या प्रसंगाने मला सतर्कता, धैर्य आणि आत्मविश्वास यांचे महत्त्व शिकवले. सार्वजनिक ठिकाणी एका क्षणाच्या दुर्लक्षामुळे मोठे नुकसान होऊ शकते. संकटाच्या वेळी घाबरून न जाता धैर्याने परिस्थितीचा सामना केला पाहिजे.

प्रत्येकाच्या आयुष्यात काही घटना अशा घडतात ज्या कधीही विसरता येत नाहीत. काही घटना आनंद देतात, तर काही घटना आपल्याला आयुष्यभरासाठी एक महत्त्वाचा धडा शिकवून जातात. माझ्या आयुष्यात घडलेली ही अशीच एक सत्य घटना आहे. ही घटना माझ्यासाठी अत्यंत धक्कादायक होती, पण त्याचबरोबर तिने मला सतर्कता, धैर्य आणि आत्मविश्वास यांचे महत्त्व शिकवले.
ही सत्य घटना असल्याकारणाने मी ही घटना कुठे घडली व कुणी चोरी केली हे सांगू शकत नाही. मात्र या प्रसंगातून मला जो अनुभव आला आणि जो बोध मिळाला, तो इतरांपर्यंत पोहोचावा या हेतूने मी हा अनुभव मांडत आहे.
हल्लीच मी माझ्या काही वैयक्तिक कामासाठी बाजारात गेले होते. त्या दिवशी शनिवार असल्याकारणाने बाजारात नेहमीपेक्षा जास्त गर्दी होती. प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त होते. मी देखील माझी कामे पूर्ण करण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात होते. विविध कामे असल्यामुळे मला बराच वेळ बाजारात थांबावे लागले. वेळ कसा गेला तेच समजले नाही. बराच वेळ झाल्यामुळे मला वॉशरुमला जाण्याची गरज भासली. जवळच सार्वजनिक वॉशरुम असल्यामुळे मी तिकडे गेले. मी आत गेले तेव्हा तिथे एक मुलगी होती. ती अगदी सामान्यपणे वागत होती. त्यामुळे मला तिच्याबद्दल कोणताही संशय आला नाही. मी माझ्या कामात होते आणि तिनेही माझ्याकडे विशेष लक्ष दिल्यासारखे वाटले नाही. मात्र काही वेळाने माझ्या लक्षात आले की ती माझ्या बॅगेकडे संशयास्पद नजरेने पाहत आहे. सुरुवातीला मला वाटले की कदाचित माझा गैरसमज असेल. मी आत जाताना ती माझ्या बॅगेतून पैसे काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे मला दिसले. मी क्षणाचाही विलंब न करता तिला पकडले. त्या वेळी मला खूप धक्का बसला कारण मी अशा प्रकारचा अनुभव यापूर्वी कधीच घेतला नव्हता. मी तिला विचारले की ती असे का करत आहे. तिने सुरुवातीला काहीच उत्तर दिले नाही. मी तिच्याकडून माझे पैसे परत घेतले आणि तिला समज दिली. मला वाटले की कदाचित तिच्याकडून चूक झाली असेल किंवा ती पुन्हा असे करणार नाही. त्यामुळे मी पुढील वाद न वाढवता तेथून बाहेर पडले. त्या दिवशी घरी आल्यानंतरही मला हा प्रकार सतत आठवत होता. पण मी स्वतःला समजावले की पैसे परत मिळाले आहेत आणि प्रकरण संपले आहे. त्यामुळे मी त्याबद्दल अधिक विचार केला नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळी मला पुन्हा काही कामासाठी बाहेर जायचे होते. नेहमीप्रमाणे मी माझी बॅग तपासली. मात्र बॅग उघडताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझे पाकीट बॅगेत नव्हते. मी पुन्हा पुन्हा बॅग तपासली, घरभर शोधले. ज्या ठिकाणी मी काल गेले होते त्या सर्व गोष्टी आठवण्याचा प्रयत्न केला, पण पाकीट कुठेच सापडत नव्हते. त्या पाकिटात फक्त पैसे नव्हते, तर माझी अनेक महत्त्वाची कागदपत्रे होती. ओळखपत्रे, आवश्यक कार्ड्स आणि इतर महत्त्वाच्या वस्तू त्यात होत्या. त्यामुळे माझी चिंता आणखी वाढली. त्याच वेळी मला वॉशरुममध्ये भेटलेली ती मुलगी आठवली, कारण शेवटची तीच माझ्या जवळ आली होती. मी वेळ न घालवता पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी माझी तक्रार ऐकून घेतली. त्या दिवशी रविवार असल्यामुळे तपासाची प्रक्रिया थोडी संथ होती. तरीही मी हार मानण्यास तयार नव्हते. माझे पाकीट आणि त्यातील कागदपत्रे मला परत मिळवायचीच होती. मी संपूर्ण घटनेचा विचार करू लागले. तेव्हा अचानक मला आठवले की ती मुलगी जवळच्या एका गार्डनच्या दिशेने जाताना मी पाहिली होती. मी ही गोष्ट माझ्या बाबांना सांगितली. त्यांनी लगेच माझी साथ दिली आणि आम्ही दोघे त्या गार्डनमध्ये गेलो.
गार्डनमध्ये गेल्यानंतर आम्ही तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची विनंती केली. सुरुवातीला आम्हाला काही विशेष माहिती मिळेल असे वाटत नव्हते. पण फुटेज पाहताना आम्हाला ती मुलगी दिसली. ती गार्डनमध्ये आल्याचे स्पष्ट दिसत होते. त्यामुळे आमचा संशय आणखी बळकट झाला. त्यानंतर आम्ही तेथे काम करणाऱ्या एका काकूंशी बोललो. त्यांनी आम्हाला सांगितले की त्यांना डस्टबीनमध्ये एक पाकीट सापडले होते. मात्र त्यामध्ये काहीही नव्हते. हे ऐकताच माझ्या मनात आशेचा किरण निर्माण झाला. मी त्यांना माझ्या पाकिटाचा रंग आणि त्यावरील ओळख सांगितली. काही वेळाने त्यांनी ते पाकीट आणून दाखवले. माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. ते माझेच पाकीट होते. हरवलेले पाकीट पुन्हा पाहून मला खूप आनंद झाला. मात्र त्यातील महत्त्वाच्या वस्तू अद्याप मिळाल्या नव्हत्या. त्यामुळे लढाई अजून संपलेली नव्हती. मी लगेच सीसीटीव्ही फुटेजची प्रत घेतली आणि ती पोलिसांकडे दिली. याशिवाय मी वॉशरुमच्या काउंटरवर असलेल्या कर्मचाऱ्यांनाही त्या मुलीबद्दल माहिती दिली. ती पुन्हा दिसल्यास मला ताबडतोब कळवण्याची विनंती केली.
त्या दिवशी संध्याकाळी मी पुन्हा बाजारात गेले होते. माझ्या मनात अजूनही ती घटना सुरूच होती. अचानक माझी नजर एका ओळखीच्या चेहऱ्यावर पडली. तीच मुलगी पुन्हा वॉशरुमच्या दिशेने जात होती. मी तिला पाहिले आणि काही क्षणांसाठी थबकले. योगायोगाने त्याच वेळी वॉशरुमच्या काउंटरवरील कर्मचाऱ्यांचाही मला फोन आला. त्यांनीही ती मुलगी आल्याचे सांगितले. मी क्षणाचाही विलंब न करता पोलिसांना फोन केला. काही वेळात दोन महिला पोलीस कर्मचारी तेथे पोहोचले. आम्ही सर्वांनी मिळून त्या मुलीला थांबवले. सुरुवातीला ती पूर्णपणे नकार देत होती. तिने कोणतीही चोरी केली नसल्याचे सांगितले. मात्र पोलिसांनी शांतपणे चौकशी सुरू ठेवली. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे तिच्यासमोर ठेवले. शेवटी तिच्याकडे कोणतेही उत्तर उरले नाही. तिने चोरी केल्याची कबुली दिली. त्या क्षणी मला खूप मोठा दिलासा मिळाला. कारण अनेक तासांची धावपळ, चिंता आणि तणाव यानंतर सत्य समोर आले होते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला माझी कागदपत्रे परत मिळाली. त्या कागदपत्रांची किंमत पैशांपेक्षा जास्त होती. ती पुन्हा मिळाल्यामुळे माझ्या मनावरील मोठे ओझे हलके झाले.
या संपूर्ण प्रसंगाने मला अनेक गोष्टी शिकवल्या. सर्वप्रथम, सार्वजनिक ठिकाणी नेहमी सावध राहिले पाहिजे. आपण अनेकदा आपल्या वस्तू निष्काळाजीपणे ठेवतो. आपल्या आसपास काय घडत आहे याकडे लक्ष देत नाही. पण एका क्षणाच्या दुर्लक्षामुळे मोठे नुकसान होऊ शकते. दुसरे म्हणजे, संकटाच्या वेळी घाबरून न जाता धैर्याने परिस्थितीचा सामना केला पाहिजे. जर मी त्या वेळी प्रयत्न सोडून दिले असते, तर कदाचित मला माझे पाकीट आणि कागदपत्रे कधीच मिळाली नसती. तिसरे म्हणजे, योग्य वेळी केलेली तक्रार आणि गोळा केलेले पुरावे खूप महत्त्वाचे असतात. सीसीटीव्ही फुटेजमुळेच सत्य समोर येण्यास मदत झाली. आजही ही घटना आठवली की मला त्या दिवसाची धावपळ, तणाव आणि शेवटी मिळालेला दिलासा आठवतो. या प्रसंगाने मला अधिक जागरूक आणि जबाबदार बनवले आहे.
- वर्धा हरमलकर
भांडोळ