आज आपण बायकोची कामे करणाऱ्या नवऱ्याला घरगडी असे उपहासाने म्हणतो, पण एकेकाळी मुंबईचा अविभाज्य भाग होता हा घरगडी उर्फ रामा गडी. पण कामात अगदी चोख, प्रत्येकाच्या घरच्या सगळ्या गोष्टी माहीत त्यांना, पण कोणी विचारले तर तोंड बंद म्हणजे बंद!

परवाच 'बावर्ची' हा अतिशय सुंदर, हलकाफुलका असा हिंदी चित्रपट परत एकदा बघितला. खरं सांगू, काही चित्रपट कितीही वेळा पाहिले तरी प्रत्येक वेळेस ते नवीनच वाटतात. परत परत पहावे असे वाटतात. 'बावर्ची' हा त्यातला एक. अर्थात मला काही चित्रपट परीक्षण करायचे नाही हे नक्की आणि तितके या विषयाबद्दल माझे ज्ञानही नाही. पण जेव्हा जेव्हा मी 'बावर्ची' बघते ना, त्या त्या वेळेस मला आमच्या मुंबईतील चाळीतल्या जीवनाची आठवण होते. तीच एक मध्यमवर्गीय फॅमिली. घरात असंख्य अडचणी, प्रत्येकाचे मूड, स्वभाव, इगो त्यातून दैनंदिन घरगुती कामात येणारे ताणतणाव, खरंच चित्रपट निर्माता एखाद्या मुंबईतील चाळीत राहिलेला असावा असेच वाटते. असो!
लग्नानंतर एका छोट्याशा गावातील एक प्रचंड मोठे घर सोडून एका मोठ्या महानगरातील एका चाळीतील एका छोट्याशा खोलीतील संसाराचा एक वाढीव सदस्य झाले मी. माझ्या माहेरी आणि सासरी तशी थोडीफार एकत्र कुटुंब पद्धती. फरक फक्त वास्तूचा. आमची चाळ म्हणजे मुंबईतील मध्यमवर्गीय वास्तुकलेचा नमुनाच जणू. खरंच मला त्या इंजिनिअरला सलाम करावासा वाटतो, ज्याने मुंबईत 'चाळ' ही संकल्पना सर्वप्रथम साकारली, अस्तित्वात आणली. अठरा पगड जातीचे, धर्माचे लोक, प्रत्येकाचे व्यवहार वेगळे, संस्कृती वेगळी, खाणे-पिणे, पेहरावही वेगळा. एकाच छप्पराखाली नांदणाऱ्या या वेगवेगळ्या संस्कृतीत दुसऱ्या कुणाची दखलअंदाजी नसेच मुळी. फक्त एक व्यक्ती सोडली तर आणि ती म्हणजे त्या चाळीचा 'रामा गडी'!
आता 'रामा गडी' म्हणजे काय, हे मुख्य मुंबईकर सोडून इतरांना कळणे तसे अवघडच. त्यासाठी थोडेफार मुंबईच्या इतिहासाकडे वळावे लागेल. मुंबईचे स्थानिक तत्त्वावर दोन भाग; एक म्हणजे टाऊन आणि दुसरा सबर्ब (उपनगर). टाऊन हा भाग म्हणजे अगदी जुनी, ब्रिटिशकालीन वसलेली मुंबई. ज्या वेळी अनेक प्रांतातून नोकरी-धंद्यानिमित्त लोक आले. आता कामधंदा तर मिळाला पण राहायचे कुठे? मग कारखानदारांनी एक शक्कल लढवली, त्यांच्या आणि त्यांच्या परिवाराच्या राहण्यासाठी ती म्हणजे 'चाळ'. कुटुंबे वास्तव्यास आली. मग गरजा वाढू लागल्या. प्रत्येक घरात मुलेबाळे पाच ते सहा. कामाचा व्याप होताच. गावी कसे कामेरी, सालदार प्रकार होते, त्याची गरज चाळीतही पडू झाली आणि जन्माला आला 'रामा गडी'. म्हणजेच घरगडी. आज आपण बायकोची कामे करणाऱ्या नवऱ्याला घरगडी असे उपहासाने म्हणतो, पण एकेकाळी मुंबईचा अविभाज्य भाग होता हा घरगडी उर्फ रामा गडी. आता त्याला 'रामागडी' वा 'रामा' हे नाव का पडले ते मला माहित नाही. पण शेजाऱ्या-पाजाऱ्यांत चर्चा करताना, "आज सकाळी आमचा रामा उशिरा आला", किंवा "आमचा जुना रामा गावी गेला", अशीच चर्चा असते घरगड्याबद्दल. साधारणतः कोकणातील बाणकोट, चिपळूण भागातून आलेले गरीब शेतकरी समाजातील हे लोक. हाफ पँट आणि रंगीत बनियान अथवा शर्ट हा पेहराव. तोंडात सतत पान आणि मुखी रामनाम. असा सर्वसाधारण माणूस म्हणजे रामा गडी.
एका चाळीत साधारण पंचवीस बिऱ्हाडे असत. प्रत्येक घरी सकाळी आणि रात्री उशिरा जाऊन भांडी व कपडे धुणे हे त्यांचे काम. तसेच सकाळी कॉमन बाथरूममध्ये पाण्याचे पिंप भरणे हे मुख्य काम. मुंबईत पाणी पहाटे चार वाजता येई ते सकाळी सातपर्यंत, तोपर्यंत घरातील कामे आटोपलेली असत रामा गड्याकडून. खरं सांगू, खूप घरगडी येऊन गेले, अगदी समाजातल्या वेगवेगळ्या घरातून, वेगवेगळ्या प्रदेशातील, पण आमच्या बाणकोटी रामाची सर कोणाला नाही एवढे नक्की. त्यात इमानदारी रक्तात भिनलेली. "मी तुका फुकट काय दिवचय नाय आणि तुझा फुकट खावचय नाय", हा कोकणी बाणा जपणारी जमात. कधी पैसे-दोन पैसे मिळाले कपड्यात तर परत नक्की करणार. देवभोळी जमात ही.
होळी आणि गणपती म्हणजे मुख्य सण त्यांचे. या दिवसात कुठेच गडी मिळणार नाही तुम्हाला काम करायला. सगळे "कोकण सेवक" बोटीने गावाला पळायचे. जाताना सुके बोंबील, बटाटे, चायपत्ती घेऊन जायचे आणि येताना उकडा तांदूळ, नाचणी आणायचे. प्रत्येक चाळीत तळमजल्यावर जिन्याखालची खोली त्यांची. त्या चाळीत काम करणारे रामा सगळे तिकडे राहायचे. अहो राहायचे कसले, फक्त जेवण आणि सामान ठेवण्यापुरती खोली होती ती. बाकी सगळे झोपणे वगैरे एक तर गल्लीतल्या देवळात, नाहीतर चाळीच्या गॅलरीत. पण कामात अगदी चोख. प्रत्येकाच्या घरच्या सगळ्या गोष्टी माहीत त्यांना. पण कोणी विचारले तर तोंड बंद म्हणजे बंद. ते उघडायचे फक्त रात्री गरम असे दोन ग्लास पोटात गेल्यानंतरच!
भजन हा जणू आत्मा त्यांचा. ढोलकीवाल्या मास्तरसमोर फेर धरून विशिष्ट लकबीत नाचणारे हे 'बाले' आता खूप कमी उरलेत मुंबईत. आता पुढची पिढी शिकली-सवरली, कोण ही कामे करणार? त्यांची जागा आता इतरांनी बळकावली. तसेच पूर्वी घरामध्ये ते गडी असले तरी मान होता त्यांना, तोही आता नाही राहिला. पण मुंबईचा एक दुर्लक्षित म्हणावा असा हा घटक, मध्यमवर्गीयांच्या रोजच्या सवयीचा एक भाग होता हे मात्र नक्की. आजही कुठे "गणा धाव रे मला पाव रे, तुझ्या पेरमाचे किती गुन गाव रे" हे भजन ऐकले, तर पहिले आठवतो 'रामा'.
- सौ. रेशम जयंत झारापकर
मडगाव, गोवा.