Home >> ती >> ​पालक हो, सावधान!

​पालक हो, सावधान!

​मोबाईल आणि टीव्हीमध्ये मुलांना किती समजते याचे कौतुक करण्यापेक्षा, तो त्यांना कितपत द्यावा, याचा पालकांनी नक्कीच विचार करायला हवा.

Story: आठवणींचे पंचामृत |
03rd July, 08:11 pm
​पालक हो, सावधान!

नं​​दिता जवळजवळ तीन-चार वर्षांची झाली होती. सुट्टीत ती चार दिवसांसाठी आपल्या आईसोबत मावशीकडे आली होती. मावशीने नंदिताला हाक मारली, जवळ घेण्याचा प्रयत्न केला, पण तिने "ऊss ऊss" केले आणि ती बाजूला गेली. काकांनी हाक मारली, भावंडांनी हाक मारली, तरी तिने तसेच करून बाजूला जाणे पसंत केले. "आत्ताच आली आहे, हळूहळू बोलेल," असा विचार करून प्रत्येक जण आपल्या कामाला गेला, व मध्ये मध्ये सर्व जण तिच्याकडे चक्कर टाकायचे.

​नंदिता दूरदर्शन समोर उभी होती, बसण्याचे नावही घेत नव्हती. तिला आपण कुठे आल्याचा आनंद नव्हता आणि दुःखही नव्हते. बाहेर जाण्यासाठीही ती तेवढी उत्सुक नव्हती; फक्त उभे राहून दूरदर्शन बघणे एवढेच तिचे काम होते.

​तिच्याशी बोलायचा कितीही प्रयत्न केला तरी ती घरातल्या कोणाशी बोलत नव्हती. पण ती उत्तम हिंदी आणि इंग्लिश बोलत होती; आणि हे सगळे ती टीव्हीतल्या माणसांशी बोलत होती. तिला टीव्हीतली पात्रे तिच्या इतकी जवळची झाली होती की, तिला तीच तिची जवळची नातेवाईक वाटत होती.

​घरातील माणसांशी तिची जवळीक नव्हतीच. आईला वेळ नव्हता अशातलाही भाग नव्हता, पण मुलगी चांगल्याच गोष्टी टीव्हीवर बघत आहे, म्हणून ती तिला टीव्ही लावून देत होती. तिच्याशी खूप बोलायचा प्रयत्न केला, पण दोन-तीन दिवस गेले तरी ती काही बोलायला तयार नव्हती.

​मावशीच्या लक्षात आले कि हे गणित काहीतरी वेगळे आहे. तिने बहिणीला तसे बोलून दाखवले.

​तेव्हा तिची आई ठामपणे म्हणाली, "नाही गं, ती सगळं बोलते. विचार तिला भाजीची, फळांची, फुलांची, रंगांची नावे, नाती विचार... ती तुला सगळं सगळं सांगणार."

​मी म्हणाले, "हो, सगळं तुझं बरोबर आहे. ती सगळं बोलते, सगळं तिला येतं; पण या टीव्ही आणि मोबाईलमुळे आजूबाजूच्या प्रत्यक्ष परिसराशी आणि नातेवाईकांशी तिला काही देणंघेणं नाही, हे तुझ्या लक्षात येत नाहीये का? विचार तिला, तू कोणाकडे आलीस? ही कोण? त्यावेळीही ती 'ऊss ऊss' करून बाजूला गेली. तू घरी जा, बारीक निरीक्षण कर, स्वतः विचार कर. मला तिची खूप काळजी वाटते. तिची दुनिया वेगळीच आहे, तिला जीवनातील खरे रंग नाही गं कळत... आणि आजपासून एक लक्षात ठेव की टीव्ही, मोबाईल पूर्णपणे बंद कर! तिला स्वतःसोबत स्वयंपाकघरात घेऊन जा, तू बोल तिच्याशी. घरातल्या वस्तूंची माहिती दे, त्या हाताळायला दे. तिला बाजारात घेऊन जा, मित्र-मैत्रिणींशी बाहेर खेळायला सोड आणि या परिसरातील ज्यांच्या ज्यांच्याशी आपला संबंध आहे, तिकडे तिला मुक्तपणे वावरू दे. परिसरातील खरे रंग, खरी नाती, प्राणी, पक्षी तिला दाखव. हेच माझे तू ऐक."

​त्या दिवसापासून तिने पूर्णपणे टीव्ही आणि मोबाईल बंद केला व वरील सर्व सूचनांप्रमाणे ती वागली. जेव्हा ती परत पाच-सहा महिन्यांनी पुन्हा दीदीच्या वाढदिवसानिमित्त एकत्र कुटुंबात आली, तेव्हा ती सर्वांशी मिळूनमिसळून, बोलून प्रेमाने राहिली. "ही कोण? ती कोण? तुझं नाव काय? हा तुझा कोण? हा माझा कोण? त्याचं नाव काय?" असे कित्येक प्रश्न ती प्रत्येकाला विचारत होती. ही एकदा झालेली भेट तिने अशी काही लक्षात ठेवली की, पुन्हा जेव्हा ती आली, तेव्हा तिथे ती व्यक्ती नसतानाही प्रत्येकाचे नाव विचारून "तो कुठे? ती कुठे?" अशी चौकशी तिने केली. तेव्हा सर्वांनी तिला पाहून कौतुकाने म्हटले, "बरी मुलगी आहे, सर्वांना लक्षात ठेवले."

​वेळीच सावध झाली नसती, तर तिची दुनिया दुसरीच झाली असती, हे आता बहिणीलाही पूर्णपणे पटले होते.

​मोबाईल आणि टीव्हीमध्ये मुलांना किती समजते याचे कौतुक करण्यापेक्षा, तो त्यांना कितपत द्यावा, याचा पालकांनी नक्कीच विचार करायला हवा.

- संतोषी शामसुंदर महाले

पर्वरी (९४२०५९४८५९)