पुस्तकाची एक जमेची बाजू म्हणजे ते केवळ कविता वाचण्यापुरते मर्यादित राहत नाही; तर वाचकाला स्वतःच्या जीवनाचा आरसा पाहण्यास प्रवृत्त करते. प्रत्येक विचाराचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो, याचा विचार करण्याची प्रेरणा यातून मिळते.

मूळ गोमंतकीय असलेल्या आणि सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे वैद्यकीय व्यवसायात मग्न असलेल्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शिल्पा अविनाश झांट्ये यांनी समाजात वाढत चाललेल्या नैराश्य, चिंता, आत्महत्येच्या प्रवृत्ती आणि कौटुंबिक संघर्षांबद्दल चिंता व्यक्त करत सकारात्मक विचारांचा प्रसार करण्यासाठी, ‘द गार्लंड ऑफ वर्डस्’ हा इंग्रजी कवितासंग्रह प्रकाशित केला आहे. २५ वर्षांच्या वैद्यकीय सेवेत त्यांचा अनेक प्रकारच्या लोकांशी संपर्क आला. त्यातून समाजाला सकारात्मक संदेश देण्याची प्रेरणा मिळाली. त्यांच्या मते, समाजातील बदलाची सुरुवात मनातील विचार बदलण्यापासून होते. तरुण पिढीने सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारला तर समाज अधिक निरोगी आणि आनंदी होईल.
द गार्लंड ऑफ वर्डस् हा २६ रंगीत चित्रांनी सजलेला छोटेखानी कवितासंग्रह विशेषतः लहान मुले आणि तरुणांना सहज समजेल अशा शैलीत तयार करण्यात आला आहे. डॉ. झांट्ये सांगतात की, चांगले लेखन करण्यासाठी भरपूर वाचन, निरीक्षण आणि सातत्यपूर्ण सराव आवश्यक असतो. सकारात्मक विचार, प्रेरणादायी साहित्य आणि संवेदनशील लेखन यांच्या माध्यमातून व्यक्ती आणि समाजात आशावाद निर्माण करणे हेच या पुस्तकाचे प्रमुख उद्दिष्ट आहे, असे त्यांनी सांगितले.
"Always do your best, not good not better, Do only your Best." असे लिहिताना कवयित्री सांगू इच्छिते की इतरांशी तुलना करण्याऐवजी प्रत्येक कामात स्वतःचे सर्वोत्तम द्या. ‘चांगले’ किंवा ‘आणखी चांगले’ याच्या मागे धावण्यापेक्षा त्या क्षणी आपल्या पूर्ण क्षमतेने काम करणे महत्त्वाचे आहे. खरे समाधान हे निकालात नसून प्रामाणिक प्रयत्नात असते. "99 percent travel most used path, You be 1 percent and take an innovative path." याचाच अर्थ असा की, जीवनात गर्दीच्या मागे जाणे सोपे असते. पण इतिहास घडवणारे लोक वेगळी वाट निवडतात. कवयित्री नावीन्य, धाडस आणि स्वतंत्र विचारांची प्रेरणा देतो. जगाला अनुयायी नव्हे, तर नवे मार्ग दाखवणारे लोक हवे असतात, असे त्या कवितेच्या माध्यमातून सांगतात. "Balance in life, a must... Divide your time and trust."अर्थात जीवनात काम, कुटुंब, नाती आणि स्वतःसाठी वेळ यांचा समतोल आवश्यक आहे. एकाच गोष्टीत अति गुंतल्यास इतर क्षेत्रे दुर्लक्षित होतात. तसेच विश्वासही विवेकाने ठेवावा. संतुलन हेच आनंदी जीवनाचे गमक आहे. "Be like the cockroach, resilient and bold. Adapt the change..." याचा सध्याच्या कोकरोच पार्टीशी संबंध नाही, तर झुरळ हा प्रतिकूल परिस्थितीतही टिकून राहणारा जीव आहे. कवयित्री त्याचा प्रतीक म्हणून वापर करून सांगते की संकटांना घाबरू नका. बदल स्वीकारा, परिस्थितीशी जुळवून घ्या आणि पुन्हा उभे राहण्याची ताकद स्वतःमध्ये निर्माण करा. "Learn to say NO... Set boundaries." असे सुचवताना डॉ. झांट्ये प्रत्येक वेळी "हो" म्हणणे हे चांगुलपणाचे लक्षण नसते. स्वतःच्या मानसिक शांततेसाठी आणि स्वाभिमानासाठी योग्य ठिकाणी नम्रपणे "नाही" म्हणायला शिकले पाहिजे. मर्यादा आखणे म्हणजे नाती तोडणे नव्हे, तर त्यांना निरोगी ठेवणे होय असे मौलिक विचार मांडतात.
एका कवितेत त्यांनी छंद हे केवळ वेळ घालवण्याचे साधन नसून मनाला आनंद देणारे आणि व्यक्तिमत्त्व समृद्ध करणारे माध्यम आहे. कामाबरोबरच आवडी जोपासल्या तर जीवन अधिक रंगतदार आणि समाधानकारक होते, असे अनुभवाचे बोल सांगितले आहेत. विविध रंगांची फळे आणि भाज्या म्हणजे विविध पोषक घटक. शरीर निरोगी असेल तर मन आणि विचारही निरोगी राहतात, असे डॉक्टर म्हणतात. एका कवितेत जीवनाचा मतितार्थ सांगताना, माणसाचे खरे मोजमाप त्याने किती संपत्ती कमावली यावर होत नाही; तर त्याने समाजाला किती प्रेम, मदत, ज्ञान आणि माणुसकी दिली यावर होते. देण्यातूनच जीवनाला अर्थ प्राप्त होतो, असे तत्वज्ञान त्या सांगून जातात. शब्द हे शस्त्रही असतात आणि औषधही. एक प्रेमळ शब्द एखाद्याचे आयुष्य बदलू शकतो, तर कठोर शब्द मन कायमचे दुखावू शकतात. म्हणून बोलताना संवेदनशीलता आणि जबाबदारी आवश्यक आहे, यावर त्यांनी आपल्या एका कवितेत भर दिला आहे. कवयित्री तुलना करण्याच्या वृत्तीवर प्रहार करते. प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे, प्रत्येकामध्ये ईश्वराने वेगळी क्षमता दिली आहे. दुसऱ्याशी तुलना करण्याऐवजी स्वतःच्या गुणांचा विकास करणे हेच खरे यश आहे.
"आपले विचार घडवा, आपले भविष्य घडवा." हा संदेश केवळ प्रेरणादायी नाही, तर मानवी व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीचे मूलभूत तत्त्वही सांगतो. पुस्तकाची एक जमेची बाजू म्हणजे ते केवळ कविता वाचण्यापुरते मर्यादित राहत नाही; तर वाचकाला स्वतःच्या जीवनाचा आरसा पाहण्यास प्रवृत्त करते. प्रत्येक विचाराचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो, याचा विचार करण्याची प्रेरणा यातून मिळते. हीच खरी साहित्याची ताकद आहे. "विचारांचे हार गुंफताना प्रत्येक शब्द मनात आशेचे बी पेरतो; आणि त्या बीजातूनच उज्ज्वल भविष्याचा वृक्ष फुलतो."असा संदेश देणाऱ्या कविता मराठीतही लिहिण्याचा इरादा असून गोवा आणि महाराष्ट्रात विशेषतः
मुले आणि पालक यांच्यापर्यंत हे विचार पोचविण्याचा स्वच्छ उद्देश असल्याचे
डॉ. शिल्पा झांट्ये यांनी सांगितले. त्यांच्या या अभिनव उपक्रमास शुभेच्छा.
- गंगाराम केशव म्हांबरे