
पश्चिम बंगालच्या राजकारणात तृणमूल काँग्रेस (टीएमसी) पक्षातील अंतर्गत मतभेदांबाबत विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. पक्षातील काही आमदारांनी ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र गट स्थापन केला असून, आता याच पार्श्वभूमीवर काही खासदारही वेगळी भूमिका घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
लोकसभेतील टीएमसीच्या काही खासदारांमध्ये पक्षाच्या नेतृत्वशैलीबाबत नाराजी असल्याची चर्चा आहे. विशेषतः अभिषेक बॅनर्जी आणि त्यांच्या निकटवर्तीयांकडून वरिष्ठ खासदारांना अपेक्षित महत्त्व दिले जात नसल्याची भावना काही नेत्यांमध्ये असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आगामी काळात काही खासदार स्वतंत्र भूमिका घेऊ शकतात, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
लोकसभेत टीएमसीचे सध्या २८ खासदार आहेत. त्यापैकी सुमारे १८ खासदार स्वतंत्र गटाशी संपर्कात असल्याचा दावा काही सूत्रांकडून करण्यात येत आहे. मात्र, या संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. दुसरीकडे, राज्यसभेतील टीएमसी खासदारांमध्ये फुटीची शक्यता तुलनेने कमी मानली जात आहे. कारण राज्यसभेतील बहुतांश सदस्य मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी निष्ठावान असल्याचे सांगितले जाते. राज्यसभेत टीएमसीचे १३ सदस्य आहेत.
पश्चिम बंगाल विधानसभेतही पक्षातील मतभेद उघडपणे समोर येत असल्याचे चित्र आहे. ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर गटाने स्वतःलाच ‘खरा तृणमूल काँग्रेस’ असल्याचा दावा केला आहे. बंडखोर आमदार ऋतब्रत बॅनर्जी यांना विधानसभेचे अध्यक्ष रथींद्र बसू यांनी बंडखोर आमदारांनी दिलेल्या पाठिंब्याच्या पत्राला मान्यता दिली आहे. तसेच विरोधी पक्षनेत्यांसाठीच्या राखीव कक्षाची किल्लीही ऋतब्रत बॅनर्जी यांच्याकडे दिली. ऋतब्रत यांना तृणमूल काँग्रेसमधून काढून टाकण्यात आले होते. या घडामोडींमुळे पक्षांतर्गत संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे दिसून येत आहे. माझ्या नेतृत्वाखालील गटाला मिळणारा पाठिंबा आगामी काळात आणखी वाढेल, असे ऋतब्रत बॅनर्जी यांनी सांगितले.
तृणमूल काँग्रेसचे लोकसभेतील खासदार कल्याण बॅनर्जी यांनी मात्र विधानसभा अध्यक्षांना एक पत्र लिहून दुसऱ्याच नेत्यांना विरोधी पक्षनेते, उपनेते, प्रतोद म्हणून घोषित करण्याची विनंती केली आहे. त्यांनी लिहिलेल्या पत्रात पक्षाने विरोधी पक्षनेते म्हणून सोभांदेब चट्टोपाध्याय, उपनेते म्हणून अशिमा पात्रा आणि नयना बंदोपाध्याय, तसेच मुख्य प्रतोद म्हणून फिरहाद हकीम यांच्या नियुक्तीची शिफारस केली आहे.
राज्यातील या घडामोडींमुळे टीएमसीसमोर नव्या राजकीय आव्हानांची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः आमदारांनंतर खासदारांमध्येही मतभेद उघड झाल्यास पक्षासाठी तो मोठा धक्का मानला जाऊ शकतो.
- प्रसन्ना कोचरेकर