रस्ता अपघात अहवालातून स्पष्ट : १०५ जण गंभीर, २२६ जण किरकोळ जखमी


प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यात १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ दरम्यान २,३७० रस्ता अपघातांत २७३ जणांचे मृत्यू झाले आहेत. यात ४०.६५ टक्के म्हणजे १११ जणांचे मृत्यू सुरक्षा साधनांचा (हेल्मेट आणि सीट बेल्ट) वापर न केल्यामुळे झाले. याशिवाय १०५ जण गंभीर, तर २२६ जण किरकोळ जखमी झाले, अशी माहिती गोवा पोलिसांच्या वाहतूक विभागाने केलेल्या रस्ता अपघात २०२५ च्या अहवालातून समोर आली आहे.
दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट हे जीवनरक्षक कवच आहे. असे असताना अनेक दुचाकीचालक विनाहेल्मेट दुचाकी चालवतात. गतवर्षी हेल्मेटचा वापर न केल्यामुळे १०१ जणांना आपला जीव गमवावा लागला. त्यात ६६ दुचाकी चालकांचा, तर ३५ दुचाकीवर मागे बसलेल्यांचा समावेश आहे. हेल्मेट न घातल्यामुळे ७७ दुचाकी चालकांना गंभीर दुखापत झाली. तर १५६ चालक किरकोळ जखमी झाले. मागे बसलेल्या २० जणांना गंभीर, तर ४६ जणांना किरकोळ दुखापत झाली होती.
चारचाकी वाहनातून प्रवास करताना चालक आणि प्रवाशांनी सीटबेल्ट घालणे बंधनकारक आहे. असे असताना अनेक चालक व प्रवासी सीटबेल्टचा वापर करताना दिसत नाहीत. २०२५ मध्ये सीटबेल्ट न घातल्याने १० जणांचा मृत्यू झाला. त्यात ६ वाहनचालक आणि ४ प्रवाशांचा समावेश आहे. सीटबेल्ट न घातल्याने ६ चालक गंभीर, तर १५ चालक किरकोळ जखमी झाले होते. २ प्रवासी गंभीर व ९ प्रवासी किरकोळ जखमी झाले होते.
वर्षभरात सुरक्षा साधनांचा वापर न केल्याने एकूण १११ जणांचा मृत्यू झाला होता. १०५ जण गंभीर जखमी आणि २२६ जण किरकोळ जखमी झाले.
जनजागृती, शिक्षा यांचा अपेक्षित परिणाम नाही
गोवा पोलीस, वाहतूक विभाग तसेच वाहतूक खाते वेळोवेळी हेल्मेट व सीटबेल्ट सक्तीची मोहीम राबवत आहेत. त्यासाठी शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी जनजागृती केली जाते. याशिवाय दंडात्मक कारवाई केली जात आहेत. असे असताना रस्त्यावरील चित्र पाहिले असता त्याचा अपेक्षित परिणाम होताना दिसत नाही. अनेकांकडून गतीने वाहन चालवणे, हेल्मेट परिधान न करणे, सीटबेल्ट न लावणे आदी नियमभंगाचे प्रकार होताना दिसतात.