बायंगिणी-जुने गोवा येथे झाला अपघात

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : बायंगिणी-जुने गोवा येथे तीन दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात निलिमा साष्टे (४९) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी जुने गोवा पोलिसांनी अॅक्टिवा चालक उमाशंकर चव्हाण (४८, मूळ उत्तरप्रदेश) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
जुने गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी जुने गोवा पोलीस स्थानकाचे हवालदार अनंत भानजी यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, १ जून रोजी रात्री ८ वा. बायंगिणी-जुने गोवा येथील देसाई वाईन स्टोअरजवळ तीन दुचाकींमध्ये अपघात झाला. जुने गोवे येथून रायबंदरच्या दिशेने उमाशंकर चव्हाण अॅक्टिव्हा घेऊन जात होता. चव्हाण निष्काळजीपणे व भरधाव वेगात दुचाकी चालवत होता. देसाई वाईन स्टोअरजवळ त्याने अचानक दुचाकी उजव्या दिशेला घेतली. त्यामुळे मागे असलेल्या अॅक्टिवा दुचाकी चालकाचा ताबा सुटला आणि दुचाकीची चव्हाणच्या दुचाकीला धडक बसली. त्याबरोबर दुचाकीवर मागे बसलेल्या निलिमा साष्टे रस्त्यावर कोसळल्या. याचदरम्यान समोरून येणाऱ्या ओला ईव्ही स्कूटरच्या चाकाखाली त्या सापडल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना बांबोळी येथील गोमेकॉत उपचारासाठी नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या अपघातात ईव्ही स्कूटर चालक स्मितल सावंत यांनाही दुखापत झाली. उपचारानंतर त्यांना घरी पाठविण्यात आले.
या प्रकरणी जुने गोवा पोलीस निरीक्षक गौरेश मळीक यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक जस्विता नाईक यांनी अपघात प्रकरणी दुचाकी चालक उमाशंकर चव्हाण याच्याविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई केली.