गतवर्षी ऐन तारुण्यात १२२ जणांचा अपघाती मृत्यू

वार्षिक रस्ता अपघात अहवालातून स्पष्ट : २,३७० रस्ता अपघातांत २७३ जणांनी गमावला जीव

Story: प्रसाद शेट काणकोणकर |
just now
गतवर्षी ऐन तारुण्यात १२२ जणांचा अपघाती मृत्यू


गोवन वार्ता
पणजी : राज्यात १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ दरम्यान २,३७० रस्ता अपघातांत २७३ जणांचे मृत्यू झाले आहेत. त्यात सर्वाधिक २५.२७ टक्के म्हणजे ६९ जणांचे मृत्यू २५ ते ३५ वर्षे वयोगटातील झाले आहेत. १८ ते ३५ वर्षे वयोगटातील १२२ युवकांचे मृत्यू झाले आहेत. ही टक्केवारी ४४.६८ एवढी आहे. वरील माहिती वाहतूक विभागाने केलेल्या वार्षिक रस्ता अपघात अहवालातून समोर आली आहे. कुटुंबातील कर्त्या पुरुषाचा अपघाती मृत्यू होत असल्यामुळे तो चिंतेचा विषय बनला आहे.
राज्यात २०२५ मध्ये १,०४९ जण गंभीर किंवा किरकोळ जखमी झाले. मृतांमध्ये १८ ते ३५ वर्षे वयोगटातील एकूण १२२ जण आहे. यामध्ये १०७ पुरुष आणि १४ महिला आहेत. हा वयोगट शिक्षण, नोकरी आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळणारा आहे. अनेक घरातील कर्ते तरुण अपघातात गेल्याने कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. याच वयोगटातील ४६७ जण जखमी झाले असून त्यात ३६० युवक व १०७ युवतींचा समावेश आहे. २५ ते ३५ वर्षे या कमावत्या वयोगटात ६२ पुरुष व ७ महिला अशा ६९ जणांचा मृत्यू झाला. ३५ ते ४५ वर्षे वयोगटातील ३६ पुरुषांचा मृत्यू झाला. हे सर्व वयोगट कुटुंबाचा आर्थिक कणा मानले जातात. ४५ ते ६० वर्षे वयोगटातील ५३ पुरुषांचाही अपघाती मृत्यू झाला असून अनेक कुटुंबांनी आपला आधार गमावला आहे.
एकूण जखमी १,०४९ पैकी ७६२ पुरुष आहेत. २५ ते ३५ वर्षे वयोगटातील १९७ पुरुष जखमी झाले. कमावत्या व्यक्तीच्या अपघातामुळे मुलांचे शिक्षण, घरखर्च आणि वृद्ध आई-वडिलांच्या औषधांचा प्रश्न निर्माण होतो. गोवा पोलीस, वाहतूक पोलीस तसेच वाहतूक खाते नियमांची कडक अंमलबजावणी करत असले तरी तरुणांकडून वेगमर्यादा, विनाहेल्मेट आणि मद्यपान करून वाहन चालवण्याचे नियम मोडले जात आहेत. कुटुंबप्रमुखांनी आणि युवकांनी वाहतूक नियम पाळणे ही काळाची गरज आहे, अन्यथा एका अपघाताने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकते.