जैवविविधता मंडळाचा पुढाकार; आसगो, कोरगूट, बेळो आणि वालय या पारंपरिक गोमंतकीय प्रजातींचेही संवर्धन.

पणजी : गोव्यातून काळाच्या ओघात नामशेष झालेल्या ‘रक्तसाळ’ या गोव्याच्या मूळ भात प्रजातीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी गोवा राज्य जैवविविधता मंडळाने कंबर कसली आहे. सध्या या दुर्मिळ भाताचे बियाणे शेजारील कोकण भागातून गोव्यात आणण्यात आले असून, ते राज्यातील निवडक शेतकऱ्यांना लागवडीसाठी दिले जाणार आहे. लोकसहभागाच्या माध्यमातून या पारंपारिक बियाण्याचे संवर्धन करण्याचा मंडळाचा मानस असल्याची माहिती गोवा जैवविविधता मंडळाचे सदस्य सचिव प्रदीप सरमोकादम यांनी दिली.
या संदर्भात माहिती देताना सरमोकादम म्हणाले की, ‘साळ’ ही गोव्याची अत्यंत जुनी आणि हक्काची भात प्रजाती आहे. गोव्याचे थोर कवी बा. भ. बोरकर यांनीही आपल्या कवितेत ‘गड्या साळीचा रे भात’ असा उल्लेख करत आमच्या या तांदळाच्या वैभवाचे वर्णन केले आहे. आम्ही जेव्हा संपूर्ण कोकण पट्ट्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला, तेव्हा गोव्यातून हरवलेल्या ‘रक्तसाळ’ आणि ‘भांगरसाळ’ यांसारख्या अत्यंत दर्जेदार भात प्रकारांची माहिती आम्हाला मिळाली.

‘रक्तसाळ’ हे गोव्याचे मूळ बियाणे असून सध्या ते स्थानिक शेतकऱ्यांकडे उपलब्ध नाही. मंडळाने अथक प्रयत्नांनंतर कोकणातून केवळ १०० किलो बियाणे गोळा करून गोव्यात आणले आहे. जे शेतकरी या भाताची लागवड करण्यास उत्सुक आहेत, त्यांना हे बियाणे दिले जाईल. मात्र, बियाणे देताना त्यांच्यासमोर एक अनोखी अट ठेवली जाणार आहे. त्यानुसार, पीक आल्यानंतर शेतकऱ्यांनी उत्पादनातून १ ते दीड किलो बियाणे मंडळाला परत करायचे आहे, जेणेकरून पुढील वर्षी ते इतर शेतकऱ्यांना देऊन लोकसहभागातून या बियाण्याचे मोठ्या प्रमाणावर संवर्धन करता येईल.
मधुमेहींसाठी गुणकारी
गोव्यात रक्तसाळ व्यतिरिक्त आसगो, कोरगूट, बेळो आणि वालय अशा काही पारंपरिक बियाण्यांच्या प्रजाती आहेत. ‘रक्तसाळ’ हे भात तांबड्या रंगाचे असते आणि त्याचा भातही तांबूस रंगाचा होतो. वैज्ञानिक विश्लेषणानुसार, या तांदळात ‘झिंक’ हे खनिज मोठ्या प्रमाणावर आढळते. हे अन्नघटक आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असून, ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे आणि जे रोजच्या जेवणात भात खाणे टाळतात, असे लोक या तांदळाचा भात हक्काने आणि अधिक प्रमाणात खाऊ शकतात, असे सरमोकादम यांनी स्पष्ट केले.
![]()