
पणजी : सरकारतर्फे राज्यातील १८ हजार हेक्टर खाजन जमीन पुनरुज्जीवित करण्यात येणार आहे. यासाठी या क्षेत्रातील तज्ञासोबत करार केल्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी सांगितले.
शुक्रवारी जागतिक पर्यावरण दिवसानिमित्त पणजी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार सदानंद शेट तानावडे, मंत्री बाबुश मोन्सेरात, आमदार राजेश फळदेसाई, रुडॉल्फ फर्नांडिस, केदार नाईक, मुख्य सचिव व्ही. कांदावेलू, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे लेविन्सन मार्टिन्स व अन्य अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील पर्यावरण जपण्यासाठी सरकार विविध उपक्रम राबवत आहे. कृषी व अन्य खात्यांच्या मदतीने राज्यातील सुमारे ३७ हजार हेक्टर पडीक जमीन पुन्हा लागवडीखाली आणण्यात आली आहे. आता आम्ही खाजन शेतीसाठी देखील प्रयत्न करणार आहोत. यासाठीच १८ हजार हेक्टर खाजन जमिनी पुनरुज्जीवित करण्यात येईल.
वापरलेल्या खाद्यतेलापासून बायोडिझेल तयार करणार
याशिवाय सरकारने एका कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे. यानुसार हॉटेल, रेस्टॉरंट अथवा गाड्यांवरील वापरलेले खाद्यतेल परत घेऊन त्यापासून बायोडिझेल तयार केले जाईल. तेल देणाऱ्यांना त्याचा योग्य तो मोबदला दिला जाईल.
१० लाख झाडे लावण्याचे लक्ष्य
ते म्हणाले, पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सरकार तर्फे तीन महिने ‘हरित गोवा, स्वच्छ गोवा’ उपक्रम राबवला जाईल. यानुसार राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गांवर ‘हरित कॉरिडॉर’ करण्याच्या प्रयत्न करण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत ५ जून ते ५ सप्टेंबर दरम्यान पत्रादेवी ते पोळे दरम्यान १० लाख झाडे लावण्याचे लक्ष्य आम्ही ठेवले आहे.
सामान्य नागरिकांसह पंचायत, नगरपालिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे. खाजगी कंपन्यांनी सीएसआरच्या माध्यमातून या उपक्रमात सहभाग घ्यावा. पर्यावरणाचे रक्षण करणे ही केवळ सरकारची नसून सामूहिक जबाबदारी आहे.
देशात प्रथमच नवीन अभ्यासक्रम
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्यात लवकरच कचरा व्यवस्थापन तंत्रज्ञान हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. असा अभ्यासक्रम देशात सर्वप्रथम गोव्यात सुरू होईल. याद्वारे भविष्यात कचरा व्यवस्थापनासाठी लागणारे आवश्यक तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध होणार.