फातोर्डा येथे दामू नाईक यांच्या निवासस्थानी एसटी नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली.

मडगाव : एसटी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबत भाजपची भूमिका अत्यंत ठाम आहे. राजकीय आरक्षण मिळावे यासाठी पक्षाच्या कोअर समितीच्या बैठकीतही ठराव मंजूर करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची याच महिन्यात भेट घेऊन हा विषय मार्गी लावला जाईल, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिली.
फातोर्डा येथे भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या निवासस्थानी एसटी समाजातील प्रमुख नेत्यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी सभापती गणेश गावकर, मंत्री रमेश तवडकर, गोविंद गावडे, प्रकाश वेळीप, वासुदेव मेंग गावकर आणि आमदार अंतोन वाझ उपस्थित होते. एसटी समाजाच्या या शिष्टमंडळाने प्रदेशाध्यक्ष नाईक यांना निवेदन सादर करून, एसटी समाजाला राजकीय आरक्षण देण्याची प्रक्रिया अधिक वेगवान करण्याची मागणी केली.
या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले की, राज्यातील एसटी समाजाला राजकीय आरक्षण मिळावे याबाबत भाजपची भूमिका स्पष्ट आणि ठाम आहे. भाजपच्या कोअर समितीच्या बैठकीतही तसा ठराव संमत करण्यात आला आहे. राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना यापूर्वीच निवेदन सादर करण्यात आले असून, त्यांनी ते केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवून या प्रक्रियेला गती देणे आवश्यक आहे. राजकीय आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली जाणार होती, परंतु काही अपरिहार्य कारणांमुळे ती होऊ शकली नाही. आता याच महिन्यात केंद्रीय मंत्री शहा यांची भेट घेऊन चर्चा केली जाईल आणि हा विषय लवकरात लवकर मार्गी लावला जाईल, असेही नाईक म्हणाले.
मंत्री रमेश तवडकर यांनी सांगितले की, एसटी समाजाला राजकीय आरक्षण मिळावे आणि समाजातील मागे राहिलेला भूमिपुत्र मुख्य प्रवाहात यावा यासाठी आमचे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. राज्य सरकारकडून यासंबंधीचा ठराव आधीच संमत झाला आहे. त्यानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्येही एसटी समाजाला राजकीय आरक्षण देणारे विधेयक मंजूर झाले आहे. या विधेयकाला राष्ट्रपतींचीही संमती मिळाली असून, आता केवळ अंतिम नोटिफिकेशन जारी करणे बाकी आहे. ही प्रक्रिया तातडीने पूर्ण व्हावी आणि तिला गती मिळावी यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्यांना तसे निर्देश देण्याची विनंती केली जाईल. यापूर्वी केंद्रीय मंत्र्यांची वेळ मागितली होती, परंतु काही कारणांमुळे भेट शक्य झाली नाही. आज भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्याशी यावर सविस्तर चर्चा करून त्यांना निवेदन दिले आहे. असेच एक निवेदन लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांनाही सुपूर्द केले जाईल. केंद्रीय मंत्री शहा यांची शिष्टमंडळाद्वारे भेट घेऊन आरक्षणाचा हा प्रलंबित विषय लवकरच निकाली काढला जाईल, असा विश्वासही मंत्री तवडकर यांनी व्यक्त केला.