Home >> ती >> शाळेची सहल शिक्षकांचा कस अन पालकांची धडधड

शाळेची सहल शिक्षकांचा कस अन पालकांची धडधड

शालेय जीवनातील सहल जेवढी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची असते, तेवढीच ती शिक्षकांसाठी आव्हानात्मक असते. एका शिक्षिकेने अनुभवलेली सहलीची धडधड, कडू-गोड आठवणी आणि पालक झाल्यानंतर बदललेला दृष्टिकोन मांडणारा हा रंजक लेख.

Story: सहज सुचलेलं |
19th June, 09:27 pm
शाळेची सहल  शिक्षकांचा कस अन पालकांची धडधड

​​शाळेत असताना बघा अभ्यास तर असतोच, अगदी आपल्या मागे लागलेल्या परीक्षा असतातच. कधी कधी यातच पालक आणि विद्यार्थी बुडून जातात. अर्थात यातून जरा विरंगुळा मिळावा, चेंज मिळावा यासाठी खेळ, पिकनिक, गॅदरिंगही असतात म्हणा तोंडी लावायला.

​शिक्षिका या नात्याने एक गोष्ट सांगू, रोजचा अभ्यास, खेळ वगैरे खूप सोपे असते हो फार; विद्यार्थ्यांनाही आणि शिक्षकांनाही. निदान ते एका ठराविक आवारात, ठराविक साच्यातच होतात. गॅदरिंगही तसेच अगदी, पण पिकनिक आणि तीसुद्धा लहान शाळकरी मुलांची! अरे बाप रे! हा एक प्रकार खरा आव्हानात्मक आम्हा शिक्षकांसाठी. निदान मला तरी वर्गात पिकनिकची नोटीस फिरली की जरा धडकीच भरायची छातीत. एकतर बऱ्याचदा सहल प्रमुख म्हणून माझीच निवड व्हायची शाळेतून. गॅदरिंगला पुढे पुढे नाचणाऱ्या इतर शिक्षिका शहाजोगपणे आपले अंग काढून घ्यायच्या या प्रकारातून. त्यामुळे आमचा स्कूल टीव्ही बकरा अगदी ठरलेला दरवर्षी. असो!

​तर अशी ही वर्षासहल. प्रमुख म्हणून माझी नेमणूक व्हायची. शक्यतो पहिली ते चौथीचे वर्ग असायचे सहलीला येणारे. वर्गात नोटीस फिरली की अगदी दहा मिनिटे तरी कल्लोळ असायचा अगदी. अर्थात पहिलीच्या विद्यार्थ्यांना सहल आणि ती किती कळणार? पण इतर कल्ला करतात म्हणून आपणसुद्धा करायचा. नेहमीप्रमाणे सुरुवातीला अख्खा वर्ग नावे द्यायचा, "बाई मी येणार, मी येणार" करून. पण मग नेमका सहलीचा दिवस येईपर्यंत त्यातली अर्धी मुले गळायची. अर्थात पालकांचीही स्पष्टीकरणे भन्नाट असायची अगदी. कोणाची यावर्षी आजी मेली, तर कोणाच्या घरी त्याच दिवशी पूजा आहे वगैरे अनेक कारणे असत. एकदा तर एका पालकाने चिठ्ठी पाठवली, त्यात लिहिले होते की 'कदाचित माझा पाल्य त्या दिवशी तापाने आजारी पडू शकतो' म्हणून. हसावे का रडावे हेच कळत नसे, पण काय करणार? शाळेचे नियम महत्त्वाचे. मग काय, शंभरातली तीस एक मुले मारून-मुटकून पिकनिकला तयार करायचो आम्ही.

​अर्थात मुले लहान हो, पालकांनाही भीती असायचीच जशी आम्हाला वाटायची. ही मुलं खूपच अल्लड असतात हो! धड मोठीही नाही आणि धड लहानही नाही. सतत लक्ष ठेवावे लागते. ही सहल संपली की प्रत्येक टीचरचे डोके आणि तोंड दुखायचेच अगदी.

​एके वर्षी असाच एक किस्सा घडला; अर्थात विनोदी नाही पण जरा धडकी भरेल असाच. आमच्या नवीन प्रमोशन मिळालेल्या हेड बाईंनी वर्षासहल न्यायची ठरवली एका वर्षी. आधीच साध्या सहलीच्या आयोजनाला घाबरणारी मी, वर्षासहलीला नकारच दिला. शेवटी हेड बाई स्वतः प्रमुख म्हणून तयार झाल्या. आम्ही आपले बरोबर त्यांच्या. सहल ठरली नेरळ येथे, निसर्गरम्य वातावरणात पावसात भिजण्यासाठी. त्यात ज्या दिवशी सहल ठरली, त्या दिवशी पाऊसही अगदी भन्नाट कोसळत होता. मुंबईत ना पाऊस पडत नाही, अक्षरशः कोसळतो. बऱ्याच पालकांनी विरोध केला, पण हेड बाई मानल्या नाहीत. शेवटी बस निघाली सहलीला. पोरांना काय सोयरसुतक नव्हते पावसाचे. त्यांच्या डोक्यात फक्त आपल्याला रेनकोट घालून मस्त पावसात हुंदडायला मिळणार, हीच स्वप्ने तरंगत होती.

​नेरळ जवळ येऊ लागले तसा पाऊसही वाढला. रस्ता जरा चढ-उताराचा होता. उतारावर असलेल्या पाण्यातून बस जरा चढावावर आली आणि अचानक थांबली टेकडीच्या मध्यावर. समोर काय, तर टेकडीच्या पुढल्या उतारावर सगळे पाणी भरलेले. बस धड पुढेही नाही आणि मागेही नाही अशी परिस्थिती! बरं बाहेर तुफान पाऊस, पाणी ओसरायचे नाव घेत नव्हते. आता मुलेही घाबरली. आनंदाने म्हणायच्या गाण्यांचे थेट रडण्यात रूपांतर झाले. त्यात फोन बंद. आता बराच वेळ गेला. मुलांचा गोंधळ, रडणे... त्या बसमधील परिस्थिती वाईट झाली. संध्याकाळी चार वाजता पाऊस थांबला, मग पाणी ओसरू लागले. शेवटी बस परत फिरवली आणि परत शाळेत हजर. अर्थात ही आमची पहिली आणि शेवटची वर्षासहल ठरली.

​तर अशा अनेक गोष्टी होत. सहलीत कधी एखादा मुलगा सापडायचाच नाही. मग त्याला शोधण्यात आणि सापडल्यावर त्याला ओरडण्यात अजून वेळ जायचा. शाळेत काही थोराड, खोडकर मुलेही असायची. वर्षभर दुर्लक्षित असलेल्या अशा विद्यार्थ्यांना सहलीच्या वेळेस मोठा भाव असायचा. अहो, मुले शिक्षकांपेक्षा या विद्यार्थ्यांनाच जास्त घाबरायची ना? असो!

​अशा अनेक गमतीजमती, प्रसंग घडत सहलीत. प्रत्येक सहल एका वेगळ्या कारणाने लक्षात राहत असे. आता मी शिक्षिका नाही पण पालक मात्र आहे. आधी पालकांनी मुलांना सहलीला पाठवावे म्हणून आग्रह धरणारी, क्वचित प्रसंगी जबरदस्ती करणारी मी, आता माझ्या मुलीला मात्र सहलीला पाठवताना शंभर वेळा विचार करते. काय करणार, आई पडले ना...

- सौ. रेशम जयंत झारापकर

मडगाव-गोवा