Home >> ती >> ​मुन्नार : एक निसर्गरम्य भेट

​मुन्नार : एक निसर्गरम्य भेट

​निसर्गाचा कोवळा आस्वाद घ्यावा तो केरळसारख्या भूमीतून हे पुस्तकातून फक्त वाचले होते. 'गॉड्स ओन कंट्री' हे विशेषण लाभलेल्या जागी जाणार या कुतुहलाने संपूर्ण केरळच्या हिरवेगार सौंदर्याची आणि मुन्नारच्या मसाल्यांच्या बागेची सफर मी अनुभवली.

Story: प्रवास |
03rd July, 09:55 pm
​मुन्नार : एक निसर्गरम्य भेट

निसर्गाचा कोवळा आस्वाद घ्यावा तो केरळ सारख्या भूमितून हे पुस्तकातून फक्त वाचलं होतं. 'गॉड सिटी' हे विशेषण व्याप्त केलेल्या जागी जाणार होतो या गोष्टीचं कुतुहल घेऊन मी वावरत होते. तसं बघायला गेलं तर संपूर्ण केरळच जणू सौंदर्याची खाण. प्रत्येक शहर हिरवळीने नटलेले. यातील मुन्नार हे शहर म्हणजे मसाल्यांची बाग. खरं तर इतक्या दूरच्या प्रवासाचा थकवा सुद्धा त्या निसर्गाच्या पदस्पर्शानेच लुप्त झाला.

​पहिल्या दिवसाच्या संध्याकाळी लॉजवर पोहोचण्याच्या वाटेवर आलो आणि खाली घरंगळत जाणारा रस्ता पाहिला आणि थार सारख्या गाडीतून जाताना जीवाचा थरकाप उडाला. पण त्या खरखटणाऱ्या रस्त्यावरून खाली उतरताना निसर्गाची वेगळी किमया मानवाच्या कल्पकतेबरोबरीने दिसली. त्या खडतर डोंगरमाथ्यावर सुंदर अशा लॉजिस उभ्या केल्या होत्या आणि त्यात प्रवाशांच्या वस्त्या संध्याकाळी किलकिबात करत होत्या. लॉजवर जाताच क्षणी नजरेस पडले ते अंजीरांचे घोस. इतके महागडे ड्रायफ्रूट्स पण त्या ठिकाणी जमिनीवर लोळत होते. कोणतीही गोष्ट अति प्रमाणात मिळू लागली की त्यांची किंमत कमी होऊन जाते या गोष्टीची तीव्र जाणीव त्यावेळी झाली. थंडी असल्यामुळे शेकोटी पेटवण्यात आली होती आणि वेगवेगळ्या भाषेचे पर्यटक येऊन त्या गारव्यात ऊब शोधत होते. अनेक जण आपल्या आवडणाऱ्या गाण्यांचे प्रदर्शन करीत नाच गाण्यात बुडून गेले होते. आमच्या ग्रुपमधील सर्वांशी जोडून घेणाऱ्या दीक्षाने त्यांच्याबरोबर संवाद साधून एक मैत्रीचा ओलावा निर्माण केला आणि मल्याळम गाण्यावर त्या चौघीजणी थिरकल्या. प्रवासाचा थकवा त्या लॉजच्या शीतलतेने दूर पळाला.

​दुसऱ्या दिवशी सगळ्यात आधी आवराआवर करून आम्ही टेकडीच्या प्रवासाला निघालो. सोयीस्कर अशा बसच्या प्रवासानेच वर पोहोचण्याची वाट होती. वर वर जाताना डोळ्यांचे पारणे फेडणारे चहाचे मळे आणि त्यात कामानिमित्ताने भिरभिरणारी लोकं, या दोघांचा सुरेख समन्वय जोडलेला होता. कामाच्या त्या ओघात सौंदर्याचा आस्वाद ते घेत असतील का, हा विचार ठायी ठायी येत होता. मोबाईलने निसर्ग सौंदर्य टिपणे की डोळ्यांचे पारणे जडेपर्यंत बाहेरचं दृश्य टिपत राहणे, या मोठ्या गोंधळात कधी टेकडीवर पोहोचलो हे कळलेच नाही. टेकडीवर चढून जाताना थकवा काही जाणवलाच नाही. वाटेवर प्रवाशांची रीघ आणि त्या जागेवरचा निलगिरी तहर हा प्राणी. प्राण्याला कोणीही हात लावू नये याचा जणू फलक उभारला होता, पण तरीही त्या मनमोहक प्राण्याचे मोठे कुतूहल वाटत होते. हरणासारखा दिसणारा तो प्राणी, शिंगे मात्र वर आलेली. कोणाही प्रवाशाला हानी न पोहोचवता ते आपल्या तंद्रीत आणि आपल्या स्वतःच्या घरी वावरल्याच्या तोऱ्यात दिसत. खरं तर टेकडीवरचा संपूर्ण वेळ निसर्ग सौंदर्याच्या आस्वादाने गेला. त्या शीतल वाहणाऱ्या हवेतही मन शांत करण्याची शक्ती होती. वर पोहोचल्यावर दवबिंदू जणू काय बोलावल्यासारखे अंगावर झिरपत होते आणि त्यावेळी पावसाच्या धाराही आमंत्रित केल्याप्रमाणे भराभर हजेरी लावायला लागल्या. पावसापासून रक्षण करणारे काही हाती नसल्यामुळे आम्ही लगबगीने चालू लागलो आणि बसची पकड घेऊन खाली उतरलो.

​प्रसिद्ध अशा चहाच्या फॅक्टरीमध्ये दाखल झालो. वेगवेगळ्या प्रकारचा चहा पाला आणि तो बनवणारी वेगवेगळी यंत्रणा. मल्याळम भाषेचं जग असले तरी प्रवाशांसाठी हिंदी व इंग्रजीत सुंदरपणे माहिती पुरवली गेली. बहुतेक जणांना हुरहूर लावणारा तो चहा इतका महाग का, हे चहाच्या मळ्यात वणवण करणाऱ्या हातांकडे पाहून लक्षात आले. पहिल्या दिवसाचा पल्ला संपल्यानंतर लगेच वाटेला लागलो आणि लॉजवरच्या शांततेत रममाण झालो.

​खरं तर आमचा संपूर्ण प्रवास सुखकर आणि आनंदमय झाला तो आमच्या ड्रायव्हर काकांमुळे. चेहऱ्यावर नेहमी निखळ हास्य आणि प्रत्येक जागेबद्दल खोलवर माहिती. मुन्नारचा प्रत्येक अवयव जणू त्यांना ज्ञात. यात दीक्षा त्यांना हजारो प्रश्न विचारून भांबावून सोडे, पण ते प्रत्येक प्रश्नाचे उत्तर न कंटाळता देत. एवढ्या लांबचे पल्ले फक्त आम्ही त्यांच्यामुळे पार करू शकलो असे वाटले. प्रत्येक दुकानांपासून ते लहान लहान जिन्नस घेण्यापासून ते आम्हाला सावध करत, तसेच अतिखोल माहितीही देत. आपल्या कामधंद्याबद्दल, कुटुंबाबद्दल सांगताना त्यांचा ऊर दाटून येई. कामानिमित्ताने आपल्या कुटुंबापासून होणारी ताटातूट आणि आपल्या कुटुंबियांसाठी होणारी त्यांची वणवण बोलण्यातून व्यक्त होत होती.

​सकाळची आवराआवर करून दुसऱ्या दिवशीच्या प्रवासाला सुरुवात केली. सलग पाच तासांचा हा प्रवास सगळ्यांनी झोपून आणि बाहेरचा निसर्ग हेरूनच काढला. Elephant Camp मध्ये पोहोचल्यावर सुपाएवढे कान असलेले चार बलदंड हत्ती नजरेत पडले. हत्तीवरून एक फेरफटका मारण्याची लोकांची रीघ चालू होती. पण त्यांची ती अवस्था बघून मन खट्टू झाले आणि सगळी उत्सुकता क्षणात गळून पडली. सतत फेरफटका मारत राहिल्यामुळे त्यांचे सगळे अवसान गळून गेले होते. या प्राण्यांच्या जीवावर अनेक जण आपला उदरनिर्वाह करत होते याची प्रचिती त्या ठिकाणची परिस्थिती न्याहाळता लक्षात आली. शिकाऊ असलेले हे जनावर त्यांच्या प्रत्येक हुकुमाची अंमलबजावणी करत, पण त्यांची ती तळमळ मला बघवेना. कधी संध्याकाळ होते आणि यांना विश्रांती मिळते असं माझ्या जीवाला वाटून गेलं. यानंतर पेरियार अभयारण्यात गेलो. वाघांसाठी प्रसिद्ध असे हे अभयारण्य निसर्गाच्या कुशीत पोहडले होते. अनेकांनी बोटीची सफारी केली, पण आम्ही मात्र त्या निसर्गाच्या आल्हाददायक सहवासात बसून राहिलो. दूरवर बागडणारी हरणे बघितली. परत नेहमीच्या नित्यनेमाने परतीच्या प्रवासाला लागलो आणि हॉटेलच्या दारी शिरलो. प्रशस्त असे ते हॉटेल आणि बाहेर परत सुखावणारे निसर्ग चित्र.

तिसऱ्या दिवशी आम्ही अलेप्पीला जाणार या विचारात रात्र काढली. आदल्या दिवशी सकाळी धुक्याच्या दाटीत चहाच्या मळ्यात उतरलो तेव्हा पृथ्वीवर स्वर्ग आल्याचा भास झाला. तिथले सौंदर्य नजरेत साठवून आम्ही तीन तासांचा प्रवास करत अलेप्पीला पोहोचलो. पावसाच्या सुरुवातीलाच आम्ही सर्व सुखसोयींनी युक्त अशा टुमदार हाऊस बोटमध्ये शिरलो. स्वागतपेयानंतर नदीतील शीतल लहरी, माडांच्या रांगा आणि इतर बोटींच्या गजरात पाच तासांची सफर सुरू झाली. तिथे रुचकर जेवणाचा आस्वाद घेतला. निसर्गाच्या साथीने माणूस उदरनिर्वाह कसा करतो, याचे अलेप्पी हे उत्तम उदाहरण आहे. तिथल्या लोकांचे सौजन्य आणि कष्ट उपसण्याचे आंतरिक सौंदर्य मनाला भावले. पाण्यावर तरंगत घालवलेली ती रात्र एक विलक्षण अनुभव ठरली.

​अशा प्रकारे एका नवीन प्रदेशाची सैर आमची पूर्ण झाली. या संपूर्ण प्रवासात चार दिवस सतत आमच्या सोबतीला असलेल्या ड्रायव्हर काकांबरोबर एक वेगळा सलोखा आमचा निर्माण झाला होता आणि निरोपाच्या वेळी खरं तर सगळ्यांची मने भरून आली होती. त्यांचा नंबर आम्ही जरी घेतला तरी परत आयुष्यात त्यांची भेट होईल का, हा विचार मनी येताच मनही निराश होऊन गेले. खरं तर या प्रवासात खूप गोष्टी आम्ही सोबत घेऊन आलो, खूप अनुभव गाठीशी बांधून आलो, त्या ड्रायव्हर काकांबरोबरच एक नवं नातं जोडून आलो तसेच त्या प्रदेशातील निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण होऊन आलो.

- कविता अजित गावस