
शिमला : खाताना झालेली किरकोळ चूकही कशी जीवघेणी ठरू शकते, याची एक धक्कादायक घटना हिमाचल प्रदेशातून समोर आली आहे. कुरकुरे खात असताना त्याचा तुकडा श्वासवाहिनीत अडकल्याने २८ वर्षीय तरुणाचा गुदमरून मृत्यू झाला. हेमंत शर्मा असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हेमंत हा कुरकुरे खात असताना अचानक त्याला तीव्र श्वास कोंडल्यासारखे वाटू लागले. अन्ननलिकेऐवजी हा सुका व कडक तुकडा थेट श्वासवाहिनीत गेल्यामुळे त्याचा श्वास पूर्णपणे रोखला गेला. त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही त्याचे प्राण वाचू शकले नाहीत.
डॉक्टरांच्या मते, घशात घास किंवा बाहेरील वस्तू अडकणे ही अत्यंत गंभीर आणीबाणीची स्थिती आहे. श्वासवाहिनी पूर्णपणे बंद झाल्यास मेंदूला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा काही मिनिटांत थांबतो. यामुळे व्यक्ती बेशुद्ध होऊन तिचा मृत्यू ओढवू शकतो. केवळ लहान मुले किंवा वृद्धांनाच नाही, तर मोठ्या माणसांनाही याचा मोठा धोका असतो.
तज्ज्ञांनी सल्ला दिला आहे की, जेवताना किंवा स्नॅक्स खाताना कधीही घाई करू नये. अन्न व्यवस्थित चावून खावे आणि खाताना हसणे, बोलणे किंवा धावणे टाळावे. हा अपघात नसून निष्काळजीपणाचा परिणाम असू शकतो, त्यामुळे वेळीच सावध राहणे गरजेचे आहे.