व्यावसायिक गॅस सिलिंडर महागला

घरगुती सिलिंडरचे दर स्थिर

Story: वेब डेस्क| गोवन वार्ता |
10 hours ago
व्यावसायिक गॅस सिलिंडर महागला

पणजी : सर्वसामान्यांसाठी एक दिलासादायक तर व्यावसायिक ग्राहकांसाठी चिंताजनक बातमी आहे. आजपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली असून, घरगुती गॅस सिलिंडरचे दर मात्र जैसे थे ठेवण्यात आले आहेत.

नव्या दरवाढीनुसार, १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत ४२ रुपयांपासून ते ५३.५० रुपयांपर्यंतची वाढ झाली आहे. विविध राज्यांमधील स्थानिक कर आणि वाहतूक खर्चामुळे ही दरवाढ वेगवेगळ्या शहरांत बदलती आहे. या दरवाढीमुळे हॉटेल व्यावसायिक, केटरर्स आणि लहान खाद्यपदार्थ विक्रेते यांच्या खिशाला मोठा फटका बसणार असून, ऐन सणासुदीच्या काळात हॉटेलमधील खाद्यपदार्थ महागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दुसरीकडे, घरगुती वापराच्या १४.२ किलो गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यामुळे गृहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती आणि इंधनाची मागणी लक्षात घेऊन तेल कंपन्यांनी हा निर्णय घेतला असावा. वाढत्या महागाईच्या काळात व्यावसायिक सिलिंडरची ही दरवाढ सर्वसामान्यांच्या बजेटवर अप्रत्यक्षपणे किती परिणाम करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

हेही वाचा