एक्यूआयचा दर्जा झाला कमी : कुंकळ्ळीतील हवा सुधारली

गोवन वार्ता
पणजी : याआधी राज्यात कुंकळ्ळीमध्ये सर्वाधिक वायू प्रदूषणाची नोंद होत होती. मात्र मागील दोन वर्षे कुंकळ्ळी येथील वायू प्रदूषण कमी होत आहे. एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ दरम्यान राज्यात वास्को आणि बायणामध्ये सर्वाधिक वायू प्रदूषण असल्याचे समोर आले आहे. बायणात १०२ पैकी २० दिवस हवेच्या दर्जाचा निर्देशांक (एक्यूआय) हा मध्यम स्वरूपाचा, तर एक दिवस खराब स्वरूपाचा होता. वास्कोमध्ये १०२ पैकी २४ दिवस एक्यूआय मध्यम, तर १ दिवस खराब होता. असे असले तरी गतवर्षीच्या तुलनेत या दोन्ही ठिकाणी वायू प्रदूषण तुलनेने कमी झाले आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे एका आर्थिक वर्षात राज्यातील विविध १८ ठिकाणी हवेच्या गुणवत्तेचा दर्जा तपासला जातो. यात त्या भागातील पीएम १०, पीएम २.५ या हवेतील प्रदूषण कणांचा तसेच हवेतील सल्फर डायऑक्साईड व नायट्रोजन डायऑक्साईड यांचा अभ्यास केला जातो. याचे विश्लेषण करून २४ तासांच्या सरासरीच्या आधारे एक्यूआय काढला जातो. यानुसार ० ते ५० एक्यूआय चांगला, ५१ ते १०० समाधानकारक, १०१ ते २०० मध्यम, २०१ ते ३०० खराब, ३०१ ते ४०० अतिखराब, तर ४०१ ते ५०० हा गंभीर स्वरूपाचा समजला जातो.
वरील कालावधीत बायणामध्ये केवळ २७ दिवस एक्यूआय चांगल्या दर्जाचा होता. वास्कोमध्ये ३३ दिवस एक्यूआय चांगला होता. कुंकळ्ळीमध्ये १०४ दिवस हवेचे प्रदूषण तपासले होते. यानुसार येथील हवेचा दर्जा ८९ दिवस समाधानकारक, तर केवळ १५ दिवस चांगला होता. पणजीतील हवेच्या दर्जामध्ये सुधारणा झाली आहे. २०२३-२४ मध्ये पणजीतील एक्यूआय १० टक्के दिवस तर २०२४-२५ मध्ये ६ टक्के दिवस हा मध्यम स्वरूपाचा होता. २०२५-२६ मध्ये पणजीत ११६ दिवस हवेचे प्रदूषण तपासण्यात आले. यामध्ये ३५ दिवस हवेचा दर्जा चांगला, तर ८१ दिवस समाधानकारक होता.
एक्यूआयचा परिणाम आरोग्यावर
मध्यम आणि खराब स्वरूपाच्या एक्यूआयमुळे अस्थमा, फुफुसाचे रोग, तसेच हृदय रोग असणाऱ्या व्यक्तींना श्वास घेण्यात त्रास होण्याची शक्यता असते. समाधानकारक एक्यूआयमुळे श्वसनाशीसंबंधित संवेदनशील असलेल्या लोकांना किरकोळ त्रास होण्याची शक्यता असते. तर गंभीर स्वरूपाच्या एक्यूआयमुळे श्वसनाचे गंभीर आजार होण्याची शक्यता असते.