हे माहीत आहे का ? तासनतास रील्स पाहण्यामुळे होतोय तरुणाईच्या मानसिक आरोग्यावर परिणाम

एक विद्यार्थी दिवसाला सरासरी ३०० हून अधिक रील्स करतो स्क्रोल! एकाग्रतेवरही होतोय गंभीर परिणाम. वाचा सविस्तर.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
हे माहीत आहे का ?  तासनतास रील्स पाहण्यामुळे होतोय तरुणाईच्या मानसिक आरोग्यावर परिणाम

पणजी : आजच्या भारतात माहिती तंत्रज्ञान (IT) आणि सोशल मीडियाच्या प्रसारामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनशैलीत मोठा बदल झाला आहे. 'मेटा आणि इप्सॉस' (Meta-Ipsos) यांच्या संयुक्त विद्यमाने २०२६ मध्ये प्रसिद्ध झालेला ताजा अहवाल आणि एम. एस. युनिव्हर्सिटीच्या सांख्यिकी विभागाने विद्यार्थ्यांवर केलेला संशोधन अभ्यास समोर आला आहे. या दोन्ही महत्त्वाच्या अहवालांमधून भारतातील शॉर्ट-व्हिडिओ आणि इंस्टाग्राम रील्सच्या वापराचे एक अतिशय रंजक आणि तितकेच चिंताजनक वास्तव उघड झाले आहे. हा सांख्यिकी अहवाल प्रामुख्याने दोन बाजूंवर प्रकाश टाकतो; पहिली बाजू म्हणजे भारतातील रील्सची वाढती डिजिटल बाजारपेठ आणि युजर्सचा वाढता प्रतिसाद, तर दुसरी बाजू या डिजिटल आभासी जगामुळे तरुण पिढीच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर होणाऱ्या गंभीर परिणामांचे विश्लेषण करते.


Another modern myth: Shrinking attention spans - Genetic Literacy Project


'मेटा-इप्सॉस'च्या सांख्यिकी आकडेवारीनुसार, आज सोशल मीडिया केवळ शहरांपुरता मर्यादित राहिलेला नसून त्याचा विस्तार ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर झाला आहे. भारतातील तब्बल ९७ टक्के लोक दररोज मेटा प्लॅटफॉर्म्सवर (फेसबुक, इंस्टाग्राम) व्हिडिओ पाहत आहेत. यामध्ये शहरी भागात व्हिडिओ पाहण्याचे प्रमाण ९८ टक्के आहे, तर ग्रामीण भागातही हा आकडा ९४ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. हे प्रमाण देशातील वाढती डिजिटल साक्षरता आणि सुलभ इंटरनेट सुविधेचे निदर्शक आहे. भारतातील युजर्सच्या आवडीनिवडींचा अभ्यास केला असता असे दिसून येते की, ५२ टक्के प्रतिसादासह ब्युटी, मेकअप, फॅशन आणि लेटेस्ट ट्रेंड्स हे विषय पहिल्या क्रमांकावर आहेत. याखालोखाल लाईफस्टाईल आणि फिटनेस (४२ टक्के), विनोदी व्हिडिओ (३९ टक्के), क्रीडा विषयक व्हिडिओ (३८ टक्के) आणि पर्यटनाशी संबंधित व्हिडिओंना (३७ टक्के) पसंती दिली जात आहे. विशेषतः तरुण पिढी म्हणजेच 'जेन झी' (Gen Z) मधील ८९ टक्के युजर्स दररोज या प्रकारचे व्हिडिओ पाहण्यात तासनतास घालवत आहेत.


Is your attention span shrinking? What it means for you | The Established


या अहवालातील सर्वात महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे लोकांची बदललेली शॉपिंग पद्धत हा होय. रील्स आता केवळ मनोरंजनाचे साधन राहिलेले नसून ते थेट ऑनलाईन खरेदीचे (E-commerce) केंद्र बनले आहे. ८१ टक्के भारतीय ग्राहक रील्सच्या माध्यमातून नवीन उत्पादनांचा शोध घेतात, ६६ टक्के ग्राहक ती वस्तू खरेदी करण्याचा विचार करतात आणि तब्बल ४७ टक्के ग्राहकांचे खरेदीचे अंतिम निर्णय हे रील्स पाहूनच ठरतात. कंटेंट क्रिएटर्सचा विचार केल्यास, भारतात इतर अनेक शॉर्ट-व्हिडिओ अ‍ॅप्स उपलब्ध असले तरी इंस्टाग्राम रील्सवर क्रिएटर्सना जवळपास ६० टक्के जास्त प्रतिसाद (लाईक्स, कमेंट्स आणि शेअर्स) मिळत आहे. तसेच सध्याच्या ट्रेंडनुसार युजर्सना अतिशय चकचकीत आणि अद्ययावत एडिटिंग केलेल्या व्हिडिओंपेक्षा 'मेसी डेस्क' किंवा 'प्रोसेस एएसएमआर' (Process ASMR) सारखे साधे, नैसर्गिक आणि वास्तववादी व्हिडिओ अधिक आवडत असल्याचे सांख्यिकीय आलेखावरून स्पष्ट होते.


Social Media Attention Span Statistics 2026: Viral Content Data • SQ  Magazine


या डिजिटल प्रगतीची दुसरी आणि दुसरी चिंताजनक बाजू एम. एस. युनिव्हर्सिटीच्या सांख्यिकी विभागाच्या 'शॉर्ट व्हिडिओज अँड स्टुडंट मेंटल हेल्थ: एन इन्व्हेस्टिगेशन' या संशोधन अहवालातून समोर आली आहे. ३२९ विद्यार्थ्यांवर केलेल्या या अभ्यासानुसार, ८ ते २३ वर्षे वयोगटातील तरुण दररोज त्यांच्या स्मार्टफोनवरील एकूण ५ तासांच्या स्क्रीन टाईमपैकी ६० टक्के वेळ म्हणजेच सुमारे ३ तास केवळ ६० सेकंदांचे रील्स किंवा १५ सेकंदांचे व्हिडिओ पाहण्यात घालवत आहेत. सरासरी १५ सेकंदांच्या गणितानुसार, प्रत्येक विद्यार्थी दररोज दीड ते दोन तासांच्या कालावधीत सुमारे ३६० ते ४८० रील्स पाहतो. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरील 'इन्फिनिट स्क्रोल' (न संपणारे स्क्रोलिंग) आणि 'ऑटोप्ले' (व्हिडिओ आपोआप सुरू होणे) या वैशिष्ट्यांमुळे तरुण या चक्रात नकळतपणे अडकतात.


The Attention Span of the New Generation: How Social Media is Shaping Our  Focus


या अतीवापरामुळे मानवी मेंदूमध्ये 'डोपामाईन' नावाचे रसायन स्रवते, ज्यामुळे अंमली पदार्थांप्रमाणेच एक प्रकारचे व्यसन निर्माण होते. या सांख्यिकी अभ्यासात असे आढळून आले की, ६५ टक्के विद्यार्थी दीर्घकाळ व्हिडिओ पाहिल्यानंतर स्वतःला अपराधी (Guilt) आणि दुःखी समजतात; कारण नंतर त्यांना आपला वेळ वाया गेल्याची जाणीव होते. मुला-मुलींच्या वर्गीकरणानुसार, ४० टक्के मुलींच्या तुलनेत ६० टक्के मुले अधिक काळ म्हणजेच २ ते ३ तास शॉर्ट व्हिडिओ पाहण्यात घालवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या डिजिटल व्यसनामुळे ७५ टक्के तरुणांनी आपल्या कुटुंबियांशी आणि मित्रांशी बोलणे कमी केले आहे, तर ६५ टक्के तरुणांच्या शारीरिक हालचाली मंदावल्याने त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम झाला आहे.


Social media is a drug. Should it be classified as such by the… | by Steven  Paul Winkelstein | UX Collective


या सांख्यिकी अहवालात रात्रीच्या वेळी व्हिडिओ पाहण्याच्या सवयीवरही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. मोबाईल स्क्रीनमधून बाहेर पडणारा निळा प्रकाश (Blue Light) शरीरातील 'मेलाटोनिन' या झोपेचे नियंत्रण करणाऱ्या हार्मोला दाबून टाकतो. परिणामी, रात्री उशिरापर्यंत व्हिडिओ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना अपुऱ्या झोपेचा सामना करावा लागतो, ज्याचा थेट परिणाम त्यांच्या एकाग्रतेवर आणि पर्यायाने त्यांच्या शैक्षणिक कामगिरीवर होत आहे. या अभ्यासातून मानवाच्या स्मरणशक्तीशी आणि एकाग्रतेशी संबंधित अत्यंत धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे.


Is social media killing our attention spans? | by Rashid mbuma | Medium


सतत वेगाने मुव्ह होणाऱ्या व्हिडिओंमुळे मेंदूची माहिती साठवण्याची क्षमता मंदावत असून, बहुतांश विद्यार्थ्यांना त्यांनी काही सेकंदांपूर्वी पाहिलेली शेवटची रील कोणती होती, हेही आठवत नाही. माणसाचा लक्ष केंद्रित करण्याचा कालावधी (अटेंशन स्पॅन) आधीच्या १२ सेकंदांवरून घसरून आता अवघा ८ सेकंद उरला आहे, जो एका सामान्य 'गोल्डफिश' माशाच्या एकाग्रतेच्या कालावधीपेक्षाही (९ सेकंद) कमी आहे. हा सांख्यिकी अहवाल केवळ डिजिटल क्रांतीचे कौतुक करत नाही, तर त्या क्रांतीमुळे निर्माण झालेल्या मानसिक आणि सामाजिक आरोग्याच्या धोक्यांकडे अतिशय तर्कशुद्ध पद्धतीने सर्वांचे लक्ष वेधतो आहे.


How TikTok Rewires Your Brain & Attention Span