५९ बंडखोर आमदारांच्या गटाला मंजुरी, ऋतब्रता बॅनर्जी विरोधी पक्षनेते

न्यूज डेस्क। गोवन वार्ता
काेलकाता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. तृणमूल काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांच्यावर पक्षातील अनेक नेते नाराज आहेत. पक्षातून निलंबित केलेले आमदार संदीपान साहा आणि आमदार ऋतब्रता बॅनर्जी यांनी बुधवारी विधानसभेत त्यांना ५० पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला. ऋतब्रता बॅनर्जी आता पश्चिम बंगालचे नवे विरोधी पक्षनेते बनले आहेत.
दोन दिवसांपूर्वी तृणमूलमधून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर नेतृत्वाला आव्हान देत ऋतब्रता यांनी विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला होता. त्यांनी आपल्याला ५९ आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्र विधानसभेच्या अध्यक्षांना दिले होते. विधानसभा अध्यक्षांनी ५९ बंडखोर आमदारांच्या गटाला मंजुरी देत ऋतब्रता यांना विरोधी पक्षनेते म्हणून मान्यता दिली. ऋतब्रता बॅनर्जी हे उलुबेरिया-पूर्वा विधानसभेचे आमदार आहेत. तृणमूलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्यसभेचे खासदार होते.
तृणमूलच्या तब्बल ५८ आमदारांनी विधानसभेचे अध्यक्ष रथींद्रनाथ बोस यांना पत्र सादर करून ऋतब्रता बॅनर्जी यांना विरोधी पक्षनेते म्हणून प्रस्तावित केले होते. त्यांच्या गटाला तृणमूलचा ‘खरा’ विधिमंडळ पक्ष म्हणून मान्यता द्यावी, असा दावा बंडखोर आमदारांनी केला आहे. आमदार जावेद खान, संदीपान साहा, सबिना यास्मिन आणि सेउली साहा यांची सभागृहात उपनेते म्हणून नियुक्ती झाली आहे. आमदार अख्रुझमान यांची पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती झाली आहे.
गेल्या आठवड्यात तृणमूलचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी पक्षाचे सरचिटणीस या नात्याने विधानसभेच्या अध्यक्षांना पत्र लिहून सोभनदेव चट्टोपाध्याय यांचे नाव विरोधी पक्षनेते म्हणून प्रस्तावित केले होते; मात्र सोभनदेव यांना पाठिंबा देणाऱ्या अनेक आमदारांच्या सह्या बनावट असल्याचा आरोप ऋतब्रता यांनी केला होता. या आरोपानंतर विधानसभा अध्यक्षांनी हा प्रस्ताव स्वीकारला नव्हता.
ममता बॅनर्जींचा प्रभाव ओसरला?
विधानसभेचा निकाल लागल्यानंतर तृणमूलमधील अनेक नेते ममता बॅनर्जी यांच्या विरोधात भूमिका घेऊ लागले आहेत. अनेक नेत्यांनी ममता बॅनर्जींनी बोलावलेल्या बैठकांना अनुपस्थिती लावली. ४ मे रोजी निकाल लागल्यानंतर दोन दिवसांनी ६ मे रोजी ममता बॅनर्जी यांनी बोलावलेल्या बैठकीला ८० पैकी ७१ आमदार उपस्थित होते. १९ मे रोजी आयोजित केलेल्या बैठकीला ६५ आमदार उपस्थित होते, तर ३१ मे रोजी बोलावलेल्या बैठकीला केवळ २० आमदारांनी हजेरी लावली होती.
कोलकाताच्या महापौरांचाही राजीनामा
ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे तृणमूलचे नेते फिरहाद हकीम यांनी कोलकाता महापालिकेच्या महापौरपदाचा राजीनामा दिला आहे. ममता बॅनर्जी यांच्यासाठी हा दुसरा मोठा धक्का मानला जात आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते फिरहाद हकीम हे २०१८ पासून या पदावर होते. ज्येष्ठ नेते कुणाल घोष यांनी सांगितले की, हकीम यांनी ममता बॅनर्जी यांच्या परवानगीने राजीनामा दिला आहे. राज्य सरकार महापालिका बरखास्त करत असल्याच्या हालचालींमुळे त्यांना सन्मानपूर्वक निरोप हवा होता. आतापर्यंत ममतांनी परवानगी दिली नव्हती. मात्र, बुधवारी परिस्थिती लक्षात घेऊन ममतांनी त्यांना राजीनामा देण्याची परवानगी दिली.