जावयाला लग्नात दिली 'चांदीची कोल्हापुरी चप्पल’

लग्नतील या अहेराची सोशल मीडियावर चर्चा

Story: वेब डेस्क| गोवन वार्ता |
31 mins ago
जावयाला लग्नात दिली 'चांदीची कोल्हापुरी चप्पल’

एक अनोखी घटना सध्या कोल्हापूर जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे. सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडलेले असतानाही, एका वधूपित्याने आपल्या जावयाच्या आदरातिथ्यासाठी तब्बल दीड किलो चांदीची हुबेहूब ‘कोल्हापुरी चप्पल’ तयार करून घेतली आहे. पारंपरिक संस्कृती आणि कौशल्याचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या चांदीच्या चपलेचे मूल्य सुमारे ४ लाख रुपये असून, याची सध्या सर्वत्र कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे.

कोल्हापुरातील एका प्रतिष्ठित कुटुंबात विवाह निश्चित झाल्यानंतर, जावयाला काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण आणि संस्मरणीय भेट देण्याची इच्छा वधूपित्याने व्यक्त केली होती. या संकल्पनेतून त्यांनी चांदीची चप्पल घडवण्याचे काम सांगली जिल्ह्यातील एका सराफाकडे सोपवले. त्यानंतर कोल्हापूरमधील एका सिद्धहस्त चांदी कारागिराने आपल्या सहकाऱ्यांसह तब्बल आठ दिवस अहोरात्र परिश्रम घेऊन ही कलाकृती साकारली. सुमारे २२ हजार रुपये मजुरी देऊन तयार करण्यात आलेली ही चप्पल चांदीची असली, तरी ती खऱ्या चामड्याच्या पारंपरिक कोल्हापुरी चपलेसारखीच हुबेहूब दिसते, हे या कलेचे विशेष वैशिष्ट्य आहे.

पश्चिम महाराष्ट्रात, विशेषतः कोल्हापूर आणि सांगली परिसरात 'अधिक मासात' किंवा विवाहप्रसंगी जावयाला विशेष अहेर देण्याची जुनी सामाजिक परंपरा आहे. याच परंपरेचे जतन करत वधूपित्याने त्याला एक राजेशाही स्वरूप दिले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, ही वैशिष्ट्यपूर्ण चप्पल घडवणाऱ्या कारागिराने याच काळात शुद्ध पाण्यासाठी तब्बल ४ ते ५ किलो वजनाचा चांदीचा रांजण (पिंप) देखील तयार केला आहे. त्यामुळे या कारागिराच्या हस्तकलेचेही सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. बाजारात चांदीचे दर कडक असतानाही, कौटुंबिक जिव्हाळ्यापोटी आणि हौसेपोटी करण्यात आलेल्या या शाही अहेराची चर्चा आता पंचक्रोशीत रंगू लागली आहे.

हेही वाचा