Home >> ती >> तिशीनंतरचा थकवा: वयाचा परिणाम की मॅग्नेशियमची कमतरता?

तिशीनंतरचा थकवा: वयाचा परिणाम की मॅग्नेशियमची कमतरता?

तर पुढच्या वेळी तुम्ही स्वतःला “मी इतकी थकलेली का वाटते?” किंवा “रात्रभर झोपूनही फ्रेश का वाटत नाही?” असा प्रश्न विचाराल, तेव्हा त्याचे उत्तर फक्त तणाव किंवा वाढत्या वयात शोधू नका. कदाचित तुमचे शरीर तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या पोषकतत्त्वाकडे लक्ष देण्याची आठवण करून देत असेल.

Story: आरोग्य |
26th June, 09:37 pm
तिशीनंतरचा थकवा: वयाचा परिणाम की मॅग्नेशियमची कमतरता?

काही दिवसांपूर्वी इंस्टाग्राम स्क्रोल करत असताना एक रील पाहिली होती. त्यामध्ये एक वाक्य विशेष लक्षात राहिलेले– “तिशीतल्या महिला स्वतंत्र, सक्षम आणि सर्व जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या असतात; पण व्हिटॅमिन बी, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमची कमतरता त्यांच्यामध्ये सामान्यपणे आढळते.” सुरुवातीला ते एक सोशल मीडिया पोस्ट म्हणून पाहिले आणि पुढे गेले. मात्र त्यानंतर काही दिवसांत वारंवार मॅग्नेशियम स्लीप लोशन, मॅग्नेशियम गमीज आणि विविध मॅग्नेशियम सप्लिमेंट्सच्या जाहिराती समोर येऊ लागल्या..

चांगली झोप, कमी तणाव, स्नायूंचे आरोग्य आणि ऊर्जा यांच्याशी मॅग्नेशियमचा संबंध असल्याचे अनेक ठिकाणी सांगितले जात असते. पण हे मॅग्नेशियम खरोखरच इतके महत्त्वाचे आहे का? तिशीनंतरच्या महिलांमध्ये त्याची कमतरता ही एक महत्त्वाची समस्या असू शकते का? चला तर याबद्दल आपण आजच्या लेखातून जाणून घेऊ.

आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक महिला घर, नोकरी, मुलांची जबाबदारी आणि वैयक्तिक आयुष्य यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न करत असतात. या सततच्या धावपळीत स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होणे ही सामान्य बाब झाली आहे. परिणामी शरीराला आवश्यक असलेल्या अनेक पोषकतत्त्वांची कमतरता निर्माण होऊ शकते. त्यापैकी एक महत्त्वाचे खनिज म्हणजे मॅग्नेशियम.

मॅग्नेशियम हे शरीरातील ३०० हून अधिक जैवरासायनिक प्रक्रियांमध्ये सहभागी असते. ऊर्जा निर्मिती, स्नायूंचे कार्य, मज्जासंस्थेचे संतुलन, हाडांचे आरोग्य, रक्तदाब नियंत्रण आणि चांगली झोप यासाठी मॅग्नेशियम आवश्यक असते. त्यामुळे त्याची कमतरता शरीर आणि मन या दोन्हींवर परिणाम करू शकते.

तिशीतील महिलांमध्ये कमतरता का आढळते?

तिशीनंतर महिलांच्या आयुष्यात जबाबदाऱ्या वाढतात. करिअर, कुटुंब, मुलांचे संगोपन आणि सामाजिक अपेक्षा यामुळे मानसिक व शारीरिक ताण वाढतो. अपुरी झोप, अनियमित आहार, जास्त प्रमाणातील प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ, कॅफिनयुक्त पेये आणि तणाव यामुळे शरीरातील मॅग्नेशियमची पातळी कमी होऊ शकते. याशिवाय मासिक पाळी, गर्भधारणा आणि स्तनपानाच्या काळात शरीरातील पोषणाची गरज वाढलेली असते. योग्य आहार न घेतल्यास मॅग्नेशियमची कमतरता निर्माण होण्याचा धोका वाढतो.

कमतरतेची लक्षणे कोणती?

मॅग्नेशियमची कमतरता अनेकदा सहज लक्षात येत नाही. सुरुवातीची लक्षणे सामान्य थकवा किंवा कामाचा ताण म्हणून दुर्लक्षित केली जातात. मात्र खालील लक्षणे वारंवार जाणवत असतील तर त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

  •   सतत थकवा आणि अशक्तपणा
  •    स्नायूंमध्ये गोळे येणे किंवा दुखणे
  •   झोपेचा त्रास
  •   डोकेदुखी किंवा मायग्रेन
  •   चिडचिड, चिंता आणि मूड स्विंग्स
  •   हृदयाची धडधड वाढणे
  •    एकाग्रता कमी होणे

अनेक महिलांना मासिक पाळीपूर्वी शरीरदुखी, भावनिक अस्थिरता आणि अस्वस्थता जाणवते. काही संशोधनांनुसार मॅग्नेशियमची कमतरता या लक्षणांशी संबंधित असू शकते.

हाडे आणि मानसिक आरोग्यासाठीही महत्त्वाचे

हाडांच्या आरोग्याचा विचार करताना आपण प्रामुख्याने कॅल्शियमचा विचार करतो. मात्र मॅग्नेशियमशिवाय कॅल्शियमचे योग्य कार्य होऊ शकत नाही. त्यामुळे दीर्घकाळ मॅग्नेशियमची कमतरता राहिल्यास हाडांची मजबुती कमी होण्याची शक्यता असते.

तसेच मॅग्नेशियमचा मानसिक आरोग्याशीही जवळचा संबंध आहे. मज्जासंस्थेच्या कार्यासाठी ते आवश्यक असल्यामुळे त्याची कमतरता असल्यास तणाव, अस्वस्थता आणि झोपेच्या समस्या अधिक जाणवू शकतात.

मॅग्नेशियमचे नैसर्गिक स्रोत

मॅग्नेशियमची गरज पूर्ण करण्यासाठी महागड्या सप्लिमेंट्सची आवश्यकता नेहमीच असते असे नाही. अनेक नैसर्गिक अन्नपदार्थांमधून ते सहज मिळू शकते.

  •   बदाम, काजू आणि अक्रोड
  •    भोपळ्याच्या व सूर्यफुलाच्या बिया
  •   तीळ
  •  पालक, मेथी आणि इतर हिरव्या पालेभाज्या
  •   राजमा, हरभरा आणि मसूर
  •    ओट्स व संपूर्ण धान्ये
  •   केळी
  •   डार्क चॉकलेट (मर्यादित प्रमाणात)

या पदार्थांचा नियमित आहारात समावेश केल्यास मॅग्नेशियमची गरज मोठ्या प्रमाणात भागू शकते.

सप्लिमेंट्स घेण्यापूर्वी काय लक्षात ठेवावे?

आजकाल थकवा किंवा झोपेचा त्रास जाणवल्यास अनेकजण स्वतःहून सप्लिमेंट्स घेण्यास सुरुवात करतात. मात्र प्रत्येक व्यक्तीची गरज वेगळी असते. त्यामुळे मॅग्नेशियम किंवा इतर कोणतेही सप्लिमेंट सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

तर पुढच्या वेळी तुम्ही स्वतःला “मी इतकी थकलेली का वाटते?” किंवा “रात्रभर झोपूनही फ्रेश का वाटत नाही?” असा प्रश्न विचाराल, तेव्हा त्याचे उत्तर फक्त तणाव किंवा वाढत्या वयात शोधू नका. कदाचित तुमचे शरीर तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या पोषकतत्त्वाकडे लक्ष देण्याची आठवण करून देत असेल. तिशीत स्वतंत्र होण्याच्या प्रवासात आपण अनेक गोष्टी मिळवतो; पण त्या धावपळीत शरीराला आवश्यक असलेले पोषण हरवू देऊ नका.

- डॉ. श्वेता राऊत मुळगावकर