आज अनेक जण इंटरनेटवर “सापाचं स्वप्न म्हणजे काय?”, “पाणी दिसलं तर काय होतं?” असे अर्थ शोधतात. पण युंग म्हणाले असते, एकाच प्रतीकाचा अर्थ प्रत्येकासाठी वेगळा असतो. स्वप्नांना शब्दकोश नसतो.

‘काल रात्री एक विचित्र स्वप्न पडलं.’
आपण हे वाक्य किती सहज आणि किंबहुना रोजच बोलतो! पण पुढचं वाक्य देखील बहुतेक वेळा, “याचा काही अर्थ असतो का?” हेच असते.
अहो, माणूस हा फार गंमतीशीर प्राणी आहे. म्हणजे बघा, दिवसभर स्वतःच्या मनाला बोलू द्यायचं नाही. काम, मोबाईल, जबाबदाऱ्या, लोक, भूमिका यांच्यात स्वतःला इतकं गुंतवून ठेवायचं की मनाला उसंतच मिळू नये. जणू दिवसभर मनाला बोलायची संधीच दिली नाही, म्हणून ते रात्री पडद्यावर चित्रपट दाखवायला लागतं, स्वप्नाच्या रूपाने काही सांगायला लागतं, आणि अशावेळी आपण मात्र त्याचा शुभ-अशुभ अर्थ शोधायला लागतो.
पण खरंच... स्वप्नं आपल्याला भविष्य सांगत असतात का हो?
प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ कार्ल युंग यांचं उत्तर होतं, “नाही.”
त्यांच्या मते, स्वप्नं भविष्याची भविष्यवाणी करत नाहीत, ती आपल्या मनाच्या अशा भागाशी आपली भेट घडवून आणतात, ज्याच्याकडे आपण जागेपणी पाहायचं टाळतो.
युंग म्हणतात, आपल्या प्रत्येकाच्या मनात एक रंगमंच असतो. त्या रंगमंचावर दिवसभर एक कलाकार वावरत असतो. त्याचं नाव Persona.
हा आपला सामाजिक चेहरा. ऑफिसमधला व्यावसायिक, घरी समंजस मुलगा किंवा मुलगी, मित्रांसमोर विनोदी, समाजात आत्मविश्वासू. लोकांनी आपल्याला जसं पाहावं, तसं आपण स्वतःला सादर करत असतो.पण प्रत्येक रंगमंचाला देखील पडद्यामागची जागा असते. तशी ती आपल्यात ही असते जिथे उभी असते Shadow अर्थात आपली सावली. आपला राग, मत्सर, भीती, असुरक्षितता, दुःख, अपूर्ण इच्छा, नाकारलेल्या भावना... ज्या आपण “माझ्यात असूच शकत नाहीत” असं म्हणत मनाच्या अंधाऱ्या कोपऱ्यात ठेवून देतो. आता, ही सावली म्हणजे वाईटपणा नव्हे. उलट ती म्हणजे आपल्याच व्यक्तिमत्त्वाचा असा भाग, ज्याला आपण अजून स्वीकारलेलं नसतं.
अहो, दिवसा आपल्या मनाच्या रंगमंचावर वावरणारा हा Persona, मी ठीक आहे, मला काही फरक पडत नाही, मी नेहमी मजबूत आहे अशी वाक्ये घेत असतो. परंतु रात्री पडदा पडतो. प्रेक्षक जातात. आणि मग पडद्यामागे उभी असलेली ती गरीब बिचारी Shadow हळूच पुढे येते. ती म्हणते खरंच ठीक आहेस? की फक्त अभिनय करतोयस? कदाचित म्हणूनच काही स्वप्नं आपल्याला अस्वस्थ करतात. ती घाबरवण्यासाठी नसतात, ती आपला अभिनय संपल्यावरच दिसणारा चेहरा दाखवण्यासाठी असतात.
आणि म्हणूनच अनेकांना वारंवार एकच स्वप्न पडतं.
कोणीतरी पाठलाग करत असतो.
परीक्षा सुरू आहे, पण प्रश्नपत्रिका समजत नाही.
जुन्या घरात हरवल्यासारखं वाटतं.
दात पडतात.
उंचावरून खाली पडत असल्याची जाणीव होते.
या स्वप्नांचा शब्दशः अर्थ शोधण्यात फारसा अर्थ नसतो. कारण युंग यांच्या मते स्वप्नं प्रतीकांच्या भाषेत बोलतात. ती घटना सांगत नाहीत, भावना दाखवतात.
मला समुपदेशनादरम्यान एका तरुणीने सांगितलं, “मला वारंवार असं स्वप्न पडतं की मी स्टेशनवर पोहोचते आणि माझी ट्रेन आधीच निघून गेलेली असते.”
पहिल्या नजरेत हे ट्रेनचं स्वप्न वाटेल. पण संवाद पुढे सरकला तेव्हा लक्षात आलं की ती आयुष्यात सतत “उशीर होतोय”, “मी मागे पडतेय”, “सगळे पुढे गेले” या भावनेत जगत होती. त्यामुळे खरंतर ते स्वप्न ट्रेनबद्दल नव्हतं, तर ते तिच्या भीतीबद्दल होतं.
युंग यांनी याला Compensation म्हटलं आहे. जागेपणी आपण ज्या भावनांकडे दुर्लक्ष करतो, त्यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न मन स्वप्नांतून करतं.
सतत मजबूत असल्याचा आव आणणाऱ्या व्यक्तीला स्वप्नात रडताना स्वतःच दिसू शकतं. सगळ्यांना खूश ठेवणाऱ्या व्यक्तीला स्वप्नात एकटं भटकताना दिसू शकतं. सतत स्वतःला सिद्ध करण्याच्या धडपडीत असलेल्या व्यक्तीला वारंवार परीक्षेचं स्वप्न पडू शकतं.कारण मन आपल्याला घाबरवत नसतं. ते म्हणत असतं, “माझ्याकडेही एकदा बघ की रे..”
आज अनेक जण इंटरनेटवर “सापाचं स्वप्न म्हणजे काय?”, “पाणी दिसलं तर काय होतं?” असे अर्थ शोधतात. पण युंग म्हणाले असते, एकाच प्रतीकाचा अर्थ प्रत्येकासाठी वेगळा असतो. स्वप्नांना शब्दकोश नसतो. कारण स्वप्नाचा अर्थ त्या प्रतीकात नसतो, तो त्या व्यक्तीच्या आयुष्याच्या संदर्भात असतो.
कदाचित म्हणूनच स्वप्नांचा अर्थ पुस्तकात सापडत नाही. तो स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहण्यात सापडतो.
त्यामुळे आता पुढच्या वेळी एखादं स्वप्न सकाळपर्यंत तुमच्या मनात रेंगाळलं, तर त्याचा शुभ-अशुभ अर्थ शोधू नका.
फक्त स्वतःला एवढाच प्रश्न विचारा, “माझ्या मनाचा कोणता भाग इतके दिवस शांत होता... आणि आज रात्री बोलायला आला?”
कारण...
स्वप्नं पडत नाहीत.
कधी कधी...
मन बोलत असतं.
- मानसी कोपरे
मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशक
डिचोली - गोवा, ७८२१९३४८९४