अशी एक सखी असावी, जिच्यासोबत आपण आपले आयुष्य वाचून दाखवावे, जिच्याशी मनसोक्त बोलावे, हसावे आणि खांद्यावर डोकं टेकवून शांत राहावे. आणि अशीच एक माझी सखी आहे - सुजाता. ती मला मैत्रिणीपेक्षा बहीणच जास्त वाटते.

काही क्षण असे जपावे,
जे कधीच निसटून जाऊ नयेत
असा प्रेमाचा पाऊस पडावा
ज्याने नात्यांचा गुंता सुटून जावा
निळ्याभोर आकाशा, किती सुंदर आहे तुझी व्याख्या! सर्वांना गुरफटून, गोलगोल फिरवून आपल्याच मुठीत ठेवण्याची कला तुझ्याकडूनच शिकावी. सर्वांना नेहमी निळेशार दिसणारे आकाश आज मला का कोणास ठाऊक काळेकुट्ट दिसत आहे? मी मारलेली हाक त्यांना ऐकूच येऊ नये, असा का बरं अबोला धरावा?
नियतीने दिलेली प्रत्येक गोष्ट मी गोड मानून घेतली. आलेल्या प्रत्येक संकटावर मात केली. कोणत्याही तक्रारीशिवाय मी प्रत्येक क्षण जगत आले. मनात कितीही दुःख असले तरी तोंडावर हसू ठेवून स्वच्छंदपणे बागडणे मी तुझ्याकडूनच तर शिकले. माझ्या स्पष्टवक्तेपणामुळे काही माणसे दुखावलीही असतील, पण मला त्यांची खंत नाही; कारण मुळात ती माझी नव्हतीच. जी माझी होती, ती मला सहन करून, सांभाळून घेत आहेत.
माझे हळवे मन, भावूक वृत्ती आणि दुसऱ्यांना मदत करण्याचा स्वभाव कधी-कधी मलाच त्रासदायक ठरायचा. कारण जेवढे दुसऱ्यासाठी काही करावे, तेवढेच ते अंगाशी यायचे. मला चांगल्या-वाईट माणसांची पारखही होत नव्हती. खरं तर मी नात्यांच्या गुंत्यात अडकत चालले होते. कोणाशी किती अंतर ठेवावे आणि किती जवळीक असावी, याची मनात सतत घालमेल चालू
असायची.
असे म्हणतात की, आपले नातलग एकमेकांबरोबर असले की सुख-दुःखाच्या वेळी ते आपल्या उपयोगी पडतात. अडीअडचणीला एकमेकांवर अवलंबून राहिल्याने कामे सरळ आणि चांगल्या पद्धतीने होऊ शकतात; सुखाचा प्रत्येक क्षण आपण साजरा करू शकतो. पण माझ्या मते, असंही म्हणतात की 'अति तिथे माती'. जास्त जवळीक ठेवली की नातेसंबंध बिघडतात. कधीतरी सणासुदीला भेटून, एकमेकांची विचारपूस करून, चांगल्या-वाईट गोष्टींची खबरबात घेऊन वेळेत निघून जावे; यातच नाती चांगली टिकून राहू शकतात. आता इथेही एक प्रकारचा गुंताच आहे.
रक्ताच्या नात्यापेक्षा इतर काही नाती खूप सुंदर असू शकतात, जसे की मैत्रीचे नाते. काही वेळा आपण प्रवासातल्या अनोळखी वाटसरूजवळ सुद्धा मन मोकळे करू शकतो आणि ते नातेसुद्धा सुंदर बनू शकते. मला असाच एक प्रसंग आठवला.
प्रवासात मला एक व्यक्ती भेटली. बसमध्ये त्या बसलेल्या होत्या आणि मी उभी होते. त्यांनी माझी बॅग स्वतःजवळ घेतली. काही वेळ आम्ही बोललो. त्यांच्या बोलण्यातून मला कळले की त्या एक शिक्षिका होत्या. मी त्यांना म्हणाले, "तुम्ही मला आवडलात. मला तुमचा नंबर मिळू शकतो का? खरं तर मी खूप तणावात आहे आणि मला तुमच्याशी बोलावेसे वाटतेय." त्यांनी मला नंबर दिला. मला माहित नाही का, पण त्यांच्याशी मला मन मोकळे करावेसे वाटले. मी म्हणाले, "कधी-कधी हक्काच्या माणसापेक्षा प्रवासातल्या माणसाकडे मन मोकळे करावेसे वाटते." त्यावर त्या ताडकन बोलल्या, "मग कर ना मन मोकळे! कदाचित माझ्यामुळे तू टेंशन फ्री होशील."
मी त्यांच्यासमोर व्यक्त होत होते आणि त्या माझ्या डोळ्यांत एकटक पाहत होत्या. मला समजून घेण्याचा प्रयत्न करत होत्या. सगळे काही ऐकून घेतल्यावर शेवटी त्या म्हणाल्या, "हे बघ शितल, वेळ हे प्रत्येक गोष्टीवरचे औषध असते. काही दिवस गेल्यावर आपोआप सगळे प्रश्न सुटतील आणि बघ, काहीच दिवसांत तू ५०% हून अधिक तणावमुक्त होशील." मला त्यांच्यातली शिक्षिका जाणवली. त्या म्हणाल्या, "तू जास्त विचार करतेस, अशाने आजारी पडशील." मी त्यांचे आभार मानले आणि त्या बसमधून उतरल्या. खरंच, काहीच दिवसांत मी तणावमुक्त झाले. धन्यवाद ज्योती ताई! मी ५०% नाही, तर १००% त्या त्रासातून मुक्त झाले.
अशातच मला एक नवीन मैत्रीण भेटली. मग आता सांगा, मी मैत्रीला प्राधान्य का देऊ नये? अशी एक सखी असावी, जिच्यासोबत आपण आपले आयुष्य वाचून दाखवावे, जिच्याशी मनसोक्त बोलावे, हसावे आणि खांद्यावर डोकं टेकवून शांत राहावे. आणि अशीच एक माझी सखी आहे - सुजाता. ती मला मैत्रिणीपेक्षा बहीणच जास्त वाटते.
कधी प्रेमाचा, कधी विश्वासाचा, तर कधी नात्यांचा... या गुंतागुंतीत आपण अडकत जातो आणि वाहत जातो. जेवढा हा गुंता सोडवण्याचा प्रयत्न करत राहू, तेवढाच तो अधिक वाढत जातो.
- शितल सराफ