खरंच, प्रत्येक अपूर्ण गोष्ट पूर्ण करणं शक्यच नसतं. कारण काही लोक परत भेटत नाहीत. काही संवाद कायमचे हरवून जातात. पण मनाला केवळ उत्तरं हवी असतात असं नाही, त्याला अर्थही हवा असतो.

वयाच्या उत्तरार्धात स्मृती धूसर होत चालल्या आहेत. वर्तमान हातातून निसटत आहे. चेहरे विसरले जात आहेत. पण एक गोष्ट मात्र मन सोडायला तयार नाही.
फाळणीपूर्वीची एक अपूर्ण कथा.
इम्तियाज अली यांच्या मैं वापस आऊंगा या चित्रपटात नसीरुद्दीन शाह यांनी साकारलेली व्यक्तिरेखा डिमेन्शियाशी झुंजत असताना, त्याच्या मनात वर्तमानापेक्षा भूतकाळ जास्त जिवंत होत जातो. आणि त्या भूतकाळातही त्याला सतावत राहते ती एखादी पूर्ण झालेली आठवण नाही, तर न सांगितलेली, न जगलेली, अपूर्ण राहिलेली गोष्ट. चित्रपट पाहताना एक प्रश्न मनात येतो, एवढ्या वर्षांनंतरही काही गोष्टी मनातून का जात नाहीत?
पूर्ण झालेल्या गोष्टींपेक्षा अपूर्ण राहिलेल्या गोष्टी जास्त लक्षात राहतात, असं मानसशास्त्रज्ञ ब्लुमा झायगर्निक यांनी मांडलं. यालाच Zeigarnik Effect म्हणतात.
मात्र हा प्रभाव फक्त अर्धवट राहिलेल्या कामांपुरता मर्यादित नाही.
तो न बोललेल्या शब्दांमध्येही असतो.
न झालेल्या भेटीत असतो.
न मागितलेल्या माफीत असतो.
आणि कधी कधी, न जगलेल्या आयुष्यातही असतो.
समुपदेशन करताना अनेकदा असं जाणवतं की लोक व्यक्तीला विसरलेले असतात, पण त्या व्यक्तीशी संबंधित एखादा अपूर्ण संवाद मात्र अजूनही मनात जिवंत असतो.
“त्या दिवशी मी तिला थांबवायला हवं होतं.”
“एकदा तरी बाबा जिवंत असताना त्यांना धन्यवाद म्हणायला हवं होतं.”
“मी त्याची माफी मागितलीच नाही.”
“मी चित्रकार व्हायचं स्वप्न पाहिलं होतं. पण कधी प्रयत्नच केला नाही.”
अशा आठवणींना कालमर्यादा नसते.
मनोविश्लेषणात्मक दृष्टिकोनातून पाहिलं तर मनाला गोष्टी पूर्ण करायची, त्यांना अर्थ द्यायची गरज असते. म्हणूनच अपूर्ण अनुभव मनाच्या एका कोपऱ्यात उघड्या फाईलसारखे पडून राहतात. वर्तमानातील एखादा वास, गाणं, रस्ता किंवा एखादं वाक्य त्या फाईलला पुन्हा उघडतं. फ्रॉईडने 'The Return of the Repressed' विषयी लिहिताना सांगितलं होतं की दाबून ठेवलेल्या भावना नाहीशा होत नाहीत. त्या वेगवेगळ्या रूपात परत येतात. एखाद्या स्वप्नातून, जुन्या गाण्यातून किंवा अचानक डोळ्यांत आलेल्या अश्रूंमधून.
ह्या विषयी Object Relations Theory देखील सांगते की माणसं आपल्या बाहेर जितकी जगतात, तितकीच ती आपल्या आतही जगत असतात. म्हणूनच काही नाती संपली तरी त्यांच्याशी संबंधित मानसिक बंध संपत नाहीत.
खरं तर अनेकदा आपण व्यक्तीला आठवत नसतो, तर त्या व्यक्तीबरोबरचा स्वतःचाच एखादा भाग आठवत असतो. आई गेल्यानंतर फक्त आईची अनुपस्थिती जाणवत नाही, तिच्याबरोबर असलेलं आपलं बालपणही कुठेतरी हरवल्यासारखं वाटतं. एखादं नातं संपतं तेव्हा फक्त समोरची व्यक्ती दूर जात नाही, त्या नात्याशी जोडलेली भविष्यातली स्वप्नं, कल्पना आणि स्वतःची एक प्रतिमाही तुटते. म्हणूनच काही लोकांना त्या व्यक्तीपेक्षा “अस झालं असतं तर...” हा प्रश्न जास्त सतावत राहतो. आणि कदाचित ह्याचसाठी काही वृद्ध लोक अचानक जुन्या गोष्टींची उजळणी करू लागतात. बालपणीचा एखादा मित्र, न मिळालेली नोकरी, न जुळलेलं नातं, गाव सोडतानाचा दिवस. बाहेरून पाहताना त्या आठवणी विस्कळीत वाटतात. पण मनासाठी त्या विस्कळीत नसतात. त्या अजूनही पूर्ण होण्याची वाट पाहणाऱ्या कथा असतात.
एरिक एरिक्सन यांनी देखील म्हटलं आहे की आयुष्याच्या उत्तरार्धात माणूस नकळत स्वतःच्या आयुष्याचा हिशोब मांडत असतो. “मी जे जगलो, त्याला काही अर्थ होता का?” या प्रश्नाचं उत्तर शोधताना काही अव्यक्त गोष्टी पुन्हा वर येतात. त्या फक्त आठवणी नसतात, त्या स्वतःच्या अस्तित्वाशी संबंधित असतात.
म्हणूनच डिमेन्शियाने वर्तमान धूसर केलं, तरी मैं वापस आऊंगा मधील त्या वृद्धाच्या मनाने अपूर्ण कथेला सोडलं नाही. कारण ती कथा फक्त एका व्यक्तीची नव्हती. ती त्याच्या ओळखीचा, त्याच्या प्रेमाचा आणि त्याच्या आयुष्याला अर्थ देणाऱ्या अनुभवांचा एक भाग होती. खरंच, प्रत्येक अपूर्ण गोष्ट पूर्ण करणं शक्यच नसतं. कारण काही लोक परत भेटत नाहीत. काही संवाद कायमचे हरवून जातात. पण मनाला केवळ उत्तरं हवी असतात असं नाही, त्याला अर्थही हवा असतो. म्हणूनच अनेकदा माणसं पत्रं लिहितात, डायरी लिहितात, जुन्या फोटोंशी बोलतात, आठवणींना कवितेत उतरवतात.
लक्षात घ्या, प्रत्येक कथेला शेवट मिळतोच असं नाही. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळतंच असं नाही.
आणि म्हणूनच...
काही कथा संपत नाहीत.
त्या फक्त मनात राहतात.
शांतपणे. अव्यक्तपणे. आयुष्यभर.
- मानसी कोपरे
मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशक, डिचोली - गोवा
७८२१९३४८९४