
शिरगाव : गोव्यातील डिचोली तालुक्यातील शिरगाव येथे कौटुंबिक वादातून एका महिलेवर गोळीबार करून ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली. बंदुकीतून झाडलेली गोळी घराच्या बंद दरवाजाला भेदून घरात घुसली आणि थेट सोफ्यामध्ये जाऊन अडकली. सुदैवाने संबंधित महिला थोडक्यात बचावल्याने मोठी दुर्घटना टळली. या प्रकरणी डिचोली पोलिसांनी त्यांच्या प्रज्योत गांवकर व गिरीश गांवकर या दोघा पुतण्यांना संशयित म्हणून अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे गोवा प्रमुख तसेच भंडारी समाजाच्या दुसऱ्या गटाचे नेते उपेंद्र गांवकर (Upendra Gaonkar) यांना आधी फोनवरून पुतण्यांनी शिवीगाळ केली. त्यानंतर संशयितांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेऊन हल्ला केला.
त्या वेळी उपेंद्र गावकर घरात नव्हते. मात्र, घरात असलेल्या त्यांच्या पत्नीने हल्लेखोरांना पाहताच प्रसंगावधान राखून मागील दरवाजातून बाहेर पडून जीव वाचवला. त्यानंतर संशयितांनी घराचा बंद दरवाजा तोडून आत प्रवेश केला. याच दरम्यान बंदुकीने गोळीबार करण्यात आला. झाडलेली गोळी दरवाजा भेदून घरात घुसली आणि सोफ्यामध्ये जाऊन अडकली. त्यामुळे संबंधित महिला थोडक्यात बचावली.
घरात कोणीच सापडले नसल्याने संशयितांनी घरातील साहित्याची मोडतोड केल्याचेही सांगितले जात आहे. त्यानंतर त्यांनी बंदूक हातात घेऊनच उपेंद्र गावकर आणि त्यांच्या पत्नीचा गावातील विविध ठिकाणी शोध घेतल्याची माहिती समोर आली आहे. उपेंद्र गावकर घराकडे येत असताना त्यांना घटनेची चाहूल लागल्याने त्यांनी तत्काळ तेथून माघार घेतल्याचे समजते.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण घटना एखाद्या थरारपटातील प्रसंगाप्रमाणे घडली. त्यामुळे शिरगाव परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, हा प्रकार कौटुंबिक वादातून घडल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
संशयित दोघेही उपेंद्र गावकर यांचे पुतणे असून; त्यांनी आपल्या काकीला लक्ष्य करून गोळीबार केल्याचे सांगितले जात आहे. डिचोली पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही संशयितांना अटक केली. पुढील तपास सुरू आहे. दोघांपैकी एक हल्लेखोर सरकारी कर्मचारी आहे व वीजखात्यात कार्यरत आहे. या घटनेमुळे शिरगाव परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. खुलेआम बंदुकीचा वापर झाल्यामुळे कायदा-सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.