मराठा समाजाच्या निवेदनानंतर आरक्षणासाठी एसटी समाज आक्रमक

अमित शहांना भेटणार : भाजप प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट


03rd June, 11:50 pm
मराठा समाजाच्या निवेदनानंतर आरक्षणासाठी एसटी समाज आक्रमक

भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांना निवेदन सादर करताना एसटी समाजाचे नेते.

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षणाची अंमलबजावणी घाईगडबडीत न करता समाजाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात व्हावी, अशी मागणी गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाने केल्यानंतर राज्यातील एसटी समाज आक्रमक झाला आहे. एसटी समाजातील नेत्यांनी एकत्र येऊन आगामी विधानसभा निवडणुकीतच आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. बुधवारी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
विधानसभा निवडणुका जवळ येत असल्याने राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. संसदेत गोवा एसटी आरक्षण विधेयक मंजूर होऊन त्याचे कायद्यात रूपांतर झाले असले तरी अद्याप अधिसूचना जारी झालेली नाही. त्यामुळे आरक्षणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झालेली नाही. अधिसूचना जारी करून आगामी विधानसभा निवडणुकीत एसटी आरक्षण लागू करावे, अशी मागणी एसटी समाजाकडून करण्यात येत आहे.
गावडा, कुणबी, वेळीप आणि इतर काही समाजघटकांचा समावेश एसटी प्रवर्गात होतो. नुकत्याच दिल्ली दौऱ्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत चर्चा केली होती. आरक्षण लागू करण्यास सर्वसाधारण पाठिंबा असला तरी गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाने वेगळी भूमिका घेतल्यामुळे नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
लोकसंख्येच्या प्रमाणानुसार राज्यातील चार विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी आरक्षित होण्याची शक्यता आहे. कोणते मतदारसंघ आरक्षित करायचे याचा अंतिम निर्णय निवडणूक आयोग घेणार आहे.
एसटी आरक्षणाबाबत भाजपची भूमिका स्पष्ट : दामू नाईक
बुधवारी फातोर्डा येथे एसटी समाजाच्या नेत्यांची भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीला सभापती गणेश गावकर, मंत्री रमेश तवडकर, आमदार गोविंद गावडे, आमदार आंतोन वाझ, माजी मंत्री प्रकाश वेळीप आणि माजी आमदार वासुदेव गावकर उपस्थित होते. एसटी आरक्षणाबाबत भाजपची भूमिका स्पष्ट असून आगामी निवडणुकीत एसटी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याचे दामू नाईक यांनी सांगितले.
आरक्षणाबाबत निवडणूक आयोग घेणार निर्णय : मुख्यमंत्री
दामू नाईक यांच्या भेटीनंतर एसटी समाजाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. सभापती गणेश गावकर, मंत्री रमेश तवडकर, आमदार गोविंद गावडे आणि आमदार आंतोन वाझ यांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की, एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत चर्चा सुरू आहे आणि त्यावर कार्यवाही केली जाईल. कोणते मतदारसंघ आरक्षित करायचे याचा निर्णय राज्य सरकार नव्हे तर निवडणूक आयोग घेईल.
केपे, कुडचडेत आरक्षण शक्य : प्रकाश वेळीप
केपे तालुक्यात एसटी समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे केपे आणि कुडचडे हे मतदारसंघ आरक्षणाच्या कक्षेत येऊ शकतात, असे माजी मंत्री प्रकाश वेळीप यांनी सांगितले. गोमंतक मराठा समाजाने दिलेल्या निवेदनाबाबत प्रतिक्रिया विचारली असता, प्रकाश वेळीप यांनी कोणतीही सविस्तर टिप्पणी करण्यास नकार दिला. लोकशाहीत प्रत्येकाला आपली भूमिका आणि मागणी मांडण्याचा अधिकार असल्याचे ते म्हणाले.
एसटी समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी मी सुरुवातीपासून लढा देत आहे. काहीजण समाजात फूट पाडण्याचे राजकारण करत आहेत. एसटी समाजाला राजकीय आरक्षण मिळाले असून त्याची अंमलबजावणी आगामी विधानसभा निवडणुकीत होईल.
_ रमेश तवडकर, आदिवासी कल्याण मंत्री 

हेही वाचा