शेकडो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर

जोयडा : जोयडा तालुक्यातील गणेशगुडी येथील काळी नदीत चालणाऱ्या प्रसिद्ध ‘व्हाईट वॉटर राफ्टिंग’सह इतर सर्व जलसाहसी क्रीडाप्रकारांवर प्रशासनाने १ जूनपासून बंदी घातली आहे. या अचानक लादण्यात आलेल्या बंदीमुळे स्थानिक पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. राफ्टिंग व्यवसायावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे अवलंबून असणारे शेकडो स्थानिक युवक, व्यावसायिक आणि त्यांच्या कुटुंबांसमोर आता गंभीर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. परिणामी, ही बंदी तातडीने मागे घेण्यात यावी, अशी जोरदार मागणी आता जोर धरू लागली आहे.
या समस्येवर तोडगा काढण्यासाठी तालुक्यातील शेकडो युवकांनी आवेडा ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष अरुण भगवतीराज यांच्या नेतृत्वाखाली जोयडाचे तहसीलदार मंजुनाथ मुन्नोळी यांची भेट घेतली आणि त्यांना आपल्या मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर केले.
धरणाच्या नियंत्रणामुळे पुराचा धोका नाही!
निवेदनात व्यावसायिकांनी आणि गावकऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, काळी नदीच्या खालच्या प्रवाह क्षेत्रात पूरस्थिती निर्माण होण्याची कोणतीही शक्यता नाही. ही नदी पूर्णपणे धरणाच्या नियंत्रणाखाली असून, पावसाळ्यातही पाण्याचा विसर्ग अत्यंत नियंत्रित पद्धतीने केला जातो. सध्या धरणातील पाण्याची पातळी ५२६ मीटर असून, तिची कमाल क्षमता ५६४ मीटर इतकी आहे. त्यामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरेपर्यंत पाणी नियंत्रित प्रमाणातच सोडले जाते.
तसेच, काळी नदीला मिळणाऱ्या उपनद्या आणि छोटे ओढे धरणाच्या मुख्य पाणलोट क्षेत्रातच (कॅचमेंट एरिया) मिळत असल्याने, धरणाखालील भागात पुराचा धोका नगण्य आहे. यापूर्वी १९९४ मध्ये झालेल्या अत्यंत भीषण अतिवृष्टीतही या भागात नदीच्या पुरामुळे कोणतेही नुकसान झाले नव्हते, असा महत्त्वपूर्ण दाखलाही या निवेदनात देण्यात आला आहे.
सुरक्षेच्या नियमांसह परवानगी देण्याची विनंती
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी प्रशासनाने कधीही जलसाहसी क्रीडाप्रकारांवर अशी सरसकट आणि पूर्ण बंदी घातली नव्हती. मात्र, मागील वर्षापासून आणि यावर्षीही पावसाळ्याच्या सुरुवातीलाच राफ्टिंग बंद करण्यात आल्याने स्थानिक अर्थकारणाला मोठा ब्रेक लागला आहे.
"राफ्टिंग बंद झाल्याने स्थानिकांचे हक्काचे रोजगार ठप्प झाले आहेत. पर्यटन आणि रोजगार सुरू ठेवण्यासाठी प्रशासनाने आवश्यक असल्यास सुरक्षेचे अधिक कडक नियम लागू करावेत, परंतु जलसाहसी क्रीडाप्रकार पूर्णपणे बंद करून शेकडो कुटुंबांना अडचणीत आणू नये."
— अरुण भगवतीराज, माजी अध्यक्ष, आवेडा ग्रामपंचायत
निवेदन सादर करताना शरणप्पा गद्दी, श्रीधर दबगार, 'काळी ब्रिगेड'चे सचिव समीर मुजावर, बिजू नायर, मल्लिकार्जुन, मौलाली, नागराज नाईक यांच्यासह शेकडो स्थानिक तरुण उपस्थित होते. जोयडाचे तहसीलदार मंजुनाथ मुन्नोळी यांनी गावकऱ्यांचे निवेदन स्वीकारून, या सर्व समस्या व मागण्या तातडीने जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देऊन योग्य तो मार्ग काढला जाईल, असे आश्वासन दिले आहे.