३७ जणांची सुटका; विदेशी नागरिकांचा समावेश

नवी दिल्ली : दिल्लीतील मालवीय नगर परिसरातील हौज राणी येथील मिकासा ईन हॉटेलमधील रेस्टॉरेंटला (fire broke out at a hotel in Delhi's Malviya Nagar) बुधवारी सकाळी भीषण आग लागून किमान २१ जणांचा मृत्यू झाला. २१ जण जखमी झाले तर ३७ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
या हॉटेलच्या तळमजल्यावर रेस्टॉरंट असून, अरुंद गल्लीतील या पाच मजली इमारतीत सुमारे ४० जण वास्तव्यास असल्याची माहिती आहे. यातील अनेक विदेशी नागरिक वैद्यकीय उपचारांसाठी भारतात आले होते.

घटनेवेळी बहुतांश पाहुणे झोपेत असल्याने मोठी जीवितहानी झाल्याचे सांगितले जात आहे. सकाळी सुमारे ८.५० वाजण्याच्या सुमारास हॉटेलच्या तळमजल्यावरील रेस्टॉरंटला आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. बचावकार्यासाठी पाण्याच्या गाड्या, वॉटर बाऊझर, क्विक रिस्पॉन्स वाहनांसह विविध पथके तैनात करण्यात आली.

हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये काम करणारे शेफ केसर सिंग यांनी या घटनेचा थरारक अनुभव सांगितला. "सकाळी सुमारे ८ वाजता मी इलेक्ट्रिक स्टोव्ह सुरू करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी अचानक ज्वाळा दिसू लागल्या. काही क्षणांतच संपूर्ण हॉटेल आगीच्या विळख्यात सापडल्याचे लक्षात आले.

मी तत्काळ माझ्या सहाय्यकाला हॉटेलला आग लागल्याची माहिती दिली," असे त्यांनी सांगितले. दुसरे कर्मचारी नेगी यांनी सांगितले की, "मी बाहेर आलो तेव्हा संपूर्ण हॉटेल आगीने वेढले होते. कशीबशी माझी सुटका करण्यात यश आले." आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, प्रशासनाकडून तपास सुरू करण्यात आला आहे.