दोन सुटकेसमध्ये १ लाखांपेक्षा अधिक रक्कम

कोलकाता : मध्य कोलकात्यातील प्रसिद्ध 'सुरेंद्रनाथ कॉलेज'मध्ये एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पावसाळ्यापूर्वी कॉलेज कॅम्पसमध्ये सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेदरम्यान, युनियनच्या एका खोलीतील कपाटातून तब्बल १ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, या नोटांना वाळवी लागली असून त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या शोध मोहिमेनंतर दुसऱ्याच दिवशी त्याच कॉलेजच्या छतावर एक आलिशान 'गुपित खोली' देखील आढळून आली आहे. या प्रकरणावरून आता पश्चिम बंगालमध्ये राजकीय वाद पेटला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या सूचनेनुसार, पावसाळ्यापूर्वी सुरेंद्रनाथ कॉलेजमध्ये साफसफाईचे काम सुरू होते. मुचीपारा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (२ जून २०२६) कामगार युनियनच्या खोलीत स्वच्छता करत असताना त्यांना एका कपाटात दोन जुन्या मध्यम आकाराच्या सुटकेस आढळल्या. कॉलेज प्रशासनाच्या उपस्थितीत जेव्हा या सुटकेस उघडण्यात आल्या, तेव्हा तिथे १०० आणि ५०० रुपयांच्या नोटांचे मोठे बंडल सापडले. दीर्घकाळ पडून राहिल्यामुळे या नोटांना वाळवी लागली असून त्या पूर्णपणे खराब आणि मातीकट झाल्या आहेत.
या पैशांचा शोध लागल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कॉलेज प्रशासनाला आणखी एक धक्का बसला. अधिकारी जेव्हा कॉलेजच्या छताची तपासणी करण्यासाठी गेले, तेव्हा तिथे तृणमूल काँग्रेसच्या एका विद्यार्थी नेत्याची 'गुपित खोली' आढळून आली. या खोलीत वातानुकूलित यंत्र, आरामदायी गादी असलेला बेड, घड्याळ आणि भिंतींवर आकर्षक चित्रे लावण्यात आली होती. शैक्षणिक संस्थेच्या आवारात अशा प्रकारे खाजगी ऐषारामाची सोय केल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
या घटनेनंतर मुचीपारा पोलिसांनी दोन्ही सुटकेस आणि तिथे सापडलेली काही कागदपत्रे जप्त केली आहेत. नोटांची स्थिती अत्यंत खराब असल्याने त्यांची अचूक किंमत मोजण्याचे काम सुरू आहे. हा पैसा कोणाचा आहे आणि तो तिथे कधीपासून ठेवण्यात आला होता, याचा शोध पोलीस घेत आहेत.
दरम्यान, यावरून भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये जोरदार राजकीय वाद पेटला आहे. भाजपचे आमदार सजल घोष यांनी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे थेट आरोप केले आहेत. कॉलेज युनियनच्या खोलीत कोणाच्याही नकळत एवढी मोठी रक्कम कशी राहू शकते? हा जनतेचा पैसा असून यामागे मोठी आर्थिक गैरबंदी आहे, असा आरोप करत त्यांनी दोषी तृणमूल नेत्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. या संपूर्ण प्रकरणावर सुरेंद्रनाथ कॉलेज प्रशासनाने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.