सततच्या कटकटीला कंटाळून पत्नी पंधरा दिवसांपूर्वीच गेली सोडून; मुंबईतील पवई येथील घटना

मुंबई : मुंबईच्या चकचकाटामागे दडलेली कौटुंबिक विवंचना आणि व्यसनाधीनतेचा भस्मासूर किती भयानक असू शकतो, याचा अत्यंत क्रूर आणि मन हेलावून टाकणारा प्रकार पवई परिसरात समोर आला आहे. केवळ दुधासाठी हट्ट धरून रडणाऱ्या आपल्या चार वर्षांच्या मुलाची बापानेच निर्घृण हत्या केल्याची घटना पवईतील गौतम नगर भागात घडली. कौटुंबिक कलह, दारूचे व्यसन आणि त्यातून निर्माण होणारा अनियंत्रित संताप यांमुळे एका निष्पाप जीवाला आपल्या प्राणाला मुकावे लागले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून समाजमनाला सुन्न करणाऱ्या या प्रकरणात पोलिसांनी वडिलांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत बालकाचे नाव यश सिंग असे असून तो अवघ्या चार वर्षांचा होता. यश हा तो अन्नाऐवजी प्रामुख्याने केवळ दुधाचेच सेवन करत असे. त्याचे वडील २६ वर्षीय राजेश सिंग याला दारूचे प्रचंड व्यसन होते. याच व्यसनापायी घरात वारंवार भांडणे होत असत. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी इतरांकडे जाऊन घरकाम करणाऱ्या राजेशच्या पत्नीने या जाचाला कंटाळून सुमारे चौदा दिवसांपूर्वी मुलाला पतीकडे सोडून माहेरी जाण्याचा निर्णय घेतला. पत्नी घर सोडून गेल्यामुळे राजेश आधीच प्रचंड संतापात आणि मानसिक तणावात होता.
गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घरात केवळ राजेश आणि यश हे दोघेच हजर होते. छोट्या यशला भूक लागल्याने तो दुधासाठी रडू लागला. मात्र, दारूच्या नशेत असलेल्या राजेशला मुलाचे रडणे सहन झाले नाही. संतापाच्या भरात त्याने त्या चार वर्षांच्या निष्पाप मुलाला उचलून थेट खोलीच्या दरवाजावर जोरात आपटले. यामुळे यशच्या डोक्याला दुखापत झाली, व त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेची माहिती समोर आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. आरोपी राजेशच्या बहिणीने या प्रकरणी तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ कारवाई करत आरोपी वडील राजेश सिंग याला बीएनएस अंतर्गत हत्येच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे. यशच्या शवविच्छेदन अहवालात, त्याच्या डोक्याला गंभीर फ्रॅक्चर झाल्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.