२०२७ पूर्वी एसटी आरक्षण लागू करावे!

भाजपचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
4 hours ago
२०२७ पूर्वी एसटी आरक्षण लागू करावे!

पणजी : केंद्रीय निवडणूक आयोगाने २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत एसटी समाजासाठी आरक्षण लागू करावे, अशी मागणी भाजपने मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष दामू नाईक हे आपल्या दिल्ली दौऱ्यात हा प्रश्न मांडतील, असे भाजपच्या सुकाणू समितीचे गोविंद पर्वतकर यांनी सांगितले.

जनगणनेनंतरच एसटी समाजाला राजकीय आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाने केली होती. या संदर्भातील निवेदन त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांना सादर केले होते. तसेच राष्ट्रपती, पंतप्रधान आणि राज्यपालांनाही या निवेदनाच्या प्रती पाठवण्यात आल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर, भाजपच्या शिष्टमंडळाने आज मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि आरक्षणाच्या प्रक्रियेला गती देण्याची मागणी केली. या वेळी भाजप कोअर कमिटीचे सदस्य गोविंद पर्वतकर, एसटी मोर्चाचे अध्यक्ष तथा जिल्हा पंचायत (झेडपी) सदस्य मोहन गावकर, जिल्हा पंचायत सदस्य अंजली वेळीप, धाकू मडकईकर, पुंडलिक राऊत देसाई, सिद्धार्थ कुंकळयेकर आणि शुभम म्हापसेकर शिष्टमंडळात उपस्थित होते.

भाजपने सर्व स्तरांवर आपले प्रयत्न करून एसटी आरक्षणाचा विषय पुढे नेला आहे. आम्ही मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदन देऊन सांगितले आहे की, या संदर्भातील सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. केंद्राने हे आरक्षण सर्व राज्यांमध्ये लागू केले असून याविषयीचे विधेयक संसदेत संमत झाले आहे. तसेच गोवा विधानसभेतही या विधेयकाला पाठिंबा देणारा ठराव मंजूर करण्यात आला आहे, असे पर्वतकर यांनी सांगितले.

या संदर्भातील जी निवडणूक प्रक्रिया आहे, ती मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या समन्वयाने पूर्ण करावी. येत्या २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत आमच्या एसटी बांधवांना आरक्षण मिळावे, या हेतूने प्रयत्न सुरू करावेत, अशी मागणी पर्वतकर यांनी केली आहे.

भाजपने नेहमीच सर्व समाजाचे प्रश्न वेळोवेळी सोडवले असून हा देखील प्रश्न लवकरात लवकर सुटून एसटी समाजाला न्याय मिळेल, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. एसटी आरक्षणासंदर्भात समन्वय साधण्यासाठीच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष दामू नाईक दिल्लीला गेले आहेत, असे पर्वतकर यांनी स्पष्ट केले.


हेही वाचा