आता तुम्हाला झाडाखाली जाणे सोडच, पण कापून पुढ्यात ठेवले तरी नको... तुमचे आंबेही मोबाईलमध्येच! सुट्टीत गावी जा, आजी-आजोबांसोबत डोंगरमाथ्यावर फिरा, आंबे-रानमेवा जमा करा आणि मज्जा लुटा

येआत्या! "काकांनी आणलेले आंबे खाऊन तरी बघ. कसा वेगळाच लागतो!"
आत्याने तो खाल्ला आणि खुश होऊन म्हणाली, "अगं, नानाच्या आंब्यासारखा..."
तिकडून आवाज आला, "नानाचो आंबो? नानाक काय आंबे लागतत?"... हू... हू.. खूप झाले... नानाच्या झाडाचे आंबे.... तू खाल्ला नाहीस वाटतं? आंबट-गोड आणि मिरमिरीत असा मिश्रित. ती घरी आणलेल्या प्रत्येक आंब्यात बालपणी खाल्लेल्या आंब्याची चव मिळते का, हे शोधत असायची. आत्या भाचीला एक-एक गोष्ट सांगत गेली...
हे झाड रस्त्यावरच आहे. नजर आणि दगड पोहोचू शकत नाही एवढं उंच! आंबे काढणे तर शक्यच नव्हते, पण चवीमुळे तो आंबा कोणाला हवा आणि कोणाला नको?
"देवाड्याचो आंबो, साखरो आंबो, डिकयाळो आंबो (डिंक जास्त असलेला), बीटकीचो (छोटुला) आंबो, सड्याच्या घाटयेवयलो लालभडक आंबो, मळेकारणीच्या बागेतलो कापो आंबो, डोंगरातलो हापूस आंबो, सड्यावयलो पायरीचो आंबो, खोतीन ताईच्या बागातलो तोतापुरी आंबो, सगळे सगळे आंबे खावचे आसत माका".
आकार, चवी आणि विशिष्ट जागेवरून मिळालेली नावे! या आंब्यासाठी दुपार-तिपार वणवण फिरायचे. पहाटे बॅटरी घेऊन जायचो. आता तुम्हाला झाडाखाली जाणे सोडच, पण कापून पुढ्यात ठेवले... खा-खा म्हटले तरी नको. आम्ही तासन्तास आंब्याखाली कधी वाऱ्याने आंबा पडतो व कोणाला मिळतो, याची वाट पाहायचो. मग गाणे म्हणायचे,
"येरे-येरे वाऱ्या लंकेतून-लंकेतून
आमो दी माका घोसातून घोसातून
पयलो पडतात तो तुझो तुझो
दुसरे पडात तो माझो माझो. "
मग जेव्हा तो मिळायचा, तेव्हा आंब्याचा देठ तेवढा खोडाला घासायचा व आभार मानून दुसऱ्या आंब्याची वाट पाहायची. एखाद्या वेळी झाडाखाली असताना पाठीवर आंबा पडायचा आणि शरीराला शॉक लागल्यासारखे होऊन अंगावरचे केस ताठ उभे व्हायचे, तेही आठवले. जेवण झाले की असे आंब्याखाली उभे राहून पडलेले आंबे जमवून घरी आणायचे.
एकदा काय झाले, दुपारच्या वेळी आई झोपली असताना कैऱ्या काढण्यासाठी आम्ही मुलं गपचूप सड्यावर गेलो. तेव्हा छोटा भाचा बरोबर होता. "आत्या, कोणत्या कैऱ्या पाडू?" हे समोर राहून तो विचारतो आणि मी सांगते न सांगते, तोच त्याने जो दगड फेकला, तो सरळ माझ्या डोक्यावर बसला आणि रक्ताच्या धारा वाहू लागल्या. आजही ती खूण आहे. तसाच हात धरून एकही कैरी न पाडता आम्ही पुन्हा घरी परतलो. अशा प्रकारे गुपचूपपणाची चोरी पकडली गेली! कोणाच्याही अंगणात वाळत घातलेल्या कैऱ्यांचा तुकडा तोंडात घातल्याशिवाय आम्ही पुढे जात नव्हतो.
डोंगरात एक नवीनच आंबा लागलेला आणि तो अतिशय गोड होता. डोंगर घरापासून लांब होता आणि डोंगरातून उतरल्यानंतर आमचे एक कायमचे विसाव्याचे घर होते. तिथे थांबायचे, पाणी घ्यायचे, थोडा आराम करायचा आणि मग घरी जायचे. तर आम्हाला डोंगरात खूप आंबे मिळाले होते व त्या घराची मुले आमचे सगळेच आंबे घेतील तर...? म्हणून आम्ही काय केले, टोपलीत खाली आंबे घातले, वर रतांबे (भिरंड/कोकम) घातले आणि त्याच्यावर थोडे आंबे घातले; म्हणजे थोडे आंबे आम्ही त्यांना देणारच होतो. त्यांच्या घरी आम्ही पोहोचलो आणि टोपली उतरवताना काय गंमत झाली! संपूर्ण टोपलीच त्यांच्या अंगणात हात सुटून ओतली गेली आणि गुपित फुटले. घरातून भांडे आणले गेले आणि पटापट आंबे वेचून घेतले गेले, आणि एक मोठा हशा पिकला.
रायवळ आंबे, कलमी आंबे, मग आडीतले पिकलेले आंबे, झाडपिके आंबे अशा विविध प्रकारांत आंबा खायला आवडत असे. शिवाय पावसाची सोय म्हणून आंबापोळी, आंबावडी केली जायची. आमच्या डोंगराच्या बाजूला एक आंब्याचे झाड होते, त्याला खूप आंबे लागायचे. आंब्याच्या झाडाखाली आंब्याचा चिखल व्हायचा. नानाच्या आई म्हणायची, "ह्ये मेलो आमचो आमो मोडान पडासर लागता, पण थुपयेची चव नाय! आणि देवळेकडचो आमो नारळाएवढो, एक खिशात तर प्याॅट भरताला, पण तोंडात घेऊन नको." (जराही चव नसलेला). पण तोही आंबा मी एखादा खायची, कारण त्या आंब्याच्या झाडाला वाईट वाटू नये म्हणून! आणि बाबा म्हणायचे की, "हिला काही नको असे नाही." पण खरे तसे नव्हते. या आंब्याकडे पाहिले की वाटायचे, जीवनात कसे असायला हवे? सर्वांना संगत हवीहवीशी वाटणारी, की नको नको अशी वाटणारी? या आंब्यासारखे फक्त वाढून जीवनात बेचव बनायचे की रसाळ बनायचे?
हा आंबा असा का, मला माहित नव्हते. त्याचे बी, तिथली माती की आणखी काय? पण जगायचे कसे, हा धडा तो देऊन गेला.
संत तुकाराम महाराज म्हणतात, "शुद्ध बीजापोटी। फळे रसाळ गोमटी।" बीजच चांगले नसेल कदाचित...?
आणि सांगायचे म्हणजे, आज जे डोंगरातले तुम्ही आणि आम्ही हापूस आंबे काढून खातो, ते कोणी लावले आहेत माहित आहे? तर ते आई-बाबांसोबत आम्ही लावले आहेत. आता तिथे विहिरीचे पाणी पंपाने जात असले, तरी आम्ही डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या विहिरीतील पाणी डोक्यावर कळशीने घेऊन डोंगरमाथ्यावर चढून ती कलमे शिंपडली आहेत आणि त्याचे आंबे आज आम्ही चाखतोय! त्याने तो आनंद अधिक द्विगुणीत होतोय. तुम्ही पप्पांसोबत झाडे लावा व हा आनंद घ्या. पाणी डोंगरमाथ्यावर चढवायला नकोय तुम्हाला आता...
तुम्हाला हे सांगून काय करू? तुमचे आंबेही मोबाईलमध्येच... परवाच मी मुलांनाही म्हणाले की, "आता सुट्टी पडणार; नको ती शिबिरे, नको ते कॅम्प! तुमचा गाव आहे? जमीन आहे? घर आहे? आजी-आजोबा आहेत? झाडे आहेत? तर तिथे जा. डोंगरमाथ्यावर आजी-आजोबांसोबत फिरा. आंबे, काजू, रानमेवा जमा करा. मज्जा लुटा आणि पुन्हा शाळेत या." आणि हे मालवणी मुलांकडून मालवणीत वदवून घेतले, आणि बाई व मुले खो-खो हसली.
- संतोषी शामसुंदर महाले
पर्वरी (९४२०५९४८५९)