याचा मी रोज एक नवा निर्धार करतेय. अगदी माझं मन, माझं शरीर पूर्णपणे थकून गेलं असलं, तरीही मी हार मानलेली नाही.

Story: आठवण |
26th June, 09:41 pm
ती गेली तेव्हा...

प्रिय आई,

"स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी..." असं म्हणतात ते किती शंभर टक्के खरं आहे, याचा प्रत्यय मला आज पावलोपावली येतोय. माणसाकडे जगातली सगळी सुखं, संपत्ती, पद आणि प्रतिष्ठा असली, तरी आईच्या मायेची ऊब नसेल तर ते सगळं वैभव अगदी शून्य वाटतं. तुझ्याशिवाय हे जग कितीही मोठं आणि गर्दीने भरलेलं असलं, तरी माझ्यासाठी ते अगदी रिकामं आणि एकाकी आहे. या अथांग जगात तुझ्याइतकं निखळ आणि निस्वार्थी प्रेम मला दुसरं कोणीच देऊ शकत नाही.

आजकाल मला तुझी खूप म्हणजे खूप आठवण येतेय. कधीकधी ही आठवण मनाला इतकी विळखा घालते की गळा दाटून येतो. सध्या आयुष्य खूप कठीण आणि गुंतागुंतीचं वाटायला लागलंय. रोज सकाळी जेव्हा डोळे उघडतात, तेव्हा मनावर एक अनामिक दडपण असतं. तरीही, कसंही करून फक्त तो दिवस ढकलण्याचा आणि जगण्याचा मी अतोनात प्रयत्न करतेय. दिवसभर जबाबदाऱ्यांचं ओझं वाहताना जीव मेटाकुटीला येतो. जगाच्या नजरेत सगळं काही अगदी सामान्य, सुरळीत आणि हसतखेळत चाललेलं असतं. लोकांसमोर वावरताना माझ्या चेहऱ्यावरचा हसू पाहून कोणाला शंकाही येत नाही, पण माझ्या अंतर्मनात काय चाललंय हे फक्त मलाच ठाऊक आहे. आतून मी पूर्णपणे थकलेय आणि माझं मन कमालीचं जड झालंय. दिवसभरात असे अनेक क्षण येतात जेव्हा मी लोकांशी बोलते, हसते, कामात स्वतःला गुंतवून घेते; पण मनाच्या एका कोपऱ्यात कुठेतरी सतत एक पोकळी जाणवत राहते. मला असं वाटायला लागलंय की मी हळूहळू आतून खूप तुटत चाललेय. हे बाहेरचं हसणं फक्त एक मुखवटा आहे ग! कोणालाही न दिसणारं, न समजणारं एक अदृश्य दुःख मनात बाळगून, मी रोज आतून थोडं थोडं मरत असल्यासारखं मला जाणवतंय. या गर्दीत माझं मरणारं मन कोणाला दिसतही नाही आणि कोणाला त्याची पर्वा ही नाही. अशा वेळी मनापासून वाटतं की, तू इथे माझ्यासोबत असावीस. तू धावत यावंस, माझा हात तुझ्या हातात घ्यावास आणि माझ्या पाठीवरून, केसांवरून मायाळू हात फिरवत म्हणावंस, 'सगळं काही ठीक होईल गं बाळा, काळजी नको करू, मी आहे ना तुझ्यासोबत!' तुझ्या त्या एका शब्दाने माझ्यावरचा सगळा ताण हलका होईल. तुझ्या कुशीत डोकं ठेवून ढसाढसा रडावंसं वाटतंय, जेणेकरून मनावर साचलेलं सगळं ओझं वाहून जाईल.

पण तरीही, मी अजूनही प्रयत्न करतेय, आई. स्वतःला सावरण्याचा, खंबीर राहण्याचा आणि परिस्थितीशी लढा देत पुढे जात राहण्याचा मी रोज एक नवा निर्धार करतेय. अगदी माझं मन, माझं शरीर पूर्णपणे थकून गेलं असलं, तरीही मी हार मानलेली नाही. शब्दांत कधीच बांधता येणार नाही इतकी तुझी आठवण मला प्रत्येक क्षणाला छळतेय. या संपूर्ण जगात मला कशाचीही हाव नाही, मला फक्त तुझं ते निखळ, पवित्र प्रेम हवंय आणि माझ्या या धावपळीच्या, अशांत आयुष्यात थोडी शांतता हवी आहे. तू फक्त सदैव माझ्या पाठीशी राहा, एवढीच या लेकीची इच्छा आहे.

- साची कवठणकर