बस यायची थांबली... पण गाव थांबले नाही!

विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कुंभ्राळ ग्रामस्थांचे श्रमदान; बससेवा सुरू करण्याची मागणी

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
38 mins ago
बस यायची थांबली... पण गाव थांबले नाही!

जोयडा : जोयडा तालुक्यातील जंगलबेट ग्रामपंचायत हद्दीतील कुंभ्राळ गावात विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ग्रामस्थांनी एकजुटीचा आदर्श घालून दिला आहे. गावाला जोडणाऱ्या रस्त्याच्या कडेला भराव नसल्याने बससेवा बंद झाल्यानंतर सुमारे ३० ग्रामस्थांनी एक दिवस आणि एक रात्र श्रमदान करून रस्त्याच्या कडेला माती टाकून भराव घातला.

कुंभ्राळ गावाला जोडणाऱ्या सुमारे दोन किलोमीटर रस्त्याच्या कडेला भराव नसल्याने वाहतूक धोकादायक बनली होती. त्यामुळे बससेवा बंद करण्यात आली होती. याचा फटका गावातील विद्यार्थी आणि नागरिकांना बसत होता. गावात प्राथमिक शिक्षणानंतर पुढील शिक्षणाची सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांना जंगलबेट येथे जावे लागते. सध्या सुमारे २० विद्यार्थी शाळा व महाविद्यालयीन शिक्षणासाठी या मार्गावर अवलंबून आहेत.

बससेवा बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती निर्माण झाली होती. त्यातच हा मार्ग घनदाट जंगलातून जात असल्याने विद्यार्थ्यांना अस्वल, रानगवा आणि इतर वन्यप्राण्यांचा धोका पत्करून प्रवास करावा लागत होता. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला होता.

यावर उपाय म्हणून ग्रामस्थांनी प्रशासनाची वाट न पाहता स्वतःच पुढाकार घेतला. युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येत एक दिवस व एक रात्र श्रमदान करून रस्त्याच्या कडेला माती टाकून भराव घातला. या उपक्रमाला काँग्रेस नेते रतन कलमनकर यांनी सहकार्य केले.

या श्रमदानात दत्ता कदम, आनंद कदम, नामदेव कदम, कमलाकर कदम, दिनेश कदम, अनिल कदम, संतोष कदम, गीता कदम, मनीषा कदम, दीपा कदम, जानकी कदम, द्रौपदी कदम, पार्वती कदम, आनंदी कदम यांच्यासह सुमारे ३० ग्रामस्थ सहभागी झाले होते.

ग्रामस्थांनी रस्ता सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला असला तरी संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी व कुंभ्राळ गावासाठी बससेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा