योग्य वेळी सुरू केलेली फिजिओथेरपी, वजन नियंत्रण आणि नियमित व्यायाम यामुळे अनेक महिलांमध्ये गुडघा प्रत्यारोपणाची गरज वर्षानुवर्षे पुढे ढकलता येते.

“डॉक्टर, माझी गुडघेदुखी खुपच वाढलीये... आता गुडघा बदलावा लागेल का?” हा प्रश्न रोजच अनेक महिला विचारताना दिसतात. गुडघेदुखी सुरू झाली की अनेकांच्या मनात पहिला विचार येतो तो म्हणजे शस्त्रक्रिया. तर काही महिला “ऑपरेशनची भीती” म्हणून वर्षानुवर्षे वेदना सहन करत राहतात. प्रत्यक्षात प्रत्येक गुडघेदुखीसाठी किंवा गुडघ्याच्या झिजेसाठी गुडघा प्रत्यारोपण (टोटल नी रीप्लेसमेन्ट) आवश्यक असतेच असे नाही. योग्य वेळी योग्य उपचार निवडणे हेच सर्वात महत्त्वाचे असते.
वाढते वय, रजोनिवृत्तीनंतर होणारे हार्मोनल बदल, वाढलेले वजन, कमी शारीरिक हालचाल, जुन्या दुखापती तसेच आनुवंशिक कारणांमुळे महिलांमध्ये ऑस्टिओआर्थ्रायटिस म्हणजेच गुडघ्याची झीज अधिक प्रमाणात दिसून येते. सुरुवातीला ही झीज हळूहळू वाढत असल्याने अनेकदा तिच्याकडे दुर्लक्ष केले जाते. अनेक महिला घरकाम, नोकरी, मुलांची जबाबदारी किंवा कुटुंबाची काळजी यामुळे स्वतःच्या वेदनांकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे आजार पुढच्या टप्प्यात पोहोचेपर्यंत उपचार उशिरा सुरू होतात.
गुडघ्याची झीज कशी ओळखाल?
सुरुवातीला जिना चढताना किंवा उतरताना गुडघ्यात वेदना होणे, बराच वेळ बसल्यानंतर उठताना कडकपणा जाणवणे, चालताना गुडघ्यात “कटकट” आवाज येणे, सूज येणे किंवा काही अंतर चालल्यानंतर विश्रांती घ्यावी लागणे अशी लक्षणे दिसू शकतात. पुढील टप्प्यात वेदना इतक्या वाढतात की साधी दैनंदिन कामेही कठीण वाटू लागतात.
प्रत्येक गुडघेदुखीसाठी शस्त्रक्रिया आवश्यक असते का?
उत्तर आहे – नाही.
गुडघ्याच्या झिजेच्या सुरुवातीच्या आणि मध्यम अवस्थेत अनेक महिलांना शस्त्रक्रियेशिवायही चांगला आराम मिळू शकतो. योग्य औषधोपचार, वजन नियंत्रण, नियमित फिजिओथेरपी, स्नायू बळकट करणारे व्यायाम आणि जीवनशैलीतील काही बदल यामुळे वेदना कमी होतात आणि गुडघ्याचे कार्य सुधारते.
औषधांची भूमिका
डॉक्टरांच्या सल्ल्याने दिली जाणारी वेदनाशामक औषधे, सूज कमी करणारी औषधे किंवा काही निवडक रुग्णांमध्ये दिली जाणारी इंजेक्शन्स यांचा उपयोग वेदना कमी करण्यासाठी होतो. मात्र औषधे ही कायमस्वरूपी उपाययोजना नाहीत. केवळ औषधांवर अवलंबून राहिल्यास झीज थांबत नाही. त्यामुळे औषधांसोबत व्यायाम आणि योग्य जीवनशैली आवश्यक आहे.
फिजिओथेरपी का महत्त्वाची?
गुडघ्याच्या झिजेच्या उपचारामध्ये फिजिओथेरपीची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. अनेक महिलांना वाटते की गुडघा दुखत असेल तर पूर्ण विश्रांती घ्यावी. प्रत्यक्षात दीर्घकाळ हालचाल कमी केल्यास गुडघ्याभोवतीचे स्नायू अधिक कमकुवत होतात आणि वेदना वाढू शकतात.
फिजिओथेरपीमध्ये वेदना कमी करण्यासाठी आधुनिक उपचारपद्धतींसोबत गुडघ्याभोवतीचे स्नायू मजबूत करणारे व्यायाम, हालचाल सुधारण्यासाठीचे व्यायाम, संतुलनाचे प्रशिक्षण आणि चालण्याची योग्य पद्धत शिकवली जाते. यामुळे गुडघ्यावरचा ताण कमी होतो, वेदना कमी होतात आणि दैनंदिन कामे अधिक सहज करता येतात.
गुडघा प्रत्यारोपणाची गरज कधी भासते?
जेव्हा गुडघ्याची झीज खूपच वाढलेली असते, एक्स-रेमध्ये सांध्याची मोठ्या प्रमाणात झीज दिसून येते, सतत वेदना होत असतात, रात्री झोपमोड होते, चालणे अत्यंत कठीण होते आणि औषधे तसेच फिजिओथेरपीचा पुरेसा फायदा होत नाही, तेव्हा गुडघा प्रत्यारोपणाचा विचार केला जातो.
विशेषतः महिलांमध्ये काही ठराविक परिस्थितींमध्ये गुडघा प्रत्यारोपणाची गरज अधिक स्पष्टपणे जाणवते. उदाहरणार्थ, गुडघा इतका झिजलेला असेल की घरातील साधी कामे, स्वयंपाक, जिने चढणे-उतरणे, बाजारात चालणे किंवा लांब वेळ उभे राहणे शक्य होत नसेल, तर शस्त्रक्रियेचा विचार करावा लागतो. काही महिलांमध्ये गुडघा वाकडा होणे, पायात वळण येणे, गुडघा पूर्णपणे सरळ किंवा वाकवता न येणे, वारंवार सूज येणे आणि सतत वेदनाशामक औषधांची गरज भासणे हीही महत्त्वाची लक्षणे असतात. जर वेदना इतक्या वाढल्या की झोप, चालणे, बसणे-उठणे आणि स्वतःची काळजी घेणेही कठीण झाले, तर गुडघा प्रत्यारोपण हा अधिक योग्य पर्याय ठरू शकतो.
गुडघा प्रत्यारोपण म्हणजे खराब झालेला सांधा कृत्रिम सांध्याने बदलण्याची शस्त्रक्रिया. योग्य रुग्णामध्ये आणि योग्य वेळी ही शस्त्रक्रिया केल्यास वेदना लक्षणीयरीत्या कमी होतात आणि जीवनमान सुधारते.
शस्त्रक्रियेनंतर फिजिओथेरपीचे महत्त्व
गुडघा प्रत्यारोपण यशस्वी होण्यासाठी शस्त्रक्रियेइतकीच फिजिओथेरपी महत्त्वाची असते. ऑपरेशननंतर गुडघा वाकवणे, सरळ करणे, स्नायू मजबूत करणे, योग्य पद्धतीने चालणे आणि दैनंदिन कामे पुन्हा सुरू करण्यासाठी फिजिओथेरपी आवश्यक असते. नियमित व्यायाम करणाऱ्या रुग्णांमध्ये पुनर्वसन अधिक जलद आणि परिणामकारक होते.
शेवटी...
गुडघेदुखी म्हणजे लगेच गुडघा बदलण्याची गरज असे नाही तसेच गुडघा प्रत्यारोपण म्हणजे घाबरण्याचेही काही कारण नाही. प्रत्येक रुग्णाची स्थिती वेगळी असते. त्यामुळे स्वतःहून उपचार न करता अस्थिरोगतज्ज्ञ आणि फिजिओथेरपिस्ट यांचा सल्ला घेऊन योग्य उपचारपद्धती निवडणे महत्त्वाचे आहे.
लक्षात ठेवा, योग्य वेळी सुरू केलेली फिजिओथेरपी, वजन नियंत्रण आणि नियमित व्यायाम यामुळे अनेक महिलांमध्ये गुडघा प्रत्यारोपणाची गरज वर्षानुवर्षे पुढे ढकलता येते. आणि जेव्हा शस्त्रक्रिया खरोखरच आवश्यक असते, तेव्हा तिची भीती न बाळगता योग्य पुनर्वसनासह नव्या, वेदनामुक्त आणि सक्रिय आयुष्याची सुरुवात करता येते.
- डॉ. श्वेता राऊत मुळगावकर