इराण-अमेरिका संघर्ष तीव्र; कुवेत-बहरीनवर इराणी क्षेपणास्त्र हल्ल्याचा दावा

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
इराण-अमेरिका संघर्ष तीव्र; कुवेत-बहरीनवर इराणी क्षेपणास्त्र हल्ल्याचा दावा

तेहरान : मध्यपूर्वेत इराण-अमेरिका संघर्ष अधिक तीव्र होत असून, इराणने कुवेत आणि बहरीनमधील अमेरिकन तळांना लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने (IRGC)  “शत्रूच्या तळांवर एरोस्पेस क्षेपणास्त्रांद्वारे हल्ले” केल्याचे म्हटले आहे. मात्र, अमेरिकन सैन्याने इराणने डागलेली सात क्षेपणास्त्रे लक्ष्यापर्यंत पोहोचली नसल्याचा दावा केला आहे.

 अमेरिकेने होर्मुझ सामुद्रधुनीकडे येणारे चार इराणी ड्रोन पाडल्याचा दावा केला आहे.  इराणच्या दक्षिण किनाऱ्यावरील देखरेख रडार केंद्रांवर हवाई कारवाई केल्याची माहिती दिली आहे.

याआधी, इराणच्या नौदलाने गल्फ ऑफ ओमान परिसरात अमेरिकन नौदल जहाजांनी छेडछाड केल्याचा आरोप करत इशारतीच्या गोळ्या झाडल्याचे म्हटले होते. मात्र, अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (CENTCOM) हा दावा फेटाळून लावला आहे.

इस्रायल-लेबनॉन सीमावर्ती भागात हिंसाचार सुरूच 

दुसरीकडे, इस्रायल-लेबनॉन सीमावर्ती भागातही हिंसाचार सुरूच असून, दक्षिण लेबनॉनमधील झेबदिन येथे झालेल्या इस्रायली हल्ल्यात एका पॅरामेडिकसह पाच जणांचा मृत्यू झाला. लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयानुसार, मार्चपासून सुरू असलेल्या संघर्षात आतापर्यंत ३,५५८ जणांचा मृत्यू झाला असून; १०,८७० जण जखमी झाले आहेत.

इस्त्रायलच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी बालकाचा मृत्यू 

त्याचवेळी, व्यापलेल्या वेस्ट बँकमध्ये इस्रायली सैन्याच्या गोळीबारात सात महिन्यांच्या पॅलेस्टिनी बालकाचा मृत्यू झाला असून, त्याच्या आई-वडिलांनाही दुखापत झाली आहे. या घटनेनंतर हमासने इस्रायलवर पॅलेस्टिनी नागरिकांच्या जीविताबद्दल बेफिकीर असल्याचा आरोप केला आहे.

मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षामुळे संपूर्ण प्रदेशात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.

हेही वाचा