मंगळसूत्र हिसकावून पळणाऱ्या दोघांना पोलिसांनी पाठलाग करून पकडले

ओल्ड गोवात केली चोरी; तिस्क उसगावात घेतले ताब्यात


03rd June, 11:56 pm
मंगळसूत्र हिसकावून पळणाऱ्या दोघांना पोलिसांनी पाठलाग करून पकडले

प्रतिनिधी। गोवन वार्ता
फोंडा : ओल्ड गोवा येथे बुधवारी दुपारी एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळून जाणाऱ्या दोघा चोरांना फोंडा पोलिसांनी पाठलाग करून ‘फिल्मी स्टाईल’ने ताब्यात घेतले. ओल्ड गोवा पोलिसांनी त्वरित फोंडा पोलिसांना माहिती दिल्यानंतर तिस्क-उसगाव येथे गस्तीवर असलेल्या साहाय्यक उपनिरीक्षक लक्ष्मीकांत नाईक, सिद्धेश गावस व पोलीस शिपाई साईश मांद्रेकर या पोलीस कर्मचाऱ्यांनी कारवाई केली. त्यानंतर चोरांना ओल्ड- गोवा पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार, ओल्ड गोवा येथे रस्त्यावरून चालत जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र बुधवारी दुपारी चोरांनी हिसकावून पोबारा केला. दोघा चोरांनी दुचाकीवरून फोंड्याच्या दिशेने पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच ओल्ड गोवा पोलिसांनी त्वरित फोंडा पोलिसांशी संपर्क साधला आणि चोरीची माहिती दिली. त्यानंतर तिस्क-उसगाव येथे गस्त घालणाऱ्या रॉबर्ट वाहनातील कर्मचाऱ्यांना चोरांची माहिती देण्यात आली. ओल्ड गोवा पोलिसांचे वाहन चोरांचा पाठलाग करत होते. बगल रस्त्याजवळ पळून जाणाऱ्या चोरांना गस्तीवर आसलेल्या पोलिसांनी दुचाकी थांबविण्याची विनंती केली. मंगळसूत्र घेऊन पळ काढणाऱ्या चोरांनी दुचाकी तशीच पुढे दामटली. त्याबरोबर पोलिसानी फिल्मी स्टाईलने पाठलाग करून त्यांना पकडले.
पोलिसांच्या कामगिरीचे स्थानिकांकडून कौतुक
चोरांना पकडल्यानंतर स्थानिक लोकांनी गर्दी केली होती. मंगळसूत्र चोरून पळ काढणाऱ्या चोरांना तिस्क-उसगाव परिसरातील गस्त घालणाऱ्या रॉबर्ट वाहनातील साहायक उपनिरीक्षक लक्ष्मीकांत नाईक, सिद्धेश गावस व पोलीस शिपाई साईश मांद्रेकर यांनी शिताफीने पकडल्याबद्दल स्थानिक लोकांनी त्यांचे कौतुक केले. फोंडा पोलीस स्थानकाचे निरीक्षक मोहन गावडे यांनी ताब्यात घेतलेल्या दोघा चोरांना ओल्ड गोवा पोलिसांच्या स्वाधीन केले. पुढील प्रक्रिया ओल्ड गोवा पोलीस करत आहेत.             

हेही वाचा