
पणजी: शुक्रवारी ५ जून रोजी मान्सून गोव्यातील काही भागात दाखल झाल्याचे हवामान खात्याने जाहीर केले. पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून संपूर्ण गोव्याला व्यापण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
यंदा मान्सून केरळमध्ये ३ दिवस उशिरा म्हणजेच ४ जून रोजी दाखल झाला होता. अनुकूल वातावरणामुळे मान्सून केरळ मधून केवळ एका दिवसात गोव्यातील काही भागात दाखल झाला. यामुळे मान्सून गोव्यात वेळेवर दाखल झाला आहे.
राज्यात ५ ते ९ जून दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. यानुसार हवामान खात्याने या दिवसांसाठी पावसाचा ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. राज्यात चोवीस तासात सरासरी १०.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यादरम्यान काणकोण मध्ये ६० मिमी तर मडगाव मध्ये २१ मिमी पावसाची नोंद झाली.
१ ते ५ जून दरम्यान राज्यात सरासरी २७.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. शुक्रवारी पणजीत कमाल ३३ अंश तर किमान २५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
हवामान खात्याने यंदा मान्सून सरासरीपेक्षा कमी असण्याची शक्यता वर्तवली आहे. मान्सून काळात प्रशांत महासागरात ‘अल निनो’ वातावरणीय प्रणाली निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे मान्सूनचे प्रमाण सरासरीच्या ९० टक्क्यांपर्यंत असण्याची शक्यता खात्याने व्यक्त केली आहे.
मागील वर्षी मान्सूनचे केरळमध्ये आगमन आठ दिवस आधीच म्हणजेच २४ मे रोजी झाले होते. यानंतर मान्सून केवळ एका दिवसात म्हणजेच २५ मे रोजी गोव्यात दाखल झाला होता.