
पणजी : गिरीश चोडणकर यांनी यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये कोट्यवधी रुपये घेऊन तिकिटांची विक्री केली आहे. ईशान्येकडील राज्ये आणि तमिळनाडू येथे देखील त्यांनी हाच प्रकार केला होता. तत्कालीन गोवा प्रभारी डी. गुंडुराव यांनी देखील माझ्याकडे पैशांची मागणी केली होती. असे असताना काँग्रेस पक्षाने निवडणुकीच्या तोंडावर गिरीश चोडणकर यांची प्रदेशाध्यक्षपदी केलेली नियुक्ती अत्यंत चुकीची आणि अनाकलनीय आहे. राज्यातील विरोधी पक्षांमध्ये प्रचंड गटबाजी असल्याने आम्ही आता गोव्यात 'तिसरी आघाडी' करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी घोषणा माजी मंत्री मिकी पाशेको यांनी केली. सोमवारी पणजीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पत्रकार परिषदेत पुढे बोलताना पाशेको म्हणाले की, २०२२ मध्ये चोडणकर यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. खरे पाहता, त्यांनी त्यानंतर राजकारणातून स्वेच्छानिवृत्ती घ्यायला हवी होती. मात्र, आता त्याच वादग्रस्त व्यक्तीला पक्षाने पुन्हा एकदा इतके मोठे पद दिले आहे. चोडणकर हे काँग्रेस पक्षाचा आणि गोव्याचा राजकारणात सत्यानाश करणार हे आता नक्की झाले आहे. ते तमिळनाडूचे प्रभारी असताना तेथील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे चोडणकर यांच्या विरोधात लेखी तक्रार केली होती. तिथे देखील चोडणकर यांच्यावर तिकीट विक्री केल्याचे गंभीर आरोप झाले होते. गोव्याचे तत्कालीन प्रभारी गुंडुराव यांनी मला पाटो येथील निवडणूक कार्यालयात बोलावून माझ्या आर्थिक परिस्थितीबाबत विचारणा केली होती, कारण त्यांना माझ्याकडून मोठी रक्कम हवी होती."
ते पुढे म्हणाले, आम्ही सध्या काँग्रेस पक्षात नसलो तरी एक धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून आम्ही नेहमीच काँग्रेसला वेळोवेळी साथ दिली आहे. यापूर्वीच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार निवडून यावेत यासाठी आम्ही प्रामाणिकपणे काम केले. मात्र, पक्षाने नेहमीच लोकांच्या विश्वासाचा आणि पाठिंब्याचा गैरवापर केला आहे. आज गोव्यातील प्रत्येक राजकीय पक्षात मोठ्या प्रमाणावर अंतर्गत गटबाजी सुरू आहे. राज्यातील विरोधी पक्षांमध्ये कुठेही एकी दिसत नाही. म्हणूनच आम्ही आता गोव्यात एक सक्षम तिसरी आघाडी तयार करणार आहोत आणि लवकरच याबाबातचा अंतिम निर्णय जाहीर केला जाईल. आमची ही आघाडी केवळ सासष्टी तालुक्यापुरती मर्यादित न राहता संपूर्ण गोव्यात पक्षाचे काम सुरू करेल. समाजात प्रामाणिकपणे चांगले काम करणाऱ्या नवीन चेहऱ्यांना आणि सामाजिक कार्यकर्त्यांना आम्ही या आघाडीतर्फे निवडणुकीचे तिकीट देण्याचा गांभीर्याने विचार करत आहोत.