म्हापसा शहरासह बार्देशातील कचरा समस्या गंभीर

शेजारील पंचायतींकडून ओल्या कचऱ्याची विल्हेवाटच लावली जात नाही; सीमाभागातील ‘ब्लॅक स्पॉट्स’वर कचऱ्याचे ढीग

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
3 hours ago
म्हापसा शहरासह बार्देशातील कचरा समस्या गंभीर

म्हापसा : म्हापसा नगरपालिकेने शहरातील घरोघरी कचरा संकलनाचे काम कंत्राट तत्त्वावर (आऊटसोर्स) दिले असले, तरी शहरातील कचरा व्यवस्थापनाची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. कंत्राटदाराचे कामगार कधीकधी कामावर दांडी मारत असल्याने नागरिकांना कचरा उघड्यावर फेकावा लागत आहे. त्यातच, म्हापशाच्या गावसावाडा येथे उघड्यावर कचरा टाकताना पकडल्या गेलेल्या सॅम्युअल ब्रागांझा या युवकाच्या आत्महत्येच्या धक्कादायक प्रकारानंतर आता म्हापसा शहर आणि बार्देश तालुक्यातील कचरा व्यवस्थापनाच्या पद्धतीवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या दुर्दैवी घटनेनंतर गावसावाडा भागातील काही घरांचा गेली तीन दिवस कचराच उचलला गेलेला नाही. त्यामुळे नाईलाजास्तव कचरा उघड्यावर फेकावा लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

बार्देश तालुक्यातील म्हापसा शहराला लागून असलेल्या अनेक ग्रामपंचायतींच्या हद्दीत ओला कचरा गोळा करण्याची कोणतीही यंत्रणा नाही. या पंचायतींकडे ओला कचरा गोळा करून ठेवण्यासाठी किंवा त्यावर प्रक्रिया करण्यासाठी जागाच उपलब्ध नाही. बहुतांश पंचायतींकडे केवळ ‘एमआरएफ’ शेड असून, तिथे फक्त सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण केले जाते. परिणामी, कचरा टाकण्याची योग्य सोय नसल्याने या गावांतील नागरिक म्हापसा शहरातील विविध ‘ब्लॅक स्पॉट्स’, रस्त्यांच्या कडेला आणि राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला मोठ्या प्रमाणावर कचरा आणून टाकत आहेत.

म्हापशातील गावसावाडा, कामरखाजन, आकय, करासवाडा, कुचेली, जुने आझिलो इस्पितळ परिसर, म्हापसा अर्बन बँक परिसर, मुख्य बाजारपेठ, मरड, काणका बायपास, घाटेश्वरनगर-खोर्ली, एकतानगर आणि गणेशपूरी या शहराच्या सीमाभागात उघड्यावर कचरा फेकण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. पालिकेचे कर्मचारी दररोज या ठिकाणचे कचऱ्याचे ढीग उचलतात, परंतु काही वेळातच तिथे पुन्हा कचरा जमा होतो. पालिकेने सीएसआर अंतर्गत सुका कचरा स्वीकारण्यासाठी शहरात दोन अद्ययावत सुविधा उपलब्ध केल्या आहेत, परंतु अनेक नागरिक या सुविधांचा लाभ न घेता काचेच्या बाटल्यांपासून ते कार्डबोर्डपर्यंतचा कचरा रस्त्यांवर फेकत आहेत.

...तर ८० टक्के समस्या सुटेल!

म्हापसा पालिकेकडून अनेकदा कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते, तरीही या प्रकारांना आळा बसलेला नाही. म्हापसा शहरालगतच्या पंचायतींनी जर आपापल्या कार्यक्षेत्रात ओल्या आणि सुक्या कचरा व्यवस्थापनाची चोख योजना राबवली, तर म्हापशातील कचऱ्याची समस्या ८० टक्के सुधारेल. तसेच पालिकेने घरोघरी कचरा गोळा करणाऱ्या यंत्रणेत सुधारणा करून कामगारांकडून नियमित संकलन करून घेण्यावर भर द्यावा, असे मत स्थानिक रहिवासी समीर हरमलकर यांनी व्यक्त केले.

कारवाईच्या पद्धतीवर माजी उपनगराध्यक्षांचे टीकास्त्र

या संपूर्ण प्रकरणावर म्हापशाचे माजी उपनगराध्यक्ष प्रकाश भिवशेट यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, म्हापशात घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. नगरपालिका क्षेत्र स्वच्छ ठेवण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू असतात आणि उघड्यावर कचरा टाकण्याचे समर्थन कुणीही करणार नाही. मात्र, म्हापशात गाड्या भरभरून कचरा आणून टाकणाऱ्या मोठ्या घटकांवर कडक कारवाई होताना दिसत नाही. याउलट, केवळ कार्डबोर्ड सारखी वस्तू टाकणाऱ्या एका स्थानिक युवकाला साधी समज देण्याऐवजी थेट गुन्हा दाखल करून त्याला व त्याच्या कुटुंबाला मानसिक त्रासाला सामोरे जाण्यास भाग पाडणे, हा प्रकार देखील तेवढाच गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे.



हेही वाचा