उड्डाणे स्थगित; अमेरिका-इराण संघर्ष तीव्र

कुवेत : इराणने केलेल्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्यानंतर कुवेतच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा गोंधळ उडाला असून; अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. हल्ल्यात विमानतळाच्या टी१ (T1) इमारतीला फटका बसल्याने अनेक उड्डाणे स्थगित करण्यात आली. काही विमानांचे मार्ग बदलून पर्यायी विमानतळांकडे वळवण्यात आले.
संघर्ष तीव्र
अमेरिकेने कुवेतमध्ये इराणी ड्रोन हवेतच रोखल्याचा दावा केला आहे. अमेरिकेने इराणच्या किश्म बेटावर "स्वसंरक्षणात्मक कारवाई" केल्यानंतर हा संघर्ष आणखी तीव्र झाल्याचे दिसून येत आहे.
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी स्पष्ट केले की, इराणने होर्मुझ सामुद्रधुनी खुली केली तरी निर्बंधांमध्ये कोणतीही सवलत दिली जाणार नाही. अणुकार्यक्रम आणि युरेनियम संवर्धन थांबवण्याबाबत ठोस पावले उचलल्याशिवाय निर्बंध हटवले जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
लेबनॉन-इस्रायल संघर्षामुळे तणाव वाढला
दरम्यान, लेबनॉनमध्येही संघर्ष सुरू असून हिजबुल्लाहने दक्षिण भागात इस्रायली सैन्यावर १३ हल्ले केल्याचा दावा केला आहे. युद्धबंदीबाबत चर्चा सुरू असताना परिस्थिती आणखी तणावपूर्ण बनली आहे.