मालवीय नगर अग्नितांडव प्रकरणात हॉटेलच्या सहमालकाला अटक

बेकायदेशीरपणाचा कळस; ६ खोल्यांची परवानगी प्रत्यक्षात २५ खोल्या

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
just now
मालवीय नगर अग्नितांडव प्रकरणात हॉटेलच्या सहमालकाला अटक

नवी दिल्ली : दिल्लीतील मालवीय नगर परिसरातील हौज रानी भागात असलेल्या ‘फ्लॉरिश स्टे बीॲंडबी’ या हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये लागलेल्या भीषण आगीत २१ जणांचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी हॉटेल इमारतीचा सहमालक लवकेश बजाज याला अटक केली आहे. आगीत १० भारतीय, ९ आफ्रिकन नागरिक आणि २ तुर्कमेनिस्तानच्या नागरिकांचा मृत्यू झाला.

प्राथमिक तपासात हॉटेलकडे आवश्यक अग्निसुरक्षा ‘ना हरकत’ दाखला (‘NOC’) नसल्याचे समोर आले आहे. पाच मजली इमारतीत केवळ एकच प्रवेश-निर्गमन मार्ग, कायमस्वरूपी बंद खिडक्या आणि सेन्सर-ऑपरेटेड मुख्य दरवाजा असल्याने बचावकार्यात अडथळे निर्माण झाल्याचा संशय आहे.

या दुर्घटनेत ५८ जणांना बाहेर काढण्यात आले, मात्र त्यापैकी २१ जणांना मृत घोषित करण्यात आले. तपासात हॉटेलला फक्त ६ खोल्यांची परवानगी असताना सुमारे २५ खोल्या चालवल्या जात असल्याचे उघड झाले आहे. याशिवाय, आवश्यक मंजुरीशिवाय अतिरिक्त मजले बांधल्याचाही आरोप आहे.

या प्रकरणी पोलिसांनी सदोष मनुष्यवधासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून, इतर संबंधित व्यक्तींच्या भूमिकेचाही तपास सुरू आहे.

हेही वाचा