Home >> गोवा >> आसगाव पठारावर हाईट बॅरियरला मालवाहू रिक्षा धडकली; वाहतुकीचा खोळंबा

आसगाव पठारावर हाईट बॅरियरला मालवाहू रिक्षा धडकली; वाहतुकीचा खोळंबा

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
05th June, 05:15 pm
आसगाव पठारावर हाईट बॅरियरला मालवाहू रिक्षा धडकली; वाहतुकीचा खोळंबा

म्हापसा : आसगाव पठार येथील गणेशपुरी (म्हापसा) ते मार्ना (शिवोली) रस्त्यावर अवजड वाहनांना प्रतिबंध करण्यासाठी उभारण्यात आलेल्या 'हाईट बॅरियर'ला एका मालवाहू रिक्षेने जोरात धडक दिली. अपघातानंतर ही रिक्षा थेट बॅरियरला अडकून हवेत लटकली. अखेर क्रेनच्या साहाय्याने ही रिक्षा रस्त्यावरून हटवण्यात आली. हा अपघात शुक्रवारी सकाळी घडला.

म्हापसा येथून शिवोली, मोरजी आणि हरमल या भागांत जाणाऱ्या वाहनांसाठी हा रस्ता अत्यंत सोयीचा आणि जवळचा मार्ग ठरत आहे. त्यामुळे सध्या म्हापसा-शिवोली दरम्यानची वाहतूक या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर वाढली असून, हा रस्ता प्रचंड व्यस्त बनला आहे.

या मार्गावर अवजड वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण वाढल्याने सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे (PWD) गणेशपुरी आणि मार्ना पठार अशा दोन ठिकाणी २.५ मीटर उंचीचे 'हाईट बॅरियर' उभारण्यात आले आहेत. अपघातग्रस्त मालवाहू रिक्षेचा चालक मार्ना येथून म्हापशाच्या दिशेने येत होता. या मार्गावर हाईट बॅरियर उभारण्यात आल्याची कल्पना चालकाला नसल्याने त्याची रिक्षा थेट या लोखंडी बॅरियरला जाऊन धडकली. या धडकेमुळे रिक्षेचा समोरील भाग बॅरियरमध्ये अडकला आणि संपूर्ण रिक्षा हवेत लटकली गेली.

सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही; मात्र रिक्षेचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.

हेही वाचा
सर्व पहा