माणसाचे मन चंचल असते. हे चंचल मन उदास किंवा रिकामे राहिले, की नकारात्मक विचारांचे घर बनते; म्हणूनच मनाला छंद, कला आणि अर्थपूर्ण कामांच्या दावणीने गुंतवून ठेवणे काळाची गरज आहे.

असं म्हणतात रिकामे मन हे सैतानाचे घर असते. जेव्हा मन कुठेही गुंतलेले नसते, त्याला काही कामच नसते, तेव्हा ते नको त्या गोष्टींमध्ये अडकले जाते; भलत्यासलत्या गोष्टीत आपली शक्ती वाया घालवते. त्यासाठी त्या चंचल मनाला कुठेतरी सतत गुंतवून ठेवलं पाहिजे, विचारांच्या दावणीने बांधून ठेवलं पाहिजे. विशेषतः जेव्हा माणूस एकटा असतो किंवा एकटा पडतो, तेव्हा त्याचे मन नको नको ते विचार करून हैराण करून सोडते, ज्याचा त्या व्यक्तीला त्रासच होतो. मन उदास असल्यावर एकटे राहावेसे वाटते आणि दीर्घकाळ एकटे राहिल्याने मनात अजूनच नकारात्मक विचार येत राहतात. अशा वेळी पूर्वी केलेल्या चुका, अपयश, भीती हे सारे नजरेसमोर उभे राहते; त्याच त्याच क्लेशकारक विचारांत, दुःखद गोष्टीत मन अडकून राहते. अशा वेळी कुटुंब, मित्र यांच्याशी संवाद ठेवणे गरजेचे असते.
माणूस हा कितीही म्हटलं तरी सामाजिक प्राणी आहे. इतरांशी जोडलेपणाची भावना त्याला आणि त्याच्या मनाला सुरक्षित बनवते. त्यासाठी मनाला गुंतवून ठेवण्यासाठी ओळखीच्या लोकांशी, नातेवाईकांशी, आजूबाजूच्या लोकांशी, शेजारीपाजाऱ्यांशी, मित्रमंडळींशी गप्पाटप्पा झाल्या पाहिजेत, बोललं पाहिजे. अशा वेळी इतरांच्या सुख-दुःखाची जाणीव होते, मन आपोआपच त्यांचा विचार करू लागते. कधी कधी जुन्या मित्र-मैत्रिणींना फोन करून त्यांच्याविषयी जाणून घ्यायचे, त्यांना आपली स्थिती सांगायची; यामुळे मन हलके होते, जुन्या आठवणींत मन रमते.
मनाला असं गुंतवून ठेवायचं असेल तर एखादा छंद जोपासायचा. छंदामध्ये आनंद शोधायचा प्रयत्न करायचा. अशा रीतीने मन काहीतरी करण्याच्या उमेदीत उदासीनता विसरून जाते. मनाचे लक्ष बदलते, ते कार्यमग्न राहते. थोडेसे विचलित झालेले मन स्थिर होते, नकारात्मक विचारांपासून दूर जाते. कुठलीही आपल्याला आवडती गोष्ट, जसे की चित्र काढणे, पुस्तक वाचणे, संगीत ऐकणे, डान्स करणे, योगा करणे, फिरायला जाणे, बागकाम करणे, एखादा मांजर-कुत्रा सारखा पेट प्राणी पाळणे, नवीन झाडे लावणे, मुलांमध्ये रमणे, कशिदा करणे, नवीन कपडे शिवून पाहणे, स्विमिंग, एखादा नवीन पदार्थ करून पाहणे; अशा गोष्टींनी मनाला सतत गुंतवून ठेवता येतं. अशा गुंतण्यात मन अधिक विकसित आणि प्रफुल्लित होते.
पण आपण कुठल्या विषयात गुंततो आहोत याचे भान असले पाहिजे. काही लोकांची प्रवृत्ती मग व्यसनाकडे त्यांना खेचते. व्यसनात गुंतणे म्हणजे तात्पुरता जरी त्याच्या मनाला विसावा मिळणारा असला, तरी त्याचे परिणाम मात्र चांगले नसतात. ती व्यक्ती व्यसनात गुंतवून स्वतःच्या आयुष्याची वाट लावत असते. कधी कधी लोक कुठल्याही गोष्टीच्या जास्त आहारी जातात; स्वतःला गुंतवून ठेवण्यासाठी जरी तो मार्ग पत्करला असला, तरी त्याचे दीर्घकालीन परिणाम वाईटच होतात. मग ते काम करणं असुदे किंवा स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन त्यात पार बुडून जाणे असू देत, तेही वाईटच. मोबाईल, संगणक, टीव्ही अशा गॅझेट्समध्ये रात्र-रात्र स्वतःला गुंतवून ठेवणारे लोक आपल्या आजूबाजूला काय चाललंय या बाबतीत अगदीच अनभिज्ञ असतात.
गुंतून राहणे म्हणजे भावनांपासून पळ काढणे नव्हे, तर ज्या भावनांपासून दुःख होते त्यापासून दूर जाणे; त्यात अडकून न राहता दुसऱ्या चांगल्या गोष्टींकडे वळणे हे फायदेशीर ठरते. त्यासाठी मनात एखादे उद्दिष्ट ठरवायचे, ते साध्य करण्यासाठी प्रयत्न करत राहायचं, त्यात मन गुंतवून ठेवायचं. जेव्हा ते पूर्ण होईल, तेव्हा मनाला एक शांतता मिळेल. त्यासाठी स्वतःला एखाद्या अर्थपूर्ण कामात, चांगल्या नात्यात, नवीन अनुभवात, चांगल्या सवयीत गुंतवून ठेवलं की उदास वाटत नाही, मनाला रिकामपण येत नाही, एकाग्रता वाढते. एखादी कला नव्याने शिकणे, कोडी सोडवणे, शिल्पकला शिकणे; कितीतरी नवीन नवीन गोष्टी मोबाईलवर बघून करता येण्यासारख्या असतात. प्रयत्न केला की आपोआप गोष्टी शिकता येतात, त्यासाठी वयाची अट नसते.
माझी एक मैत्रीण ओरिगामी शिकली, त्या कलेतून ती छान छान गोष्टी करायला शिकली. एका मैत्रिणीला शंख-शिंपल्यांपासून वस्तू बनवायचा छंद आहे, तिचाही वेळ त्यामध्ये खूप छान जातो. एक सखी पेपरची फुले खूप छान बनवते, त्यात त्यांचे मन गुंतून राहते, वेळ चांगला जातो आणि काहीतरी केल्याचे समाधान मिळते. आपल्या अंगी असलेली कला दुसऱ्याला दाखवता येते, त्यातून एक समाधान मिळते. ‘हे मी केलंय’ असं सांगताना अभिमान वाटतो. कुणाला रांगोळी घालायला आवडते, कुणाला मेहंदी काढायला आवडते, कुणाला केसांच्या हेअर स्टाईल करायला आवडते, कुणाला नेल आर्ट करायला आवडते, कुणाला मोत्याचे दागिने बनवायला आवडतात; अशी कोणती ना कोणती खासियत प्रत्येकात लपलेली असते, तिला बाहेर काढलं की ती खुलून येते. आपल्या छंदातून नवी निर्मिती झाली, तर तो आनंद आपल्याला प्रेरणा देऊन जातो.
मला स्वतःला पण असे क्राफ्ट करून बघायला आवडते. क्रोशिया, एम्ब्रॉयडरी, विणकाम, पेंटिंग, शिवणकाम यावरचे नवीन नवीन आलेले व्हिडिओ मी पण ट्राय करून बघते. दरवेळी काहीतरी नवीन शिकत जाणे यासारखा आनंद नाही. मनाला अशा गोष्टीत गुंतवून त्याला खाद्य पुरवले, की वाईट-साईट विचार करायला सवडच मिळत नाही; मनाची उदासी कुठल्या कुठे पळून जाते. व्यायाम करण्यात शरीराबरोबर मनही गुंतून राहते, मनात एक ऊर्जा निर्माण होते. योगा, प्राणायाम याने मनावर ताबा ठेवण्याची प्रेरणा मिळते.
आपल्या मेंदूला आवडत्या कामात सक्रिय ठेवणे म्हणजे मन गुंतून ठेवणे. मेंदूला चालना मिळाली की ते कार्यरत राहते. त्यासाठी कोडी सोडवणे, सुडोकू, बुद्धिबळ, शब्दकोडी सोडवणे, स्मरणशक्तीचे खेळ खेळणे, यांसारख्या गोष्टीत आपले मन गुंतवून ठेवता येते. आयुष्यात कधीतरी अशी वेळ येते जेव्हा मन उदासीच्या छायेत गुरफटते, तेव्हा तसे उदास राहण्यासाठी स्वतःला रिकामा वेळच देऊ नका. त्यासाठी मनातल्या नकारात्मक विचारांना थारा न देता मनाला अशा ठिकाणी गुंतवा, जेणेकरून त्या दुःख देणाऱ्या गोष्टी पूर्णपणे मागे टाकल्या जातील. मनाचे लक्ष बदलत जाईल, तेव्हा आपण त्रास देणाऱ्या विचारांपासून दूर जाऊ.
जीवनातला प्रत्येक दिवस हा आपल्या अपेक्षेप्रमाणे जाणारा, आनंदी असेल असे नाही; पण आपण उदास न होता नवीन कामांमध्ये स्वतःला गुंतवून ठेवू शकतो. जी माणसे असं करू शकत नाहीत, त्यांच्या मनावर ताण वाढत जातो आणि अविचाराने कुठलेही पाऊल उचलले जाऊ शकते, जे सर्वांसाठी घातक ठरू शकते.
- प्रतिभा कारंजकर