मुलगी वालंका, मुलगा सावियोसह घेतली चोडणकरांची भेट

मडगाव : माजी मंत्री चर्चिल आलेमाव यांनी मागील काही दिवसांपासून काँग्रेस पक्षाचे कौतुक करण्यास सुरुवात केली होती. तसेच काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी दर्शवली होती. आता मुलगी वालंका व सावियो आलेमाव यांच्यासह चर्चिल यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांची भेट घेतली. यामुळे चर्चिल यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबतच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
गोवा प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी गिरीश चोडणकर यांची पुन्हा एकदा नियुक्ती झाली आहे. याच पार्श्वभूमीवर माजी मंत्री चर्चिल आलेमाव यांनी मुलगी वालंका आलेमाव व मुलगा सावियो आलेमाव यांच्यासह चोडणकर यांच्या निवासस्थानी जात त्यांची सदिच्छा भेट घेतली.
गोव्यात आगामी विधानसभा निवडणुकांसाठीचे राजकीय वातावरण तयार होत आहे. या पार्श्वभूमीवर चर्चिल आलेमाव यांनी गिरीश चोडणकर यांची घेतलेल्या भेटीसंदर्भात चर्चा सुरू आहे. चर्चिल आलेमाव यांनी याआधी तब्येतीच्या कारणास्तव यापुढे निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांशी बोलताना आपण बाणावली मतदारसंघातून तर वालंका आलेमाव नावेली मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे सांगत आहेत.
आता गिरीश चोडणकर यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षाचे कौतुक करण्यास सुरुवात केली होती. हा पक्ष कुणीही कितीही प्रयत्न केला तरीही संपुष्टात येणार नाही. आपणास काँग्रेस तिकीट मिळाल्यास आपण ते नक्कीच स्वीकारू असे सांगत काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचीही तयारी दर्शवली होती. या पार्श्वभूमीवर आलेमाव कुटुंबीयांचा काँग्रेसमधील प्रवेश किंवा भविष्यातील राजकीय युतीबाबतच्या चर्चा रंगत आहेत.